गीताई : अध्याय ८ - अक्षरब्रम्ह योग



गीतेच्या सातव्या अध्यायात आपण श्रीकृष्णांनी  अर्जुनाला सृष्टीच्यापराअपराप्रकृतीविषयीचे ज्ञान विज्ञान सांगितलेले पाहिले. या योगाचा शेवट भगवान "अधिभूताधिदैवांत अधियज्ञात जे मजदेखती ते प्रयाणी ही जाणती मज सावध" या श्लोकाने करतात. अर्जुन किती लक्षपूर्वक ऐकतो आहे पहा... त्याला प्रकृतीचीपरा-अपरारूपे  चटकन लक्षात आली. पण एक प्रश्न होता तो शेवटच्या श्लोकाचा... हा श्लोक अर्जुनाला नीट कळला नाही आणि आपल्यालाही) तेव्हा अर्जुन कृष्णाला या एकाच श्लोकांविषयी सात प्रश्न एका धडाक्यात विचारतो, पहा कसे...

ब्रम्ह ते बोलीले कायकाय अध्यात्म? कर्म ते?
अधी-भूत कसे सांग? अधी-दैवही ते असे?
अधी-यज्ञ कसा कोण ह्या देही बोलीला असे?
प्रयाणी ही कसे योगी निग्रही तुझं जाणती?

पहा प्रश्नचिन्हे  आहेत. योग्य प्रश्न विचारल्याशिवाय ज्ञान मिळत नाही याचं हे उदाहरण आहे. त्यामुळे नेहमी प्रश्न विचारणे महत्वाचे. तर अर्जुन विचारतो "हे ब्रम्ह काय आहे?, अध्यात्म काय आहे? कर्म काय आहे? अधी-भूत कसे असते? अधी-दैव कसा असतो? अधी-यज्ञ या देही कसा असतो? आणि मृत्यूसमयी कोण निग्रही योगी लोक तुला येऊन मिळतात?

चार ओळीत सात प्रश्न आणि श्रीकृष्णांनी सहा  ओळीत दिलेली उत्तरे  पहा. हे दिव्य ज्ञान आहे. अर्जुनामुळे हजारो वर्षांनंतर आपल्याला ह्याची तयार उत्तरे वाचायला मिळताहेत, हे महत्वाचे!

ब्रह्म अक्षर ते थोर अध्यात्म निज भाव तो
भूत-सृष्टी घडे सारी तो जो व्यापार कर्म ते
अधी-भूत विनाशी ते जीवत्व अधी-दैवत
अधि- यज्ञ असे मी चि ह्या  देही यज्ञ पूत जो


 श्रीकृष्ण म्हणतात -
१) ब्रम्ह म्हणजे आत्मशक्ती, आत्मा हा महान आणि अक्षरआहे; म्हणजे ज्याचा नाश करता येणार नाही असा सनातन अमर आहे.
२) अध्यात्म हा जीवसृष्टी ठायी असलेला तिचा स्व भाव आहे, जीवात्म्याचा मूळ भाव किंवा गुणधर्म आहे.
३) जीव सृष्टीचा जो चलनवलनाचा व्यापार आहे ते कर्म आहे.
४) जे जे विनाशी आहे, जे जन्माला येऊन मृत्यू पावत ते अधी-भूत आहे.
५) चैतन्य रूपे  अविनाशी अशी सूर्य चंद्रादि अधिदैवते  आहेत.
६) आणि हा जो मी तुला दिसतो आहे या देहधारी श्रीकृष्णात, म्हणजे परमेश्वराठायी अधी-यज्ञ स्थित आहे.
अजून एका प्रश्नाचं उत्तर बाकी आहे.

अंतकाळी ही माझीचि चित्ती स्मरण राखुनी
देह सोडूनी गेला तो मिळे मज संशय

 सातव्या प्रश्नाचे  उत्तर "जो मृत्यूसमयी माझं स्मरण करतो तो देह सोडून गेल्यावर खात्रीने मलाच येऊन मिळतो." तर हा संवाद आता थोडासा मृत्यू, त्यानंतर काय? जन्म आणि मृत्यूच्या मध्ये काय? अशा एका गहन विषयात रंगतो. श्रीकृष्ण पुढे आपल्या लाडक्या मित्राला कुठलाही संशय राहू नये म्हणून अधिक विस्ताराने सांगतात.

जोजो आठवूनी भाव ना शेवटी देह सोडितो
मिळे त्या त्याची भावास सदा त्यातची रंगला
म्हणुनी सगळा काळ मज आठव झुंज तू
मन बुद्धी समर्पूनि मज निःशंक पावसी

श्रीकृष्ण म्हणतातमृत्यूसमयी देह सोडताना ज्याच्या मनात जो भाव असतो त्यानुसार त्याला मृत्यूनंतरची गती प्राप्त होते. श्रीकृष्ण पुन्हा मूळ मुद्यावर येतात, की अर्जुना, म्हणूनच तू सदा सर्वकाळ माझं स्मरण कर, मन, बुद्धी सर्वांचं माझ्या ठायी समर्पण कर आणि निःशंक होऊन लढ.
पुढे श्रीकृष्ण सांगतात-


लावूनी सगळी द्वारे कोंडूनी मन अंतरी
मस्तकी प्राण राखुनी चढला धारणेवरी
मुख्य ओम ब्रम्ही उच्चारी अंतरी मज आठवी
ह्या परी देह ठेवूनि जाय थोर गतीस तो

भगवान म्हणतात, ज्या इंद्रियाद्वारे विषयांचे, विकारांचे जाणेयेणे चालू असते, ती दारे बंद करून, मन आत बंदिस्त करून म्हणजे निर्विचार करून, मस्तकात आत्मशक्ती केंद्रित करून ओंकाराचा उच्चार करत जो माझे स्मरण करत देहत्याग करतो... तो मला येऊन मिळतो. हे सामान्य माणसाच्या मृत्यूचे  वर्णन आहे असे मला वाटत नाही. हे समाधी घेणाऱ्या थोर पुरुषांच्या निर्गमनाचं वर्णन आहे.
भगवान म्हणतात..
पावले मोक्ष सिद्धीस महात्मे मज भेटुनी
दुःखाचे घर तो जन्म घेती चि  अशाश्वत
ब्रम्हादि लोक ते सारे माघारे घालिती पुन्हा
माझी भेट घडे तेव्हा जन्मणे मग खुंटले

 माझ्यात विलीन झाल्यावर असे महात्मे मोक्ष पावतात आणि दुःखाचे आगर असलेल्या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकत नाहीत.
होतसे ब्रह्मदेवाचा सहस्त्र युग तो दिन
तेवढीची तशी रात्र कालोपासक जाणती

 श्रीकृष्ण म्हणतात, सहस्त्र युग हा ब्रम्हदेवाचा एक दिवस असतो आणि तेवढ्याच रात्री असतात हे असे थोर लोक जाणून असतात. आपल्या संदर्भात सांगायचे तर हा काही शतकांचा मामला नाही. इथे सहस्र युगांची गोष्ट म्हणजे अब्जावधी किंवा न मोजता येणाऱ्या काळाची गोष्ट कृष्ण सांगत आहेत.
पुढचा श्लोक मला आवडला...

अव्यक्तापासुनी होती भूते व्यक्त दिनोदयी
रात्र होत लया जाती सगळी मग त्यातची
तीची तीची पुन्हा भुते त्यांचे काही चालता
दिनांती मरती सारी उदयी जन्म पावती


इथे भगवंतांनी जन्ममृत्यूला दिवस आणि रात्रीची उपमा दिली आहे. ते म्हणतात दिवसाचा प्रारंभ व्हावा त्या प्रमाणे अव्यक्तातून जीवसृष्टी निर्माण होते. खरंच आपल्या जन्मापूर्वी आपण आसमंतात विखुरलेले अव्यक्त अणू रेणू असतो. अव्यक्तातून आपली निर्मिती होते आणि रात्री प्रकाश नाहीसा व्हावा तसे हे जीव मृत्यूनंतर पुन्हा नाहीसे किंवा अव्यक्तात विखुरले जातात आणि पुन्हा दुसरा दिवस उजाडावा तशी ही आत्मशक्ती नवीन काया धारण करून पुन्हा जन्म घेते.

अव्यक्त दुसरे तत्त्व त्या अव्यक्तापलीकडे
नाशता सगळी भुतें नाशे जे सनातन
त्यास अक्षर हे नाम तीची शेवटची गती
माझे परम ते धाम तेथुनी परतेची ना


 श्रीकृष्ण पहा काय सांगतात,ते फार फार महत्त्वाचं आणि सुंदर आहे. त्या अव्यक्तापलीकडेही अजून एक अव्यक्त म्हणजे ज्याला कुठलाही आकार किंवा form नाही असे  तत्त्व असते  जे जीवांचा नाश झाला तरी त्या अव्यक्त तत्त्वाचा नाश होत नाही . हीच आत्मशक्ती असते. ‘त्यास अक्षर हे नाम तीची शेवटची गतीया अव्यक्त आत्मशक्तीचे  नाव अक्षरआहे, जिचा नाश होऊ शकत नाही. ही आत्मशक्ती हे माझं परमधाम आहे, तिथपर्यंत पोहोचलेला पुन्हा तिथून मागे फिरत नाही.

कोण्या काळी कसा देह ठेवूनि  येथे साधक
संसारी पडतो किंवा पावतो सिद्धी ऐक ते

श्रीकृष्ण पुढे कुठल्या काळात कसा मृत्यू आल्याने जीव पुन्हा संसार चक्रात अडकतो की मुक्ती पावतो ते अर्जुनाला सांगतात.


अग्नीने दिना शुक्लार्ध उत्तरायण जोडुनी
जाय तो गाठतो ब्रम्ह शेवटी ब्रह्म जाणुनी
धुमाने रात्र कृष्णार्थ दक्षिणायन जोडुनी
जाये तो परते येथ चंद्र लोकांस पावुनी

जो उत्तरायणात शुक्ल पक्षात दिवसा देह ठेवतो तो ब्रम्हात विलीन होतो. जो दक्षिणायनात कृष्ण पक्षात रात्रीत देहत्याग करतो तो चंद्र लोकी जाऊन पुन्हा परत जन्म घेतो... हे थोडं समजायला कठीण आहे. यावर मला काही प्रश्न आहेत, पण ते अर्जुनाने विचारले नाहीत त्यामुळे त्याची उत्तरं नाहीत.

हे लिहिता लिहिता माझ्या अस लक्षात आलंय की श्रीकृष्ण दर काही श्लोकांनंतर आपले काही मुद्दे पुन्हा पुन्हा उद्धृत करत राहतात. जसं हा श्लोक पहा -


उजेड आणि अंधार दोन्ही मार्ग अनादि हे
सुटका करितो एक एक फेऱ्यात  टाकितो
असे हे मार्ग जाणुनी  योगी मोह पावतो
म्हणुनी  सदा राहे योगाने जोडिला चि तू

सुंदर श्लोक आहे... भगवान सांगतात - उजेड आणि अंधार हे दोघेही अनादी आहे. अनादी म्हणजे ज्याचा आरंभ नाही असे ते स्वयंभू आहेत. त्यातील एक संसाराच्या फेऱ्यातून सुटका करतो आणि दुसरा फेऱ्यात अडकवतो. ज्ञानवंत योगी व्यक्ती हे सत्य जाणतात आणि कुठल्याही मोहाला बळी पडत नाहीत. म्हणून हे अर्जुना तू देखील सदा सर्वकाळ योगयुक्त हो.

अशा प्रकारे श्रीकृष्ण अर्जुनाला आणि आपल्याला दिव्य ज्ञानाचे  अजून एक दालन उघडे  करून देतात... पुढे काय घडलं असेल याची उत्सुकता लागून राहिली आहे... गोष्टीचं पुस्तक वाचणाऱ्या बालकाला वाटते तशी.

क्रमश:


अलका देशपांडे


No comments:

Post a Comment