वाचक हो, गीतेच्या अठराव्या म्हणजे शेवटच्या
अध्यायाचा हा उर्वरित भाग.
मागील भागात आपण श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या "संन्यासाचे कसे तत्त्व, त्यागाचे हि कसे असे? या प्रश्नाचे उत्तर फार सविस्तर पणे द्यायला सुरुवात केली...त्याग आणि संन्यास यांच्या विषयीच्या निवाड्याचे निर्णायक उत्तर देऊन ते थांबले नाहीत तर त्यांनी त्यापुढे जाऊन कर्माच्या पाच सिद्धी आणि कर्ता कर्म, ज्ञान, बुद्धि, धृति आणि सुख यांचे सात्विक राजसिक आणि तामसिक असे त्रिगुणी प्रकार उदाहरणासहित विस्ताराने सांगितले... तुम्ही जाणलेच असेल की आता पुढच्या काही श्लोकांत या प्रदीर्घ संवादाची समाप्ती होणार.. हा संवाद पुढे कुठल्या वळणावर जाऊन नेमका कशा पद्धतीने परिपूर्ण होतो ते पाहूया.
इथे पृथ्वीवरी किंवा स्वर्गी देवादिकांत हि।
काही कुठे नसे मुक्त प्रकृतीच्या गुणांतुनी॥४०॥
ब्राह्मणादिक वर्णांची कर्मे ती ती विभागिली।
स्वभाव-सिद्ध जे ज्याचे गुण त्यास धरूनिया॥४१॥
श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना या पृथ्वीवर किंवा स्वर्गलोकीसुद्धा असे काहीही नाही ज़े प्रकृतीच्या, निसर्गाच्या गुणांपासून मुक्त आहे. ब्राह्मणादिक ज़े चातुर्वर्ण आहेत त्यांची आपापली कर्मे देखील विभागलेली आहेत. त्या प्रत्येक वर्णाच्या स्वभावानुसार त्यांचे गुण किंवा कर्मे आहेत.
शांति क्षमा तप श्रद्धा ज्ञान विज्ञान निग्रह।
ऋजुता आणि पावित्र्य ब्रह्म-कर्म स्वभावता॥४२॥
शौर्य दैर्य प्रजा-रक्षा युद्धी हि अ-पलायन।
दातृत्व दक्षता तेज क्षात्र-कर्म स्वभावता॥४३॥
शेती व्यापार गो-रक्षा वैश्य-कर्म स्वभावता।
करणे पडिली सेवा शूद्र-कर्म स्वभावता॥४४॥
शांती, क्षमा, तप, श्रद्धा, विज्ञान,
निग्रह, ऋजुता म्हणजे सरळपणा, पावित्र्य ही ब्रह्म वर्णाची कर्मे आहेत. शूरता, दातृत्व, प्रजेचे रक्षण करणे, युद्ध करताना कठीण समयी देखील युद्धातून पलायन न करणे, दक्षता बाळगणे, नेहमी सतर्क असणे, तेज ही सगळी क्षात्र कर्म आहेत. शेती, व्यापार, गो रक्षा ही वैश्य
कर्म आहेत. परिचर्या , सेवा ही शूद्रांची स्वाभाविक कर्म आहेत.
आजच्या काळात हे श्लोक अगदी वादग्रस्त आहेत. आजच्या काळात 'जात', 'वर्ण' व्यवस्था या गोष्टींना लोक सदॊष,
पूर्वग्रहदूषित नजरेनेच पाहतात. वर्णव्यवस्था या विषयावर लिहिण्या इतका माझा
अभ्यास नाही परंतु मी याकडे आवश्यक गरजा पार पाडण्यासाठी समाजाचे कर्तव्य कर्मा
नुसार केलेले वर्गीकरण या दृष्टिकोनातून पाहते.
कालांतराने हे वर्गीकरण दुर्दैवाने
व्यक्तिविकासाला मारक ठरले आणि विकृत स्वरूपात आणि विस्कटलेल्या रूपात आपल्या समोर आले, ज़े मुळात अपेक्षित नसावे. अन्यथा आजच्या काळातही, बुद्धिजीवी
ज्ञानार्जन करणारे, देशाचे रक्षण करणारे, व्यापार उदीम सांभाळणारे आणि वेगवेगळ्या
प्रकारची सेवा क्षेत्र सांभाळणारे असे समाजाचे चार प्रमुख घटक आहेतच आणि
श्रीकृष्णांनी सांगितलेली कर्तव्य कर्म त्यांनी त्यांच्या क्षेत्रात चोख बजावणे ही समाजहितासाठी आजही तितकंच आवश्यक
आणि अपेक्षितही आहे.
आपुल्या आपुल्या कर्मी दक्ष तो मोक्ष मेळवी।
ऐक लाभे कसा मोक्ष स्व-कर्मी लक्ष लावुनी॥४५॥
वरचा श्लोक ठळक पाटी म्हणून सर्व कामाच्या ठिकाणी लावला पाहिज़े. प्रत्येक कामाच्या ठिकाणी "आपाआपल्या कर्मात जो दक्ष असतो तो मोक्ष मिळवतो" खरं आहे की नाही सांगा... प्रत्येक माणसाने स्वतः अंगिकारलेले किंवा वाट्याला आलेले काम चोख बजावणे यातच खरी मुक्ती आहे.. कृष्ण अर्जुनाला आडून आडून चिमटे घेऊन पून्हा पुन्हा तेच काहीतरी सुचवत आहेत... :) तर अर्जुना ऐक स्वतः च्या कर्मात लक्ष घातल्याने मोक्ष कसा मिळतो ते मी तुला सांगतो ऐक.
जो प्रेरी भूत-मात्रास ज्याचा विस्तार विश्व हे।
स्व-कर्म-कुसुमी त्यास पूजिता मोक्ष लाभतो॥४६॥
जो सर्व भूतमात्रांच्या मागची प्रेरणा आहे.. हे विश्व् ज्याचा विस्तार आहे अशा परमेश्वराला जो आपल्या कर्म कुसुमांनी पुजतो, त्याला मोक्ष, मुक्ती लाभते..आपण work is worship हे ज़े इंग्रजीत म्हणतो तेच या श्लोकात सांगितले आहे.
उणा हि अपुला धर्म पर-धर्माहुनी बरा।
स्वभावे नेमिले कर्म करी तो दोष जाळितो॥४७॥
हा श्लोक इतका महत्वाचा आहे की हा
दुसऱ्यांदा गीतेत उद्धृत केलेला आढळतो. आपला धर्म काही बाबतीत थोडा उणा जरी असला
तरी परधर्माहून केव्हाही चांगला. जो स्वभाव धर्मानुसार नेमलेले विहित कर्म करतो तो
खऱ्या अर्थाने दोष नष्ट करतो. किंवा परिपूर्ती, पूर्णत्व किंवा मिळवतो.
सहज-प्राप्त ते कर्म न सोडावे सदोष हि।
दोष सर्व चि कर्मांत राहे अग्नींत धूर तो॥४८॥
राखे कुठे न आसक्ति जिंकूनि मन निःस्पृह ।
तो नैष्कर्म्य महा-सिद्धि पावे संन्यास साधुनी॥४९॥
हे अर्जुना, सहज प्राप्त असे ज़े कर्म असते ते सदोष असले तरीही त्याचा त्याग करू नये. जसा अग्नीत
धूर ही अंतर्भूत असतो तसेच कर्मात दोष असणे स्वाभाविक आहे.
श्रीकृष्ण पुढच्या काही श्लोकांत
अर्जुनाला आता अगदी नेमके काय कर ते सांगतात. गंमत आहे, श्रीकृष्णांनी पूर्वपक्ष करून, अर्जुनाला त्याने विचारलेल्या, न
विचारलेल्या प्रश्नांची अगदी सविस्तर उदाहरणासहित उत्तरे दिली आहेत. तरीही ते या सगळ्याचे सार, पुन्हा एकदा अत्यंत प्रभावीपणे
सांगतात. विनोबांनीही अत्यंत सुंदर शब्दात हे लिहीले आहे... लक्षपूर्वक वाचा.
सिद्धीस लाभला ब्रह्म गांठी कोण्यापरी मग।
ज्ञानाची थोर ती निष्ठा ऐक थोडांत सांगतो॥५०॥
हे अर्जुना, ब्रह्मपद, निर्वाणावस्था गाठण्याची, किंवा नैष्कर्म सिद्धीज्ञान योगाची निष्ठा किंवा चरमसीमा काय आहे ती मी तुला सांगतो.
बुद्धि सात्त्विक जोडूनि धृतीचा दोर खेचुनी।
शब्दादि-स्पर्श टाळूनि राग-द्वेषांस जिंकुनी॥५१॥
चित्त वाचा तनू नेमी एकांती अल्प सेवुनी।
गढला ध्यान-योगात दृढ वैराग्य लेउनी॥५२॥
बळ दर्प अहंकार काम क्रोध परिग्रह।
ममत्वासह सोडूनि शांतीने ब्रह्म आकळी॥५३॥
हे ज़े कृष्णांनी सांगितलं आहे ते एका गुटीसारखे आहे. यात त्यांनी आधी जितक्या गोष्टी, त्यांचे त्रिगुणी प्रकार सांगितले त्या सर्वांचा वापर करून, शेवटी कुठे आणि कसे पोहोचायचे त्याचे सूत्र म्हणजे हे श्लोक आहेत. पुढे श्रीकृष्ण ब्रह्मस्थितीला पोहोचल्यावर काय काय होईल ते सांगतात.
ब्रह्म झाला प्रसन्नत्वे न करी शोक कामना।
पावे माझी परा भक्ति देखे सर्वत्र साम्य जी॥५४॥
भक्तीने तत्त्वता जाणे कोण मी केवढा असे।
ह्यापरी मज जाणूनि माझ्यात मिसळे मग॥५५॥
करूनि हि सदा कर्मे सगळी मज सेवुनी।
पावे माझ्या कृपेने तो अवीट पद शाश्वत॥५६॥
अशा प्रकारे ब्रह्मस्थितीला
पोहोचलेला व्यक्ती,
जो प्रसन्न राहून कुठलाही शोक करत
नाही, कुठलीही कामना ठेवत नाही.. त्याला माझ्या पराभक्तीत लीन झाल्याने सर्वत्र
साम्य, सारखेपणा दिसतो. समत्व दृष्टी प्राप्त होते. जो भक्तीने मला तत्वतः जाणतो. मी कोण आहे, केवढा आहे हे जो जाणतो
तो माझ्यातच मिसळून जातो. अशी व्यक्ती सगळी कर्मे स्वतः करूनही
मला अर्पण करते आणि माझ्या कृपेनें अवीट शाश्वत पदाला पोहोचते.
पुढे परमेश्वर अर्जुनाला स्पष्ट शब्दात काय कर, ते सांगतात.
मज मत्पर-वृत्तीने सर्व कर्मे समर्पुनी।
समत्व न ढळू देता चित्त माझ्यात ठेव तू॥५७॥
मग सर्व भये माझ्या कृपेने तरशील तू।
मीपणे हे न मानूनि पावशील विनाश चि॥५८॥
अर्जुना, सर्व कर्मे मत्पर वृत्तीने मला
अर्पण करून,
समबुद्धि ढळू न देता तू तुझं चित्त पूर्णपणे माझ्यात ठेव. अर्जुना हे ज़े मी तुला सूत्र सांगितले आहे ते जर तू आचरणात आणलेस तर माझ्या कृपेनें सर्व भयांतून
तरून जाशील.
पण जर मी पणा आणि अहंकार बाळगशील आणि या सगळ्याकडे दुर्लक्ष करशील तर विनाश
पावशील. (मला श्रीकृष्णांच्या या धमकीचे हसू येतेय... पहिल्यांदाच त्यांनी अशी कडक
भाषा वापरली आहे.)
म्हणसी मी न झुंजे चि हे जे मीपण घेउनी।
तो निश्चय तुझा व्यर्थ स्वभाव करवील चि॥५९॥
स्वभाव-सिद्ध कर्माने आपुल्या बांधिलास तू।
जे टाळू पाहसी मोहे अवश्य करिशील ते॥६०॥
श्रीकृष्ण आता निर्वाणीचे बोलतात. मूळ मुद्यावर येतात. स्वतःला शहाणा
समजून, अर्जुना, तू तुझ्या 'मी' पणामुळे, अहंकाराने जर मी लढणार
नाही असे म्हणत असशील तर तो तुझा निर्णय व्यर्थ आहे कारण तुझा 'स्व'भाव तुला लढायला भाग पाडेल.
राहिला सर्व भूतांच्या हृदयी परमेश्वर।
मायेने चाळवी त्यास जणू यंत्रांत घालुनी॥६१॥
त्याते चि सर्व-भावे तू जाई शरण पावसी।
त्याच्या कृपा-बळे थोर शांतीचे स्थान शाश्वत॥६२॥
अर्जुना, अरे सर्व भूत मात्रांच्या ठायी त्यांच्या हृदयात परमेश्वर वसत असतो...(खूप सुंदर वचन आहे म्हणून मूळ संस्कृत मध्येही देत आहे )..
ईश्वरः
सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति।
शरीर रुपी यंत्राचा वापर करून मी
हृदयस्थ परमेश्वर सर्व कर्मे करून घेत असतो. पुढचा श्लोक हा खूप interesting आहे. इतके सगळे थेट सांगूनही अजून कृष्ण काय सांगतात ते पहा.
असे गूढाहुनी गूढ बोलिलो ज्ञान मी तुज।
ध्यानी घेऊनि ते सारे स्वेच्छेने योग्य ते करी॥६३॥
आता अर्जुना, गूढातील गूढ असे ज्ञान मी तुला सांगितले. या सगळ्याचा तू नीट विचार कर. हे
सगळं नीट ध्यानात घेऊन स्वेच्छेने योग्य तो निर्णय घे. पुढेही श्रीकृष्ण थांबत नाहीत. अर्जुनाला समजावण्याच्या प्रयत्नाच्या अंतिम चरणात अजूनही त्यांना काही सांगायचे आहे.
श्रीकृष्णांनी अर्जुनावर निर्णय सोडल्यासारखे जरी दाखवले असले तरी त्यांना मानवी स्वभावाची पूर्ण
कल्पना आहे. माणसाला आश्वासन हवे असते... जास्त वेळ न दवडता अर्जुन उत्तर
देण्याआधीच
ते त्याला हे आश्वासन देतात.
सर्व गूढांतले गूढ पुन्हा उतम वाक्य हे।
हितार्थ सांगतो ऐक फार आवडसी मज॥६४॥
प्रेमाने ध्यास घेऊनि यजी मज नमी मज।
प्रिय तूमिळसी माते प्रतिज्ञा जाण सत्य ही॥६५॥
सगळे धर्म सोडुनि एका शरण ये मज।
जाळीन सर्व मी पापे तुझी शोक करू न्को॥६६॥
अर्जुना, आतापर्यंत तुला ज़े गूढ ज्ञान दिले त्यातील सर्वात उत्तम वाक्य मी तुला आता
सांगतो... तू मला फार आवडतोस, माझा लाडका आहेस म्हणून तुझ्या हितार्थ सांगतो....
(मित्रावर प्रेम असाव तर असं!) प्रेमाने माझा ध्यास घेऊन, तू माझे पूजन, नमन, भक्ती कर. असे केल्याने तू मलाच येऊन मिळशील हे
मी प्रतिज्ञा पूर्वक सांगतो. लक्षात घ्या...'प्रतिज्ञा' हा शब्द. श्रीकृष्ण फोल आश्वासन देत
नाहीत तर प्रतिज्ञापूर्वक सांगतात.... सगळे विकल्प, शंका, विचलित करणारे विचार
सोडून तू मला शरण ये..तुझ्या सर्व पापांचा मी नाश करीन... कुठलाही शोक करू नकोस. किती मोठे
वचन!!!! श्रीकृष्णांनी
आश्वासन दिले,
वचन दिले,
प्रतिज्ञा केली...मी मंत्र मुग्ध झाले आहे हा संवाद शब्दांकित करताना!
न कथी हे कधी त्यास तपो-हीन अभक्त जो।
श्रवणेच्छा नसे ज्यास माझा मत्सर जो करी॥६७॥
सांगेल गुज हे थोर माझ्या भक्त-गणांत जो।
तो त्या परम भक्तीने मिळेल मज निश्चित॥६८॥
कोणी अधिक त्याहूनि माझे प्रिय करी चि ना।
जगी आवडता कोणी न होय मज त्याहुनी॥६९॥
श्रीकृष्ण पुढे सांगतात.. ज़े तपोहीन,
अभक्त, श्रद्धाहीन आहेत, ज्यांना हे सगळे ऐकण्यात रस नाही, ज़े माझा द्वेष
करतात त्यांना हे ज्ञान सांगण्याच्या फंदात पडू नये.
पुढचे दोन श्लोक श्रीकृष्णांनी
माझ्यासाठी लिहिलें आहेत... अर्थात लेखनाची सुरुवात करताना मला हे काही माहित
नव्हते.
श्रीकृष्ण म्हणतात, जो कोणी हे गुज माझ्या भक्तगणांत
सांगेल, तो त्याच्या परम भक्तीने मला प्राप्त होईल. जगात
याहून दुसरे अधिक प्रिय कर्म नाही आणि मला जगात अशा व्यक्तीहून प्रिय दुसरे कोणी
नाही. नकळत मी कृष्णाच्या प्रिय व्यक्तींपैकी एक होणार की काय...कृष्णप्रिया! हा विचारच
मनाला सुखावून गेला.
हा धर्म-रूप संवाद जो अभ्यासील आमुचा।
मी मानी मज तो पूजी ज्ञान-यज्ञ करूनिया॥७०॥
हे ऐकेल हि जो कोणी श्रद्धेने द्वेष सोडुनी।
पावेल कर्म-पूतांची तो हि निर्वेध सद्-गति॥७१॥
भगवंत म्हणतात, हा आपल्यातला धर्म रूप संवाद ज़े अभ्यासतील, ते पर्यायाने
गीताभ्यासाच्या ज्ञानयज्ञाने माझे पूजन करतील. जो कोणी श्रद्धेने, कुठलाही आकस, पूर्वग्रह न ठेवता हे ज्ञान ऐकेल तो ही निर्वेध सद्गति पावेल.
संपूर्ण गीतेत अर्जुनाने एकापेक्षा एक सुंदर, बुद्धिमान प्रश्न विचारलेले आपण पाहिले. त्यातून कसे सुंदर ज्ञान उलगडत गेले ते पाहिले. आता श्रीकृष्ण अर्जुनाला एकच आणि त्यांचा गीतेतला एकमेव प्रश्न विचारतात.
तू हे एकाग्र चित्ताने अर्जुना ऐकिलेस की।
अज्ञान-रूप तो मोह गेला संपूर्ण की तुझा?॥७२॥
अर्जुना मी तुला आत्तापर्यंत ज़े
सांगितलं ते तू एकाग्र चित्ताने ऐकलंस का? आता मला तू सांग तुझा अज्ञानरूप मोह
संपूर्णपणे गेला का?
या वर अर्जुन म्हणतो -
मोह मेला चि तो देवा कृपेने स्मृति लाभली।
झालो निःशंक मी आता करीन म्हणसी तसे॥७३॥
हे देवा माझा मोह हे सगळे ऐकून आता नष्ट झाला आहे. तुझ्या
कृपेनें माझी स्मृति मला परत लाभली आहे.मी आता निःशंक होऊन तू म्हणतो तसेच
करतो....अर्जुनाच्या मनातील संशयाचे जाळे आता फिटले आहे तर!!!
इथे एक शब्द अधोरेखित करावासा वाटतो, तो म्हणजे 'निःशंक'!! कुठलाही महत्वाचा निर्णय घेताना आणि
देताना सर्व शंकांचे निरसन होणे फार महत्वाचे असते. निःशंकपणे निर्णय घेण्याआधी योग्य प्रश्न विचारून योग्य
माहिती, ज्ञान गोळा करावे लागते. परंतु कोणाकडून? तर योग्य व्यक्ती कडूनच.
अर्जुनाच्या या उत्तराबरोबर श्रीकृष्ण
आणि अर्जुन यांच्यातला हा अदभूत संवाद संपतो. हे सगळे हजारो वर्षानंतर वाचताना आणि
लिहिताना मी मंत्रमुग्ध झाले आहे, तर हे सगळे थेट ऐकत आणि पाहात असलेल्या संजयाची
काय स्थिती झाली असेल विचार करा...पाहू संजय काय म्हणतोय.
असा कृष्णार्जुनांचा हा झाला संवाद अद्भुत।
थोरांचा ऐकिला तो मी नाच्वी रोम रोम जो॥७४॥
व्यास-देवे कृपा केली थोर योग-रहस्य हे।
मी योगेश्वर कृष्णाच्या मुखे प्रत्यक्ष ऐकिले॥७५॥
हा कृष्णार्जुन-संवाद राया अद्भुत पावन।
आठवूनि मनी फार हर्षतो हर्षतो चि मी॥७६॥
स्मरूनि बहु ते रूप हरीचे अति अद्भुत।
राया विस्मित होऊनि नाच्तो नाच्तो चि मी॥७७॥
संजय म्हणतो, असा श्रीकृष्णांचा आणि अर्जुनाचा
अद्भुत संवाद ऐकताना माझा रोम रोम नाचतो आहे. व्यास देवांनी माझ्यावर एवढी कृपा केली की हे
थोर योग रहस्य मी प्रत्यक्ष योगेश्वर कृष्णाच्या मुखातून स्वतः ऐकलं. असा हा कृष्णार्जुनाचा
अद्भुत पावन संवाद पुन्हा पुन्हा आठवून
मी मनोमन आनंदून गेलो आहे. कृष्णाचे अति अद्भुत रूप आठवून मी आश्चर्य चकित
होऊन आनंदाने नाचतो आहे......
संजयाची ही अवस्था मी अगदी समजू
शकते. त्याला किती कृतार्थ वाटत असेल याची जाणीव आहे.
आता शेवटचा श्लोक.... धृतराष्ट्राने न विचारलेल्या प्रश्नाच संजयाने दिलेलं उत्तर....ज़े अजरामर झाले.
योगेश्वर जिथे कृष्ण जिथे पार्थ धनुर्धर।
तिथे मी पाहतो नित्य धर्म श्री जय वैभव॥७८॥
जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा पार्थ आहे, तिथेच श्री, विजय, विभूती आणि अचल नीती आहे.
यत्र
योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः।
तत्र
श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम॥१८-७८॥
काय सांगू! हिमालयाच्या सर्वात उंच
शिखरावर मी या क्षणाला उभी आहे.. एक मोठे ध्येय साध्य केल्याच्या अनुभूतिने तृप्त आहे.... जो कठीण चढ मी चढून वर आले तो मी
खरेच चढले का
या विचाराने मन अचंबित झाले आहे... माझा माझ्यावरच विश्वास बसत
नाहीये.. मी खरेच या शिखरावर पोहोचले... डोळे आनंदाश्रूंनी भरले आहेत.. अंतःकरण सद्गदित झाले आहे. इथून मला मी पार केलेली अठरा
योग शिखरे उन्हात चमकताना दिसत आहेत.... खरेच वाटत नाही,की या प्रत्येक शिखराला मी स्पर्श केला....
या विजयी क्षणात फक्त मी आहे.. भगवान
कृष्ण आहेत आणि माझ्यातच दडलेला अर्जुन आहे. शिखर गाठणे ही प्रवासाची सांगता नसते... तो
परमोच्च बिंदू असतो... जिथून स्वतःच प्रेरणा घ्यायची असते पुढच्या
गिर्यारोहणाची... माझ्या
आयुष्यातील हा कृतार्थ आणि समृध्द क्षण माझ्या लाडक्या श्रीकृष्णा चरणी
अर्पण....
श्रीकृष्णार्पणमस्तु!
अलका देशपांडे
No comments:
Post a Comment