वाचक हो नमस्कार! गीताई वरची माझी लेखमाला मागच्या महिन्यातच संपली. माझा हा प्रवास फारच गंमतीशीर होता. हा जमिनीवरचा नुसता साधासुधा प्रवास नव्हता तर हा ट्रेक होता. १८ योग शिखरांचे आव्हान या ट्रेक मध्ये होते. सुरुवातीला कल्पना नव्हती पुढे नक्की काय काय असेल. मी पूर्वी कधीही गीता किंवा संपूर्ण गीताई वाचली नव्हती. आमच्या विरारच्या प्राथमिक शाळेत दुसरी-तिसरीत 'गीताई'चा बारावा अध्याय 'भक्तियोग' पाठांतराला होता. त्याच वेळी कुठेतरी गीतेचे बीज माझ्या मनात रुजले.
भगवद् गीता या पुस्तकाचे मला सतत आकर्षण वाटत राहिले. कधीतरी आपण स्वतःच्या शब्दांत गीता लिहावी अशी अनिवार इच्छा
होती. स्नेहाने जेव्हा कटट्याकरता लेखमाला देण्याकरता विचारले तेव्हा आपण गीताई वरच लिहावे अशी अंतःप्रेरणा मला झाली. एका
अज्ञात प्रदेशात मी प्रवेश करत होते. ट्रेकला जाण्यापूर्वीची प्रचंड उत्सुकता आणि
आपण ट्रेक पूर्ण करू शकू की नाही याची धाकधुक अशा मिश्र भावनांनी मी लिहायला
सुरुवात केली. हा प्रकल्प रेंगाळू नये आणि स्नेहाला फॉलो अप करायला लागू नये
याकरता मी एका आठवड्यात एक अध्याय पूर्ण करण्याचा आणि स्नेहाला पाठवण्याचा संकल्प
सोडला आणि त्याप्रमाणे लेखन पूर्ण केले.
विनोबांनी 'गीताई' इतक्या सुंदर आणि सोप्या शब्दात
लिहिली आहे की मला गीता समजून घेऊन स्वतःच्या शब्दात लिहिणं खूप सोपं गेलं. माझ्या
असं लक्षात आलं की हा दोन जिवलग मित्रांमधला संवाद आहे आणि जसं जसं मी लिहू लागले
तस तसा मी तो संवाद प्रत्यक्ष अनुभवते आहे असं मला वाटू लागलं, इतकी मी त्यात समरसून गेले.
प्रत्येक अध्यायाच्या
शेवटी एक कमालीचे समाधान आणि तृप्तीची भावना मनात काठोकाठ भरून यायची. पुढच्या अध्यायात काय झालं
असेल हे जाणून घेण्याचं प्रचंड औत्सुक्य दाटून यायचं. अर्जुन
विषाद योग या पहिल्या अध्यायानंतर लगेचच सांख्ययोग.. अत्यंत विशाल आणि
उत्तुंग असं योग शिखर... मला हा अध्याय दोन भागात लिहावा लागला... हा अध्याय पार
पडला आणि माझी खात्री पटली. उरलेली सोळा योग शिखरे मी नक्की पार करू शकेन.
कर्म योग, कर्म संन्यास
योग, ज्ञान संन्यास योग, आत्म संयम योग, ज्ञान विज्ञान योग,
राज विद्या राज गुहय योग, विभूती योग असं मजल दर मजल करत मी लिहू लागले आणि मला केव्हा एकदा विश्वरूप दर्शन योग येतो असं झालं... ते
संपूर्ण लिखाण मी इतके भारावलेल्या
उन्मनी अवस्थेत केले की प्रत्यक्ष स्वतः ते विश्वरूप पाहिल्याची अनुभूती मला आली.. ते तेज..
ती प्रखरता मी स्वतः अनुभवली आणि आयुष्य कृतार्थ झाल्या सारखं वाटलं... माझा
अकरावा अध्याय लिहून पूर्ण झाला आणि तो पारलौकिक अनुभव मी माझ्या कवितेत कायमचा
शब्दबद्ध केला.
कृतार्थ क्षण
आयुष्याच्या या वळणावर
कृतार्थ वाटे हा सुंदर क्षण
अनंत पाहून रूप तुझे अन
चरणी तव अर्पून माझे मन
अस्तित्वाचे भान निमाले
तुझ्यात ओवून माझा कण कण
आयुष्याच्या या वळणावर
कृतार्थ वाटे हा सुंदर क्षण!
काही उत्कट काही उन्मन
भाव भक्तीचे हे आवर्तन
तुझी बासरी ओठी लावून
प्राण आळविती सूर संजीवन
आयुष्याच्या या वळणावर
कृतार्थ वाटे हा सुंदर क्षण
तुझ्या लोचनी मला पाहिले
नाते अपुले क्षणात कळले
नको प्रचिती नको प्रतीति
श्वास श्वास मम श्रीकृष्णार्पण
आयुष्याच्या या वळणावर
कृतार्थ वाटे हा सुंदर क्षण
या नंतर आला छोटुकला रसाळ भक्तीयोग... विश्वरूप
दर्शनातून निर्माण झालेला दाह निववणारा..या नंतर 'तिळा तिळा दार उघड' म्हटल्यावर जसं रत्नानी भरलेल्या
गुहेचे दार उघडत जावे तसं पुढच्या प्रत्येक अध्यायात स्तिमित करणारी ज्ञानाची एका पेक्षा एक सरस
दालने उघडत गेली.. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग, गुणत्रय विभाग योग, पुरुषोत्तम
योग, देवासुर संप विभाग योग, श्रद्धात्रय विभाग योग.. किती मजा आली मला हे सगळे योग
वाचताना, समजून घेताना आणि लिहिताना... श्रीकृष्ण माझे मित्रच झाले...
मी, अर्जुन, श्रीकृष्ण, संजय ही आमची एक
team च आहे आणि मी
रथावर बसून हे सगळं पाहतेय, ऐकतेय इतकी मी या संवादात समरसून गेले.. कधी
स्वतःशीच हसले, कधी अर्जुनाने हा प्रश्न का नाही विचारला म्हणून चुकचुकले.. कधी
कृष्णाच्या चतुराईच्या कौतुकाला शब्द अपुरे पडले तर कुठे 'ये हुई ना बात' म्हणून श्रीकृष्णाच्या हातावर टाळी द्यावीशी वाटली... असं करत करत
माझी सतरा योग शिखरे कधी पार करून झाली माझं मलाच कळलं नाही..
२०२० चा मे महिना... जगाला करोनाने
ग्रासले... मी मात्र गीतेत रमले होते... एकच ध्यास होता. शेवटचे सर्वात उत्तुंग योग शिखर " मोक्ष संन्यास योग"... ही चढण कठीण
होती. पण प्रत्यक्ष परमेश्वर माझा ट्रेक लीडर होता... फिर क्या
डरना! अतिशय नितांत सुंदर असा योग... दोन भागांत लिहिला..कृष्ण अर्जुना मधली शेवटची
नोकझोक.. उत्कंठा वाढवणारी आणि अलौकिक ठरली... कृष्णाने शेवटी प्रतिज्ञा पूर्वक
सांगितले -
प्रेमाने ध्यास घेवोनी
यजी मज नमी मज
प्रिय तू मिळसी मा ते
प्रतिज्ञा जाण सत्य ही
आणखी काय पाहिजे.. शेवटी अर्जुनाला
समजावण्यात कृष्णाला यश आलं.. अर्जुनाची द्विधा अवस्था नाहीशी झाली आणि मी... मी
आणि संपूर्ण विश्व् आपण सारेच या दिव्य ज्ञानाचे लाभार्थी ठरलो... शेवटच्या
श्लोकावर डोळे पाणावले... मी सर्वात उत्तुंग योग शिखरावर उभी होते जिथून मला
उरलेली सतरा योग शिखरे दिसत होती..आनंदाने मन सदगदीत झाले होते... अपार आनंद आणि समाधान मनात मावत
नव्हते.... हा सगळा
अनुभव प्रत्यक्ष पाहिल्यावर,
स्वतः जगल्यासारखा माझ्या स्मृतीवर कोरला गेला कधीही न
विसरण्यासाठी..
वाट
तुला शोधायला
ज्या वाटेवरून
मी निघाले
चालता चालता
ती वाटच मी झाले
तुझ्यापर्यंत पोहोचणारी
अलका
देशपांडे
No comments:
Post a Comment