गीताई : अध्याय ७ - ज्ञान विज्ञानयोग



सहाव्या अध्यायात श्रीकृष्णाने अंतरात्म्याशी स्वतःला जोडून योग कसा साधावा हे सांगितले  आणि ध्यान करण्याची कृती सांगितली. भगवंतांना अर्जुनाला 'योग' या विषयातले ज्ञान आणि विज्ञान पुढे विस्ताराने सांगावसे  वाटले असावे  बहुधा. लाडका मित्र होता ना अर्जुन त्यांचा! या अध्यायात एकूण ३० श्लोक आहेत.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात


प्रितीने आसरा माझा घेऊन योग साधित
जाणशील कसे ऐक समग्र मज निश्चित
विज्ञानासह ते ज्ञान संपूर्ण तूज सांगतो
जे जाणूनी पुढे ते येथे जाणावे से न राहते

या श्लोकाची सुरुवात मला फार भावते. "प्रितीने आसरा माझा... अशी ही सुरुवात आहे. श्रीकृष्ण म्हणतात, परमेश्वरावर प्रीत किंवा प्रेम जडवून योग साधना कशी करता येते हे मी तुला सांगतो. या संर्भातले  ज्ञान आणि विज्ञान हे ही मी तुला आज परिपूर्णपणे सांगतो. ज्ञान म्हणजे सत्य किंवा वास्तव गोष्टीं, त्यांचे अनुभव यांची माहिती आणि विज्ञान म्हणजे निसर्ग आणि नैसर्गिक घडामोडी किंवा भौतिक जगात घडणार्‍या घटनांचा व्यवस्थित अभ्यास. ज्ञान हे माहितीचा किंवा अनुभवाचा संग्रह असतो पण विज्ञान हे त्याच्या मुळाशी जाण्यासाठी केलेला त्याचा अभ्यास असतो. श्रीकृष्ण, प्रकृती म्हणजे काय? प्राणिमात्र, प्रकृती आणि परमेश्वर यांचा काय संबंध आहे याचे  ज्ञान अर्जुनाला देतात.


लक्षावधीत एखादा मोक्षार्थ झटतो कधी
झटणाऱ्यात एखादा तत्वता जाणतो मज

श्रीकृष्ण म्हणतात, लक्षावधीत एखादा कुणीतरी मोक्ष मिळवण्यासाठी झटतो म्हणजे मोक्ष मिळवण्याच्या म्हणजे परमात्म्यात विलीन होण्याच्या मागे लागतो आणि त्यातला ही एखादाच कुणीतरी खऱ्या अर्थाने परमेश्वराला जाणून घेतो.

पृथ्वी आप तसे तेज वायु आकाश पाचवे
मन, बुद्धी, अहंकार अशी प्रकृति अष्ट-धा
ही झाली अपरा माझी दुसरी जाण ती परा
जीव रूपे जिने सारे जग हे धारिले असे

फार फार महत्वाचे श्लोक आहेत हे. श्रीकृष्ण इथे 'अपरा' आणि 'परा' असे प्रकृतीचे दोन भाग सांगतात. त्यात प्रथम त्यांनी 'अपरा' प्रकृतीचे वर्णन केले आहे. 'अपरा' ही बाह्य अष्टधा प्रकृती आहे, जिच्यात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशी पंचमहाभूते  आहेत. ही पंचमहाभूते  व मन, बुद्धी आणि अहंकार अशी सगळी ५+३ आठ तत्व मिळून 'अपरा' ही अष्टधा प्रकृती निर्माण होते. पुढे श्रीकृष्ण म्हणतात, ही माझी 'अपरा' प्रकृती आहे आणि दुसरी जी आहे ती 'परा', जिच्यामुळे प्रत्येक जीवात, आणि निर्जीवातही चैतन्य, energy आहे. ती जीवनरुपी जगाची धारणा माझ्या या 'परा' प्रकृतीतून झालेली आहे. म्हणजे थोडक्यात आपल्यासाठी बोलायचे  तर आपण स्वतः आणि आजूबाजूचे सगळे  जग हे परमेश्वराच्या 'परा' आणि 'अपरा' या प्रकृतींतून निर्माण झालेले आहे. (आपण बरे  नसले की प्रकृती बिघडली असे  का म्हणतो ते आता कळले.)
विश्व=अपरा+परा प्रकृती म्हणजेच
विश्व=पृथ्वी+आप+तेज+वायू+आकाश+मन+बुद्धि+अहंकार+चैतन्य(energy)
म्हणजेच विश्व=आपण स्वतः आणि जीव सृष्टी=परमेश्वर

पुढे भगवान म्हणतात

ह्या दोहींपासुनी भुतें सगळी जाण निर्मिली
साऱ्या जगास तद -द्वारा मूळ मी आणि शेवट

परा आणि अपरा यातून सर्व प्राणिमात्रांची निर्मिती होत असते. ही प्रकृती माझी अभिव्यक्ती असल्याने सर्व गोष्टींचे मूळ आणि शेवट दोन्ही मीच असतो. थोडक्यात आपण पंचमहाभूतं, मन, बुद्धी, अहंकार आणि परा प्रकृती यातून जन्म घेत असतो, म्हणजे ओघाने आपणही परमेश्वरच नसतो का? We are his expression, probably the best expression!


दुसरे तत्त्व नाही चि काही माझ्या पलीकडे
ओवीले सर्व माझ्यात जसे धाग्यामध्ये मणी


श्रीकृष्ण म्हणतात, हे जे मी सांगितले त्या पलीकडे आणखी काहीही नाही. जसे  धाग्यात मणी ओवलेले असतात तसे  सर्व जीवमात्र माझ्यात ओवलेले असतात.

पुढे पहा किती छान दृष्टांत श्रीकृष्णांनी दिले आहेत

पाण्यात रस मी झालो, चंद्र सूर्यि प्रकाश मी
ओम वेदी शब्द आकाशी, पुरुषी पुरुषार्थ मी
मी पुण्य गंध पृथ्वीत, असे अग्नीत उष्णता
प्राणीमात्रांत आयुष्य, तपो वृद्धात मी तप
सर्व भूतात जे बीज, ते मी जाण सनातन
बुद्धिमंतांत मी बुद्धि, तेजसव्यात हि तेज मी

श्रीकृष्ण म्हणतात, पाण्यातला रस मी आहे, चंद्र, सूर्याचा प्रकाश मी आहे . वेदांची सुरुवात ज्या ओम शब्दाने होते तो आकाश व्यापून उरणारा आत्मशक्ती रूप ओमकार मीच आहे. पुरुषाचा पुरुषार्थ मी आहे. मातीचा मृदगंध मी आहे आणि आगीतील उष्णता ही मीच आहे. प्राणीमात्रातला जीव मी आहे, तप करणाऱ्याची तपस्विता मीच आहे. "सर्व भूतांत जे बीज ते मी जाण सनातन" प्राणीमात्रांचा उगम, त्यांचे  बीज मीच आहे. आदि आणि अंत नसलेला, सतत असा सनातन किंवा eternal असा मी आहे. बुद्धिमंतातली बुद्धी आणि तेजसव्यातलं तेज मीच आहे.

या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का?
या इथे अन त्या तिथे ही सांग तू आहेस का?’
आजच्या काळात कवींनी विचारलेल्या प्रश्नाचे  उत्तर हजारो वर्षांपूर्वी भगवंतांनी भगवत गीतेत दिले होते.

माझ्यातुनी तिन्ही झाले सात्विकादिक भाव ते
परि त्यांत मी न राहे तेची माझ्यात राहती

श्रीकृष्ण म्हणतात सत्व, रज, तम हे तीनही भाव माझ्यातून निर्माण होतात. ते माझ्यात राहतात पण मी त्यांच्यात रहात नाही. भगवंत पुढे म्हणतात, की या तिन्ही गुणांनी विश्व मोहून टाकलेले आहे. त्यामुळे लोकांना मला नीट ओळखता येत नाही. माझ्या त्रिगुणांच्या 'माये'मुळे, त्रिगुणांच्याही वर असलेल्या माझ्या अनादि, सनातन, नित्य रूपाला ते जाणत नाहीत. 

ह्या गुणात्मक भावांनी विश्व हे मोहूनी टाकिले
त्यामुळे मी न जाणू ये गुणातीत सनातन
 पुढे श्रीकृष्ण म्हणतात,
माझी ही त्रिगुणी दैवी माया न तरवे कुणा
कासेस लागले माझ्या तेची जाती तरोनिया


या सत्व, रज, तम, गुणांच्या मीच निर्माण केलेल्या मायेत फसलेले जीव हा भवसागर तरून जाऊ शकत नाहीत. परंतु जे माझ्यामध्ये समर्पित  झालेले आहेत, असे जीव मात्र तरून जाऊ शकतात. पुढे श्रीकृष्णांनी चार प्रकारचे भक्त सांगितले आहेत.


भक्त चौघे सदाचारी भजती मज अर्जुना
ज्ञानी तसेची जिज्ञासु हितार्थी आणि विव्हल


आपणही असे चार प्रकारचे भक्तगण बघतो. श्रीकृष्णाने या सगळ्यांची category तेव्हाच ओळखली होती. ज्ञानी भक्त ते ज्यांनी  आधीच ज्ञान विज्ञानाचे  आकलन केलेले आहे. जिज्ञासू भक्त ते, ज्यांना जाणून घ्यायची, ज्ञान मिळवण्याची इच्छा आहे. हितार्थी भक्त ते, जे आपला काहीतरी लाभ व्हावा म्हणून आलेले आहेत आणि विव्हल भक्त ते, जे पीडित अथवा दु:खी किंवा दुःखाने जर्जर आहेत आणि त्यातून त्यांना सुटका हवी आहे.
पुढे श्रीकृष्ण म्हणतात
ज्ञानी वरिष्ठ सर्वात नित्य युक्त अनन्य जो
अत्यंत गोड मी त्यास तो ही गोड तसा मज



या चार प्रकारच्या भक्तातला ज्ञानी भक्त परमेश्वराला सर्वात प्रिय वाटतो.


श्रद्धेने ज्या स्वरूपास जे भजू इच्छिती जसे
त्यांची ती चि तशी श्रद्धा स्थिर मी करितो स्वये


म्हणजे श्रीकृष्ण मलाच भजा असं सांगत नाहीत. ते म्हणतात श्रद्धा ठेवून तुम्ही आत्मशक्तीच्या ज्या स्वरूपाचे पूजन करता, त्या ठिकाणी तुमची श्रद्धा स्थिर करण्याचे काम मी करतो. आपल्याकडे परमेश्वराला किती विविध रूपात पाहिले जाते  आणि पुजले जाते , कारण प्रत्यक्ष भगवंतांनी आश्वासन दिले आहे की कुठल्याही रुपात श्रद्धेने पूजा करा.ती माझ्यापर्यंत पोचेल.

व्यक्त मी हे चि घेती बुद्धि हीन न जाणुनी

अव्यक्त थोर जे रूप माझे अंतिम शाश्वत
वेढीला योग मायेने अंधारची जगास मी
अजन्मा नित्य मी कैसा मूढ कोणी न ओळखे
झाली जीं जीं हि होतील भुतें आहेत आज जीं
सगळी जाणतो ती मी मज कोणी न जाणती

परमेश्वर म्हणतात की माणसे  फक्त माझ्या देहधारी रूपाला पाहतात. त्या पलीकडचे  माझे  अव्यक्त असे  अंतिम आणि शाश्वत रूप जाणून घेत नाहीत. मी योगमायेने या विश्वात अंधार रूपाने वेढलेला आहे इतका मी अनादि आणि सनातन आणि अजन्मा म्हणजे ज्याला आदि किंवा सुरुवात नाही, असे  माझे  रूप सामान्य मूढ लोकांना ओळखू येत नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचे  रूप मी जाणतो. पण माझ्या अस्तित्वाचे  खरे  रूप ते जाणत नाहीत.


अधिभूताधिदैवांत अधियज्ञात जे मज
देखती ते प्रयाणी हि जाणती मज सावध

ज्या व्यक्ती हे जाणतात की सर्वाठायी फक्त मीच आत्मशक्तीच्या रूपात वास करतो ते शेवटी मला येऊन मिळतात.



हा योग मला एक वेगळीच अंतर्दृष्टी देणारा वाटला. आपल्या अवतीभोवतीच्या भौतिक जगाचा आणि आपल्या आत्मशक्तीचा, अपरा आणि परा प्रकृतीचा काय संबंध आहे?....आपण कोण आहोत? ....आणि परमेश्वर किंवा ती शक्ती कोण आहे? कशी आहे? या अनेक सतत पडणाऱ्या प्रश्नांची उकल या अध्यायात होते. अर्थात नावाप्रमाणे हा ज्ञान विज्ञान योग आहे. ज्ञान म्हणजे माहिती, अनुभव आणि विज्ञान म्हणजे माहितीचा, अनुभवाचा सखोल अभ्यास करणे. पण फक्त एवढे माहीत होऊन चालणार नाही. तेव्हा याचा सखोल अभ्यास करून, चिंतन करून ते ज्ञान आपल्या वागण्या-बोलण्यात, आपल्या जगण्याच्या पद्धतीत व्यक्त होऊ लागेल तेव्हा खऱ्या अर्थाने हा योग समजला असे  म्हणू शकतो.

खूप समाधानी आणि छान वाटत आहे हे लिहून.



क्रमशः

अलका देशपांडे


No comments:

Post a Comment