सतरावा अध्याय.... फार सुंदर अध्याय आहे.. खूप काही शिकवणारा. शेवटपर्यंत वाचा अशी विनंती.
मागच्या दैवासूरसंपविभाग योगात श्रीकृष्णांनी दैवी आणि असुरी वृत्तींची अनेक उदाहरणे दिली आणि शेवट हे सांगून केला, की हे अर्जुना कार्य आणि अकार्य काय असते, त्याचे शास्त्र तू जाणून घे आणि त्यानुसार तुझं कर्माचरण कर. हे ऐकल्यावर अर्जुनाने एक अतिशय सुंदर प्रश्न विचारला आहे...हा प्रश्न आपल्याला इतका लागू पडतो.. अर्जुन विचारतो
जे शास्त्र-मार्ग सोडूनि श्रद्धा-पूर्वक पूजिती।
त्यांची सात्त्विक ती निष्ठा किंवा राजस तामस॥१॥
What a great and relevant question! ज्ञान मिळवण्यासाठी, अज्ञान दूर करण्यासाठी योग्य व्यक्तीला योग्य प्रश्न विचारणं किती आवश्यक असत पहा. आता श्रीकृष्ण काय उत्तर देतात पाहू.
तिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी।
ऐक सात्त्विक ती होय तशी राजस तामस॥ २ ॥
जसा स्वभाव तो ज्याचा श्रद्धा त्याची तशी असे।
श्रद्धेचा घडिला जीव जशी श्रद्धा तसा चि तो॥ ३ ॥
श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक जीवमात्र आपापल्या स्वभाव
धर्माप्रमाणे तीन प्रकारच्या श्रद्धांचा अवलंब करत असतात. सात्विक, राजस आणि तामसिक श्रद्धा.
आपण श्रद्धा हा शब्द फार ढोबळ अर्थाने वापरतो, पण श्रीकृष्णांनी श्रद्धेचे किती
सूक्ष्म पदर
उलगडून दाखवले आहेत ते पहा. पुढे फार सुंदर श्लोक आहे "जसा स्वभाव तो ज्याचा श्रद्धा त्याची तशी असे। श्रद्धेचा घडिला जीव जशी
श्रद्धा तसा चि तो" ज्याचा जसा स्वभाव असतो त्याची तशी
श्रद्धा असते. जीवात्मा हा श्रध्दामय असतो. त्यामुळे त्याची जी श्रद्धा असते
तीच त्याची अभिव्यक्ती आणि प्रकटीकरण असते. Very important statement!
सत्त्व-स्थ पूजिती देव यक्ष-राक्षस राजस।
प्रेते आणि भुते-खेते पूजिती लोक तामस॥ ४ ॥
शास्त्रे निषेधिले घोर दंभे आचरिती तप।
अभिमानास पेटूनि काम-रागे बळावले॥ ५ ॥
देह-धातूंस शोषूनि मज आत्म्यास पीडिती।
विवेक-हीन जे त्यांची निष्ठा ती जाण आसुरी॥ ६ ॥
आहारांत हि सर्वांच्या तीन भेद यथा-रुचि।
तसे यज्ञी तपी दानी सांगतो भेद ऐक ते॥ ७ ॥
सत्त्व प्रीती सुख स्वास्थ्य आयुष्य बळ वाढवी।
रसाळ मधुर स्निग्ध स्थिर आहार सात्त्विक॥ ८ ॥
खारे रूक्ष कडू तीख अम्ल अतुष्ण दाहक।
दुःख-शोक-द आहार रोग-वर्धक राजस॥ ९ ॥
रस-हीन निवालेले शिळे दुर्गंध-युक्त जे।
निषिद्ध आणि उष्टे हि तामस-प्रिय भोजन॥ १० ॥
आजकाल आपण सगळेच health conscious झाले
आहोत. इथूनतिथून येणाऱ्या नवीन नवीन खाण्या पिण्याच्या अनेक सूचना आपण अमलात आणत असतो. श्रीकृष्णांनी फक्त ३ श्लोकांत कुठल्या प्रकारचे लोक काय
खातात ते सांगितलं आहे. श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येकाच्या प्रवृत्तीप्रमाणे
आहारातही तीन भेद आहेत. मी तुला आहारातील तीन भेद तसेच यज्ञ, तप,
आणि दानातीलही तीन भेद विस्ताराने सांगतो.
आहार :-
२) खारट, शुष्क, कडू, तिखट, आंबट, अती गरम, झणझणीत तिखट हे दुःख आणि शोक निर्माण करणारे रजो गुणांनी भरलेल्या लोकांचे आवडते अन्न असते. या पदार्थांची यादी खूप मोठी होईल. मांसाहार, मद्य, सगळेच मसालेदार पदार्थ, हॉटेलचे खाणे, या विभागात मोडते.
३) रसहीन, शिळेपाके, थंड, दुर्गंध युक्त, निषिद्ध, उष्टावलेले असे सगळे वाईट अन्न हे तामसिक लोकांना प्रिय असत. आहे ना गंमत?.. दृष्टीआड बनवलेले, नासलेले, आंबलेले सत्वहीन खाणे या विभागात येते.
श्रीकृष्णांना का बरे इतक्या detail मध्ये हे सगळे सांगावेसे वाटले असेल? त्यांना अंतर्ज्ञानाने कळले असेल का की भारतवर्षाची काही हजार वर्षांनी खाण्यापिण्याची इतकी अधोगती होणार आहे? असे माझ्या मनात आले खरे. आता श्रीकृष्ण तिन्ही प्रकारच्या लोकांनी वेगवेगळ्या धारणेने केलेल्या यज्ञा विषयी सांगतात.
फलाभिलाष सोडूनि कर्तव्य चि म्हणूनिया।
विधीने मन लावूनि होय तो यज्ञ सात्त्विक॥ ११ ॥
फळाचे अनुसंधान राखुनी दंभ-पूर्वक।
लोकांत यजिला जाय जाण तो यज्ञ राजस॥ १२ ॥
नसे विधि नसे मंत्र अन्नोत्पत्ति नसे जिथे।
नसे श्रद्धा नसे त्याग बोलिला यज्ञ तामस॥ १३ ॥
जो यज्ञ, फळाची अभिलाषा सोडून केवळ कर्तव्य भावनेने विधिपूर्वक, मन लावून केला जातो तो सात्विक यज्ञ मानावा. तसेच मनात फळाची आशा ठेऊन, तेच एक लक्ष्य मानून दांभिकपणे जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ असतो. ज्या यज्ञात विधी, त्याग, मंत्र या सगळ्याचा अभाव असतो, जीथे अन्नदान केले जात नाही, जो श्रद्धा नसताना केला जातो तो तामसिक यज्ञ असतो.
आपल्या जगण्याशी जोडायचा प्रयत्न केला तर आपण जी काम करतो ती यज्ञासारखीच असतात. आपण मनापासून एखादी गोष्ट करत असतो. पण त्या मागचा भाव, वृत्ती, अपेक्षा, पद्धत, कृती, श्रद्धा यावरून तो कर्मयज्ञ सात्विक आहे, राजस आहे की तामसी आहे ते ठरते.
गुरू-देवादिकी पूजा स्वच्छता वीर्य-संग्रह।
अहिंसा ऋजुता अंगी देहाचे तप बोलिले॥ १४ ॥
हितार्थ बोलणे सत्य प्रेमाने न खुपेलसे।
स्वाध्याय करणे नित्य वाणीचे तप बोलिले॥ १५
प्रसन्न-वृत्ति सौम्यत्व आत्म-चिंतन संयम।
भावना राखणे शुद्ध मनाचे तप बोलिले॥ १६ ॥
आहार आणि यज्ञ यांविषयी सांगून झाल्यावर श्रीकृष्ण तपाचे प्रकार आणि कुठले तप सात्विक, राजस आणि तामसिक आहे ते सांगतात.
सात्विक तपाचे तीन प्रकार श्रीकृष्णांनी सांगितले आहेत.
१) शरीराचे तप :- गुरुजनांची, देवतांची पूजा करणे म्हणजे त्यांचा मान राखणे, स्वच्छता, ब्रम्हचर्य याचे आचरण करणे, अहिंसा आणि सरळपणा म्हणजे ऋजुता या गुणांचा अंगीकार करणे हे शरीराचे तप आहे असे श्रीकृष्ण सांगतात.
२) वाणीचे तप :- दुसऱ्याच्या हिताचे बोलणे, नेहमी सत्य बोलणे, प्रेमाने बोलणे, दुसऱ्याला दुखावणार नाही, खुपणार नाही याची काळजी घेऊन बोलणे, स्वाध्याय, परमेश्वराचा नामजप, हे सगळे आपल्या बोलण्यात सतत अंतर्भूत असणे याला वाणीचे तप म्हणतात.
३) मनाचे तप :- प्रसन्न वृत्ती, सौम्यत्व, आत्मचिंतन, संयम, भावनाशील, संवेदनशील असणे, मनाने शुद्ध असणे याला मनाचे तप म्हणतात.
किती सूक्ष्म प्रदर उलगडले आहेत स्वतः भगवंतांनी. भगवंत म्हणतात, अशा प्रकारे शरीर, वाणी आणि मन या तिहेरी पातळीवर उत्कट श्रद्धा जोडून, समबुद्धीने जो फळाची अपेक्षा न करता जो हे आचरण करतो, ते आचरण सात्विक मानावे. विनोबांनी पण किती सुंदर मराठी काव्य रचना केली आहे.
तिहेरी तप ते सारे श्रद्धा उत्कट जोडुनी।
समत्वे फळ सोडूनि घडले जाण सात्त्वि॥ १७ ॥
सत्कारादिक इच्छूनि केले जे दंभ राखुन।
ते चंचळ इथे जाण तप राजस अस्थि॥ १८ ॥
दुराग्रहे चि जे होय अंतरात्म्यास पीडुनी।
किंवा जे पर-घातार्थ जाण तामस ते तप॥ १९ ॥
वरच्या दोन श्लोकांत श्रीकृष्ण
सांगतात,
फळाच्या लाभाने प्रेरित होऊन, आपला सत्कार होईल, लोक वा वा म्हणतील या उद्देशाने
दांभिकपणे केलेले तप हे चंचल आणि अस्थिर असते. ते रजो गुणांनी युक्त तप असते. आणि
ज़े तप दुराग्रहावर आधारलेले असते, ज़े अंतरात्म्याला क्लेश देऊन पीडा देऊन आचरलेले
असते किंवा ज़े दुसऱ्याचा घात करण्याच्या हेतूने केलेले असते ते तामसी तप असते. इथे आपल्यासाठी म्हणजेच सर्व
सामान्यांसाठी
ज़े काम आपण नियमित करतो, सतत करतो किंवा योजून करतो त्यालाच आपण तप म्हणायचे.
देशी काळी तसे पात्री उपकार न इच्छिता।
धर्म-भावे चि जे देणे जाण ते दान सात्त्विक॥ २०
उपकार अपेक्षूनि अथवा फळ वांछुनी।
क्लेश-पूर्वक जे देणे जाण ते दान राजस॥ २१ ॥
करूनि भावना तुच्छ देशादिक न पाहता।
अनादरे चि जे देणे जाण ते दान तामस॥ २२ ॥
ॐ-तत्-सत् ह्यापरी ब्रह्म तिहेरी स्मरले असे।
त्यांतूनि निर्मिले पूर्वी वेद यज्ञ उपासक॥ २३ ॥
मूळ
संस्कृत
ॐ तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः।
ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा॥ १७-२३॥
"ॐ-तत्-सत्" हा मंत्र, जो आपल्या
सर्वाना सुपरिचित आहे, हा गीतेत या श्लोकात सांगण्यात आला
आहे. भगवान म्हणतात की ॐ-तत्-सत् यातून तिहेरी
सत्चिदानंद रूप ब्रम्हाचा निर्देश होतो. या मंत्राचे सर्वात आधी उच्चारण करून
सृष्टीच्या आरंभी वेद, ब्राम्हण, यज्ञ यांची रचना केली गेली आहे.
ॐ-तत्-सत् हा अतिशय शक्तिशाली आणि अपार ज्ञानाने भरलेला मंत्र आहे हे मला नमूद करावेसे वाटते. ॐ हा सर्व ध्वनींचा मूळ आहे. तो अनादि, निरंतर आणि विश्व व्यापून उरलेला अक्षय नाद आहे... तर "तत्" हा शब्द परमेश्वरी शक्तीचे वर्णन आहे.. चराचर व्यापून उरलेला तो "तू " म्हणजे ईश्वर, म्हणजेच या विश्वाला चालवणारी अदम्य आत्मशक्ती आहे. जसा ॐ कार उत्पत्तीचे मूळ आहे, "तत्" ईश्वरी आत्मशक्ती आहे तसे "सत्" ही ईश्वरी रूपाची अभिव्यक्ती आहे... हे निरंतर, अविनाशी सत्य आहे... ज़े कालातील आहे.. म्हणूनच "ॐ-तत्-सत्" हा बीजाक्षर मंत्र आहे.
म्हणूनि आधी ॐकार उच्चारूनि उपासक।
यज्ञ-दान-तपे उक्त निरंतर अनुष्ठिती॥ २४ ॥
तत्-कार-स्मरणे सर्व तोडूनि फल-वासना।
नाना यज्ञ तपे दानेकरिती मोक्ष लक्षुनी॥ २५ ॥
श्रीकृष्ण म्हणतात म्हणूनच नेहमीच ॐ काराचा आधी उच्चार करून उपासक यज्ञ, तप आणि दान याची सुरुवात करतात. कारण ॐ सगळ्याचं मूळ आहे. तत् कार जो आहे ते सर्व फळांची वासना सोडून केलेले यज्ञ, तप किंवा दान आहे, ज़े मोक्ष प्राप्त करून देते. पुढे अशाच सुंदर ओळी विनोबांनी लिहिल्या आहेत.
सत्-कार-स्मरणे लाभे सत्यता आणि साधुता।
तशी सुंदरता कर्मी सत्-कारे बोलिली असे॥ २६ ॥
"सत्"
काराच्या स्मरणाने सत्यता आणि साधूता लाभते तशीच सर्व चांगल्या
कामात सत् अंतर्भूत असतो
यज्ञ-दान-तपे किंवा कर्मे जी त्यांस साधक ।
वागणे ह्यापरी त्यांत सत्-कार-फळ बोलिले ॥ २७ ॥
यज्ञ दाने तपे कर्मे अश्रद्धेने अनुष्ठिली।
बोलिली सर्व ती मिथ्या दोन्ही लोकांत निष्फळ॥ २८ ॥
ज़े यज्ञ, तप, दान आणि कर्म
अश्रद्धेने केली जातात ती सर्व मिथ्या आणि निष्फळ ठरतात.....
हा अध्याय लिहून मला अवाक झाल्यासारखे वाटते आहे. जगण्याचे इतके सुंदर तत्वज्ञान, इतके सुंदर मार्गदर्शक तत्व, इतके बारकावे, इतकी उदाहरणं, इतके सुंदर वर्गीकरण आणि उदाहरण!!!!! खरंच आपण या सुंदर देशात जन्माला आलो, जिथे परमेश्वराने आईसारखे सगळे सगळे आपल्या लेकरांसाठी केले. सात्विक अन्न, जीवन रस बनवून तयार करून ठेवला पण आम्ही तो उघडून बघण्याची तसदी देखील घेतली नाही... आम्ही कदान्नाच्या मागे फिरतोय, वास काढत, सुख शोधत, मनाची शांती शोधत...पण खरा सात्विक आहार तर आईच घरात बनवून ठेऊन गेली आहे याच आम्हाला भानच राहीलेले नाही....
क्रमश:
अलका देशपांडे
No comments:
Post a Comment