गीताई : अध्याय ४ - ज्ञानसंन्यास योग



गीतेच्या तिसऱ्या अध्यायात आपण कर्मयोगाविषयी भगवान श्रीकृष्णांनी केलेले मार्गदर्शन वाचले. त्यापुढे प्रत्येक अध्यायात भगवान दिव्य ज्ञानाची नवनवी दालने उघडत जातात. ज्ञानसंन्यास या अध्यायाची सुरुवात श्रीकृष्ण या योगाची छोटीशी पार्श्वभूमी सांगून करतात, ती अशी

योग हा अविनाशी सूर्यास मी बोललो
मनूस बोलिला सूर्य, तो इक्श्वाकु स त्यापरी
अशा परंपरेतूनी हा राजर्षीस लाभला
पुढे काळ-बळाने तो ह्या लोकी योग लोपला
तो ची हा बोलिलो आज तूज योग पुरातन
जीवीचे गूज हे थोर, तू ही भक्त सखा तसा

कृष्ण म्हणतात की हा योग मी सर्वात प्रथम सूर्याला सांगितला, त्याने तो मनू ला सांगितला आणि मनूने तो इक्श्वाकु ला सांगितला. इतका हा पुरातन योग आहे. काळाच्या ओघात हा योग हळू हळू विस्मृतीत गेला, लोप पावला. हा अतिशय जुना आणि अविनाशी असा योग हे अर्जुना मी तुला सांगणार आहे.
इथे मला शेवटच्या ओळीवर लक्ष वेधायचे आहे
जीवीचे गूज हे थोर, तू ही भक्त सखा तसा

कृष्ण या दिव्य ज्ञानाला जीवीचे गूजअसे म्हणतात, म्हणजे अगदी खास secret. आणि अर्जुन हा त्यांचा प्रिय मित्र आहे, त्याच्याशी ते हे जीवीचे गूज’ share करतात. डोळ्यांसमोर दोन जिवलग मित्र एकमेकांशी काहीतरी खास बोलत असावेत असं दृश्य उभे  राहते. कृष्ण अर्जुनाला नुसतं भक्त म्हणत नाहीत तर त्याला सखा म्हणजे मित्र म्हणतात. कृष्ण हा देव असूनही मैत्री हे नातं त्याच्यासाठी किती खास आहे पहा. मग तो सुदामा असो, पेंद्या असो की अर्जुन.

अर्जुन पुढे अगदी तुम्ही आम्ही विचारू इतका साधा प्रश्न विचारतो, सूर्य, मनू, हे सगळेच जुने पुराणकाळात जन्मून गेलेले. तू आज कालचा माझ्या जमान्यातला. तू कसा काय त्यांना योग सांगितलास? Almost काहीतरीच काय सांगतोस! असा सूर असणारा हा प्रश्न

ह्या काळचा तुझा जन्म, सूर्याचा तो पुरातन
तू बोललास आरंभी, हे मी जाणू कसे बरे?

याचे  उत्तर भगवान पुढील प्रमाणे देतात

माझे अनेक त्यापूर्वी झाले जन्म तसे तुझे
जाणतो सगळे मी ते अर्जुना तू न जाणिसी
असूनही अजन्मा मी निर्विकार जगत प्रभूं
माझी प्रकृती वेढूनी, मायेने जन्मतो जणू

आता कृष्णाने हळू हळू आपली खरी ओळख करून द्यायला सुरुवात केली. कृष्ण म्हणतात, मी खरं तर अजन्मा आणि निर्विकार आहे. म्हणजेच मी स्थिर, शाश्वत, जन्म-मृत्यूच्या पलीकडची शक्ती आहे. पण मी प्रकृती म्हणजे निसर्ग, material यांच्या बरोबर संयोग पावून जन्म घेत असतो, शरीर रूपात प्रकटत असतो.
या पुढचे दोन श्लोक हे केवळ जगप्रसिद्धच नाहीत तर ते श्री कृष्णाने अखिल भारतवर्षाला दिलेलं फार मोठे अभिवचन, आश्वासन, promise आहे. आणि भारताचा इतिहास पाहिला तर श्रीकृष्णाने हे वचन खरंच पाळलं आहे.
 इथे मला मूळ संस्कृत श्लोक लिहिण्याचा मोह आवरत नाहीये

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌॥ ४-७ ॥
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ ।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥

हे अर्जुना, जेव्हा जेव्हा या भारतवर्षात धर्माचा ऱ्हास होतो आणि अधर्म प्रबळ होऊ लागतो तेव्हा तेव्हा मी दुष्कृत्यांचा नाश करण्यासाठी, चांगल्या लोकांना तारून नेऊन धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रत्येक युगात वेळोवेळी जन्म घेत असतो.

What a promise!

या पुढच्या काही श्लोकात श्रीकृष्णांनी आपल्या स्वतः च्या स्वरूपाविषयीच्या काही hints अर्जुनाला दिल्या आहेत

नाही तूला भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय
झाले ज्ञान तपे चोख अनेक मज पावले
भजती मज जे जैसे, भजे तैसाचि त्यांस मी
माझ्या मार्गास हे येती लोक कोणीकडूनही

एक साधे  ज्ञान त्यांनी अर्जुनाला सांगितलं की मी एक चिरंजीवी शक्ती आहे... कुठलीही भीती, राग, लालसा असे विकार न बाळगता जो माझी सेवा/उपासना करतो तो माझ्या पर्यंत सहज पोहोचतो. पण पुढच्या ओळी जास्त महत्वाच्या आहेत.
इथे कृष्ण म्हणतात भजती मज जे जैसे, भजे तैसाचि त्यास मी’’ जो माझी भक्ती करतो त्याचा मी ही भक्त बनतो. परमेश्वर भक्ताचा भक्त बनतो. क्या बात है ! मला कृष्णाचे  हे बोलणं फार आवडलं. पुढे कृष्णाने अजून विस्ताराने सांगितलंय..


निर्मिले वर्ण मी चारी, गुण कर्मे विभागूनी
करुनी सर्व हे जाण अकर्ता निर्विकार मी
कर्मे न बांधिती मा ते फळी इच्छा नसे मज
माझे स्वरूप हे जाणे तो कर्मातही मोकळा


इथे श्रीकृष्णाने आपण चार गुणकर्मांची विभागणी कशी केली आहे, हे सांगून आपण सगळं काही करूनही कसे निर्लेप अकर्ता आहोत हे वर्णन केले  आहे.
श्रोकृष्ण म्हणतात, मला ही कर्म बांधून ठेवत नाहीत, मला यातून कुठल्याही फळाची अपेक्षा नाही. ज्याला माझ्या या स्वरूपाचे  ज्ञान होते  तो कर्म करूनही त्याच्या बंधनातून मोकळा होतो. सोपे  करून सांगायचे म्हणजे कृष्ण स्वतःच उदाहरणं देऊन पुन्हा एकदा फळाची अपेक्षा न करता कर्म करण्याची संकल्पना अधोरेखित करतात.
पुढच्या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला या विषयाचे सखोल ज्ञान देतात

नेणती जाणते ते हि काय कर्म अकर्म हे
तूज ते सांगतो कर्म जाणुनी सुटशील जे
सामान्य कर्म जाणावे विकर्म हि विशेष जे
अकर्म ते हि जाणावे कर्माचे तत्व खोल हे


इथे श्रीकृष्ण कर्माचे तीन प्रकार सांगतात. कर्म, अकर्म आणि विकर्म.
सोपे  करून सांगायचे  तर कर्म म्हणजे नेहमीचे  कृत्य, काम, क्रिया.. अकर्म ही क्रिया हीनता, काहीच कर्म न करणे . तर विकर्म म्हणजे जे करू नये असे कर्म, दुष्कर्म अथवा वाईट काम.
भगवान या पुढे म्हणतात

कर्मी अकर्म जो पाहे अकर्मी कर्म जो तसे
तो बुद्धिमंत लोकांत तो योगी कृत कृत्य तो

थोडे  गोंधळायला होते आहे. पण थोडा शांतपणे विचार केला की लक्षात येते 
सर्व कर्म करूनही जो काहीच केले  नाही या भावनेने जगतो आणि निष्कर्मात किंवा अकर्मातही ज्याला कर्म घडवून आणता येते तो खरा बुध्दिमंत आणि योगी पुरुष असतो.
आपल्या पुरता विचार करायचा झाला तर आपली प्रत्येक कृती आणि आपण न केलेली कृती यातली फलेच्छा, आपले  त्या कृतीला जडून, चिकटून राहणे, त्याला लटकून राहणे  या आपल्या स्वभावाचा आपण खोलवर विचार केला पाहिजे. हळू हळू साधनेने, अभ्यासाने आपण ही अलिप्तता आणू शकतो.

Attached but detached. There but not there. Not there but still there. Involved but still aloof
अगदी कमल पत्रासारखे  निर्लेप झालो तरच आपण परमेश्वरा जवळ जा शकतो, त्या शक्तिरूपाला ओळखू शकतो असं मला वाटते . पुढे हेच समजावण्यासाठी भगवान छान उदाहरण देतात

उद्योग करितो सारे काम संकल्प सोडूनि
ज्ञानाने जाळिली कर्मे म्हणती त्यास पंडित
नित्य तृप्त निराधार न राखे फल वासना
गेला गढुनी कर्मात तरी काही करी ची ना

हा श्लोक वाचताना एखादी मूर्ती घडवणारा शिल्पकार किंवा एका भव्य लेण्याचे खोदकाम करणारा, एखादा ताजमहालाचे कोरीवकाम करणारा अनाम शिल्पकार डोळ्यासमोर येतो. तो त्यांच्या कामात इतका गढलेला, तद्रूप झालेला असतो की त्याला कशाचच भान नसतं. ते कोरीवकाम पुढे किती वर्ष टिकणार, कोण कोण त्याला पाहणार, कोणी त्याचे कौतुक करणार की त्यावर टीका करणार या कशाचाही विचार न करता, त्याच्याशी काही देणं घेणं न ठेवता आपल्या कलेच्या, नैपुण्याच्या ज्ञानाच्या योगाने ते कर्म करत असतो तो एखाद्या पंडिता सारखा असतो. सर्व करूनही त्यात नसलेला.
पुढच्या काही श्लोकांत श्रीकृष्णाने वेगवेगळे लोक वेगवेगळ्या प्रकारे यज्ञ, जप, तप, इंद्रियांचे संयमन करून, समाधी लावून, प्राण अपान यांचे नियमन करून, उपास तापास करून नानाविध कर्मे करत असतात याचे  वर्णन केले  आहे. पण पुढे श्रीकृष्ण या सगळ्यांवर कडी करणारे  तत्वज्ञान सांगतात

द्रव्य - यज्ञादिकाहूनि ज्ञान - यज्ञ ची थोर तो
पावती सगळी कर्मे अंती ज्ञानात पूर्णता


सर्व प्रकारच्या यज्ञाहून ज्ञान यज्ञ सर्वात श्रेष्ठ आहे असे भगवान सांगतात. कर्माची पूर्तता ज्ञानात होते हे किती खरे आहे नाही! आपण जे जे कर्म करतो ते शेवटी आपल्यात अनुभव रूपातील ज्ञान साठून राहते आणि कायम आपल्या बरोबर राहते.
पुढे श्रीकृष्ण ज्ञानाचे  महत्व अधिक अधोरेखित करतात

संपूर्ण पेटला अग्नी काष्ठे जाळुनी टाकितो
तसा ज्ञानाग्नी तो सर्व कर्म जाळुनी टाकितो
ज्ञानासम नसे काही पवित्र दुसरे जगी
योग युक्त यथा काळी ते पावे अंतरी स्वये
श्रद्धेने मेळवी ज्ञान संयमी नित्य सावध
ज्ञानाने शीघ्र तो पावे शांती शेवटची मग


किती छान विश्लेषण केले  आहे. जशी आग लाकडं जाळून टाकते तसे  ज्ञान कर्माना जाळून टाकते. Action is important but knowledge is even more important as knowledge drives actions. जगात ज्ञानाहून पवित्र असं काहीच नाही. ज्ञान कसं मिळवावं तर श्रद्धेने. एखादा संशोधन करणारा संशोधक त्या गूढ ज्ञानाच्या शोधत असतो, प्रयत्नांती काही तरी सापडेल अशी दुर्दम्य आशा/श्रद्धा हा त्या मागचा driving force असतो. अस ज्ञान मिळवण्यासाठी कमालीचा संयम आणि धीर बाळगावा लागतो. इथे अर्थात भगवंतांना सामान्य संसारी ज्ञान अभिप्रेत नसून अध्यात्मिक, पारलौकिक ज्ञान , transcendental knowledge म्हणायचं आहे.
अध्यायाच्या शेवटी भगवान म्हणतात

योगाने झाडिली कर्मे, ज्ञाने संशय तोडिले
जो समाधानी आत्म्यांत, कर्मे त्यास न बांधिती
म्हणुनी अंतरातील अज्ञान कृत संशय
तोडुनी ज्ञान खड्गाने, उठ तू योग साधुनी


सर्व अनुग्रह करून श्रीकृष्ण परत मूळ मुद्यांवर कसे येतात पहा. जी कामे  आपण योगयुक्त होऊन करतो, त्यांच्या पाठीशी ज्ञान उभे  राहते. अशा ठिकाणी कुठलाही संशय, confusion रहात नाही. त्यामुळे हे अर्जुना तुझ्यातल्या अज्ञानाने, निर्माण झालेला संशय ज्ञानाच्या तलवारीने नाहीसा कर आणि उठ आणि युद्धासाठी सज्ज हो.
कमळाची एक एक पाकळी उलगडावी तशी प्रत्येक अध्यायात एकेका नव्या संकल्पनेची उकल होत चालली आहे. पुढच्या अध्यायात काय सांगितलं असेल याच कुतूहल जागृत झालं आहे.
 क्रमशः

अलका देशपांडे 


No comments:

Post a Comment