गीताई : अध्याय १५ - पुरुषोत्तम योग

 


गीताईचे  बोट धरून केव्हा पंधराव्या अध्यायापर्यंत येऊन पोहोचले कळलेच नाही. एक बरं  असतं.. आईचे बोट धरून चालताना रस्ता माहित असण्याची गरज नसते. मागच्या अध्यायात आपण सत्व, रज आणि तम असे त्रिगुण आणि त्यांची लक्षणे  वाचली. या गुणांच्या बळाने प्राप्त होणारी गती ही कृष्णांनी आपल्याला विस्ताराने सांगितली. या पुढे भगवान त्यांच्या पुरुषोत्तम रूपाविषयी फार प्रेमाने अर्जुनाला माहिती देतात. या अध्यायाचा पहिला श्लोक तसा सर्व परिचित आणि प्रसिद्ध आहे. म्हणून तो संस्कृतातही देत आहे.

ऊर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम्‌।

छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्‌

 

भगवान श्रीकृष्ण म्हणतात -

खाली शाखा वरी मूळ नित्य अश्वत्थ बोलिला।

ज्याच्या पानांमधे वेद जाणे तो वेद जाणतो॥ १ ॥

वरी हि शाखा फुटल्या तयास।

ही भोग-पाने गुण-पुष्ट जेथ॥

खाली हि मूळे निघती नवीन।

दृढावली कर्म-बळे नृ-लोकी॥ २ ॥

 


इथे श्रीकृष्णांनी अश्वत्थ वृक्षाचे रूपक योजून सांसारिक जगाविषयीचे काही दृष्टांत दिले आहेत. अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळाचे  झाड. इथे श्रीकृष्णांनी एका अशा दैवी झाडाचे उदाहरण दिले  आहे, ज्याची मुळे  वरच्या दिशेला वाढत आहेत आणि फांद्या खालच्या दिशेला वाढत आहेत. हे संसार रुपी वृक्षाचे वर्णन आहे. ज्यात वर वाढणारी मुळं म्हणजे परमेश्वर रुपी आदिपुरुष आहे. खाली वाढणाऱ्या मूळ शाखा म्हणजे विश्वाची उत्पत्ती, ज्यांतून दृश्य होते ते ब्रम्ह स्वरूप आहे आणि या शाखांवरची छोटी छोटी पाने  म्हणजे वेदांमधले वेगवेगळे छंद आहेत. या संसाररुपी अश्वत्थ वृक्षाचे असे  हे स्वरूप जो जाणतो तो खरा ज्ञानी व्यक्ती होय. या वृक्षाचे श्रीकृष्ण पुढे वर्णन करतात की या वृक्षाला खाली आणि वरही फांद्या फुटल्या आहेत. या फांदया म्हणजे सत्व, रज, तम हे त्रिगुण आणि काम, क्रोध, मद, मोह, मत्सर असे विकार आहेत. पण या संसाररूपी वृक्षाची मुळे कर्मबळाने मनुष्य लोकात दृढ झालेली आहेत. पुढे परमेश्वर ज़े सांगतात ते मला चकित करून गेले.

ह्याचे तसे रूप दिसे न येथे।

भासे न शेंडा बुडखा न खांदा॥

घेऊनि वैराग्य अभंग शस्त्र।

तोडूनिया हा दृढ-मूल वृक्ष॥ ३ ॥

घ्यावा पुढे शोध तया पदाचा ।

जेथूनि मागे फिरणे नसे चि ॥

द्यावी बुडी त्या परमात्म-तत्त्वी ।

प्रवृत्ति जेथे स्पुरली अनादी ॥ ४ ॥

 श्रीकृष्ण म्हणतात, ज्याचा शेंडा बुडखा काही नीट ठरवता येत नाही, ज्याचा आदि आणि अंत दिसत नाही अशा या संसाररूपी वृक्षाला वैराग्याच्या अभंग अविनाशी शस्त्राने तोडून टाकावे. खरे  तर मला या चमत्कारिक अशा 'खाली डोकं वर पाय' वृक्षाचं वर्णन गमतीशीर वाटलं होतं. श्रीकृष्ण त्याला छाटायला सांगतील असं  वाटलं नव्हतं. पण हा झाला गंमतीचा भाग. आपण काय शिकायचं, तर समजायला कठीण अशा या विश्वाच्या पसाऱ्यात स्वतः ला होता होय तेवढे   काम, क्रोध, मद, मोह, मत्सर या विकारांपासून दूर ठेवायचे.

विनोबांनी इतके  सुंदर मराठी रूपांतर केले  आहे. ते म्हणतात - 'घ्यावा पुढे शोध तया पदाचा। जेथूनि मागे फिरणे नसे चि'  अशा अढळ पदाचा ध्यास घ्या, की तिथून तुम्ही पुन्हा जन्म-मृत्युच्या फेऱ्यात अडकणार नाही. 'द्यावी बुडी त्या परमात्म-तत्त्वी। प्रवृत्ति जेथे स्पुरली अनादी'  परमात्म तत्वात अशी बुडी मारावी की जिथे आपल्या वृत्ती सदा अनादि अनंतात मिसळण्यासाठी आतुर राहतील.


जो मान-मोहांस संग-दोष।

जाळूनि निर्वासन आत्म-निष्ठ॥

द्वंद्वे न घेती सुख-दुःख-मूळ।

ते प्राज्ञ त्या नित्य पदी प्रविष्ट॥ ५ ॥

न त्यास उजळी सूर्य कायसे अग्नि-चंद्र हे।

जेथ गेला न परते माझे अंतिम धाम ते॥ ६ ॥

श्रीकृष्ण पुढे म्हणतात, ज़े अहंकार, मान, मोह, आसक्ती यांना जिंकतात आणि ज्यांचे  चित्त आत्मशक्तीच्या ठायी केंद्रित झालेले  असते, ते प्रज्ञावंत लोक सुख आणि दुःख या द्वंद्वातून मुक्त होऊन अढळ पदी पोहोचतात. अशांना उजळण्यासाठी चंद्र, सूर्याची गरज नसते. ते माझ्यापर्यन्त पोहोचतात जिथून ते कधीही परत जात नाहीत.

माझा चि अंश संसारी झाला जीव सनातन।

पंचेंद्रिये मनोयुक्त प्रकृतींतूनि खेचितो॥ ७ ॥

पुष्पादिकांतुनी वारा गंध खेचूनि घेतसे।

तशी घेऊनि ही सर्व देह सोडी धरी प्रभु॥ ८ ॥

हा योग एका वेगळ्याच विषयात रंगत जातो. एक एक पाकळी उमलत जावी तसा. श्रीकृष्ण म्हणतात या संसारात माझाच अंश सनातन, अक्षय असा भरून राहिला आहे. ही प्रकृतीतून निर्माण झालेली पंचेंद्रिये  आणि मन यांना मीच आकर्षित करत असतो. जसा वारा फुलांतून गंध खेचून घेतो तसा परमेश्वर देहादेहातून प्राण फुंकतो किंवा घेऊनही जातो.

श्रोत्र जिह्वा त्वचा चक्षु घ्राण आणिक ते मन।

ह्या सर्वांस अधिष्ठूनि ते ते विषय सेवितो॥ ९ ॥

सोडितो धरितो देह भोगितो गुण-युक्त हा।

परी न पाहती मूढ ज्ञानी डोळस पाहती॥ १० ॥

योगी यत्न-बळे ह्यास पाहती हृदयी स्थित।

चित्त-हीन अशुद्धात्मे प्रयत्ने हि न पाहती॥ ११ ॥


जीवात्मा कान, जीभ, नाक, डोळे आणि मन या सर्वांच्या माध्यमातून विषयांचे ग्रहण करत असतो. तो अनेक शरीरांत प्रविष्ट होत असतो आणि अनेक शरीरे  सोडून जात असतो. शरीरात राहून अनेक गुण भोगत असतो. मात्र ज़े ज्ञानवंत असतात त्यांच्याच डोळस दृष्टीला हे दिसू शकते. मूढ, अज्ञानी लोकांना हे दिसत किंवा कळत नाही. ज़े योगी लोक असतात ते प्रयत्नपूर्वक या परमात्म्याला पाहतात आणि त्यांना तो हृदयात स्थित झालेला दिसतोही. ज्यांचं चित्त स्थिर नाही अशा अशुद्ध मनाच्या लोकांना प्रयत्न करूनही आत्मरूपी परमेश्वर दिसत नाही.

सूर्यात जळते तेज जे विश्व उजळीतसे।

तसे चंद्रात अग्नीत जाण माझे चि तेज ते॥ १२ ॥

आकर्षण-बळे भूते धरा-रूपे धरीतसे।

वनस्पतींस मी सोम पोषितो भरिला रसे॥ १३ ॥

 

श्रीकृष्ण म्हणतात, सूर्यात जळणारा अग्नी, ज्याच्या तेजाने सर्व विश्व उजळलेले असते, ज़े चंद्रात आणि अग्नीत दिसते, ज्या आकर्षण रूपाने मी पंचमहाभुतांना पृथ्वीशी बांधून ठेवले आहे, वनस्पतीतील जीवन रस जो आहे तो मीच आहे.

पुढचा श्लोक ही सर्व परिचित आहे म्हणून संस्कृतातही देत आहे.

अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः।

प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्‌ ॥ १५-१४

 गीताई मराठी श्लोक -

मी वैश्वानर-रूपाने प्राणि-देहांत राहुनी।

अन्ने ती पचवी चारी प्राणापानांस फुंकुनी॥ १४ ॥

 मी सर्व प्राण्यांच्या शरीरात आश्रयाला असणारा वैश्वानर - अग्नी आहे. प्राण व अपान म्हणजे श्वास आणि उच्छवास यांनी ज्या अग्नीला सतत प्रज्वलित ठेवले आहे आणि चारही प्रकारच्या अन्नाचे या अग्नीच्याद्वारा पचन होते. हे चार प्रकारचे अन्न कोणते?

1) भक्ष म्हणजे ज़े चावून खातो ते

2) भोज्य म्हणजे ज़े चटकन गिळले जाते ते

3) लेह्य म्हणजे ज़े चटणीसारखे चाटून खाल्ले जाते ते

4) चोष्य म्हणजे चोखून खातो ते

असे सगळे पदार्थ पचवणारा सर्व भुतांच्या पोटात वसलेला जठराग्नी तो परमेश्वर आहे. Simply beautiful!

सर्वांतरी मी करितो निवास।

देतो स्मृति ज्ञान विवेक सर्वा॥

समग्र वेदांस हि मी चि वेद्य।

वेद-ज्ञ मी वेद-रहस्य-कर्ता॥ १५ ॥

 सर्वांच्या अंतरात मी निवास करतो. सर्वाना स्मृति, ज्ञान, विवेक म्हणजे योग्य काय अयोग्य काय याची निवड करण्याची बुद्धि मी देतो. सर्व वेदांतील वेद्य मी आहे. वेदांचा जाणणारा आणि त्यांचा रहस्य कर्ता ही मीच आहे.

लोकी पुरूष ते दोन क्षर आणिक अक्षर।

क्षर सर्व चि ही भूते स्थिर अक्षर बोलिला॥ १६ ॥

म्हणती परमात्मा तो तिजा पुरूष उत्तम।

विश्व-पोषक विश्वात्मा जो विश्वेश्वर अव्यय॥ १७ ॥

 जगात क्षर म्हणजे ज्याचा नाश होऊ शकतो आणि अक्षर जो अविनाशी, अविरत, आदि-अंत नसलेला आहे, असे दोनच पुरुष आहेत. त्यातली नश्वर अशी ही भूतमात्र आहेत आणि त्यातला स्थिर अक्षर असा त्यांचा  अंतरात्मा आहे. मी विश्वपोषक, अव्यय, अविनाशी दोन्हीं पुरुषांहून वेगळा पुरुषोत्तम आहे

मी क्षरा-अक्षराहूनि वेगळा आणि उत्तम।

वेद लोक म्हणे माते म्हणूनि पुरूषोत्तम॥ १८ ॥

इतके  सगळे  निरूपण करून त्याची पूर्णता श्रीकृष्णांनी या श्लोकांत  अशी केली आहे की मी या क्षर आणि अक्षर पुरुषांहून वेगळा आणि उत्तम आहे. मी तीनही लोकांत प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो म्हणूनच मला वेदांत आणि लोकांत पुरुषोत्तम असे संबोधले गेले आहे.

मोह सारूनि जो दूर जाणे मी पुरूषोत्तम।

सर्व-ज्ञ तो सर्व-भावे सर्व-रूपी भजे मज॥ १९ ॥

अत्यंत गूढ हे शास्त्र निर्मळा तुज बोलिलो।

हे जाणे तो बुद्धिमंत होईल कृत-कृत्य चि॥ २०॥

 जो अज्ञान आणि मोह दूर करून हे जाणतो की मीच म्हणजे परमेश्वर पुरुषोत्तम आहे, तो सर्व काही जाणणारा सर्वज्ञ मला सर्व रूपात, सर्व भावांत मला भजतो. असे हे अत्यंत गूढ शास्त्र, हे निष्पाप आणि निर्मळ अर्जुना मी तुला सांगितलं. जो हे गूढ ज्ञान जाणतो तो कृतकृत्य होतो.

इथे पंधरावा अध्याय संपतो. एक एक अध्याय जसा लिहून होत आहे, तसे  तसे  श्रीकृष्णाच्या परमेश्वरी रूपाची वेगवेगळ्या प्रकारे ओळख होते आहे.......ज्ञानाच्या या अथांग सागरातले  पाणी माझ्या ओंजळीत धरण्याचा प्रयत्न करताना, काही निसटतंय पण काही हाती ही लागत आहे....


क्रमश:

अलका देशपांडे 




No comments:

Post a Comment