गुढीपाडवा



ब्रम्हदेवांनी सृष्टीची निर्मिती केली तो आपल्या वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा होय. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा! रावणावर विजय मिळवून प्रभू रामचंद्र अयोध्येत पोहोचले तो दिवस म्हणजे गुढी पाडवा! शालिवाहन राजाने आपले शक संवत्सर सुरु केले तो दिवस म्हणजे गुढी पाडवा! 
बळीराजा आपल्या प्रिय नगरजनांना पाताळातून भेटायला येतो, त्यावेळी आनंदाने त्याच्या स्वागतासाठी नगरजन गुढ्या उभारतात अशी कथा आहे. अशी ही गुढीची परंपरा आपल्याकडे फार जुनी आहे. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी गुढीपाडवा हा सण साजरा करण्यास सुरवात केली. गुढी उभारण्याची प्रथा ही शिवरायांची संकल्पना होती.
चैत्र महिना म्हणजे वसंत ऋतूचे आगमन! वसंत ऋतू म्हणजे ऋतूंचा राजा! अवघी सृष्टी या राजाच्या स्वागताला सज्ज होते. पानगळ संपून वृक्ष वेली हिरवा साज परिधान करतात. थंडी संपून वातावरण उबदार होते. कोकीळकूजन मन प्रसन्न करते. या दिवसात चराचरात चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण असते. शेतीची कामे संपून धान्य बाजारात येते. त्यामुळे शेतकरी राजा सुखावतो. याच उत्साहात आणि आनंदात गुढी उभारून आपण नववर्षाचे स्वागत करतो.

ब्रम्हदेवांनी सृष्टीची निर्मिती केली, म्हणजेच हा नवनिर्मितीचा उत्सव! प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला म्हणजेच हा विजयोत्सव! बळीराजाला पाहून नगरजनांना आनंद होतो, म्हणजेच हा आनंदोत्सव! शालिवाहन शक प्रणित नववर्षाचा हा वर्षोत्सव. शिवरायांनी याच विजयोत्सवाला परंपरेचे रूप दिले.
परंपरेने हा उत्सव आजही महाराष्ट्रात सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी गुढी उभारली जाते. भक्तिभावाने तिची पूजा केली जाते. दुपारी श्रीखंड पुरीचे चारीठाव जेवण होते आणि दुपारभर मस्त ताणून दिली जाते. सध्या इंटरनेटचे राज्य असल्याने व्हाट्स अँपवर वर शुभेच्छांचे संदेश फिरत राहतात. 
असं म्हणतात की आजच्या दिवशी नवीन गोष्ट विकत घेतली तर घरात समृद्धी येते, भरभराट होते. म्हणून आज सोन्या चांदीच्या दुकानात तुडुंब गर्दी असते. काळानुरूप काही बदल झालेत. हा सण घरात साजरा होतो तसाच आता बाहेर पण साजरा केला जातो.
नववर्षाच्या स्वागतासाठी ढोल ताशाच्या गजरात पहाटे मोठी शोभायात्रा काढली जाते. मिरवणुकीच्या स्वागताला रस्त्यावर सडा रांगोळी केली जाते. सगळीकडे वातावरण अगदी प्रसन्न असते. अनेक ठिकाणी पहाट पाडव्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. 

परंपरेने सण साजरा केलाच पाहिजे पण त्याच बरोबर ज्या कारणाने ही परंपरा सुरु झाली, त्याचा सुद्धा विचार व्हायला पाहिजे. बळीराजा, शालिवाहन राजा, रामायण किंवा अगदी शिवरायांचा काळ तसा खूप जुना झाला. पण आजच्या काळात प्रवाहाविरुद्ध जाऊन, वेगळ्या गोष्टी करून आपल्या पराक्रमाची, कर्तृत्वाची गुढी उभारणारे अनेक जण आपल्याला दिसतील.
ज्या काळात स्रियांनी शिकणे हे पाप मानले जायचे त्या काळात समाज प्रवाहा विरुद्ध जाऊन रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले यांनी स्री शिक्षणाची गुढी उभारली. तर आनंदीबाई जोशी यांनी अमेरिकेमध्ये अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून आपल्या विद्वत्तेची आणि ध्येयपूर्तीची गुढी उभारली.


ज्या काळात कुलीन, घरंदाज स्त्रियांना संगीत क्षेत्राचे दरवाजे बंद होते, त्याकाळात गंगाबाई पलुस्कर या स्वतः गाणं शिकल्या आणि कुलीन घरंदाज स्त्रियांसाठी स्वतंत्र संगीत क्लासेस सुरु करून त्यांच्यासाठी सांगितिक गुढी उभारली, आणि घराघरात हिंदुस्थानी संगीताला मानाचे स्थान मिळवून दिले. आपल्या पाल्यांनी गाणं, नृत्य शिकावे हा आज पालकांचाच हट्ट असतो. पण त्याकाळात घराघरात संगीत पोचवणे सोपे नव्हते. 
बाबा आमटे यांनी सुखासीन आयुष्य सोडून कुष्ठरोग्यांच्या सेवेचे खडतर व्रत स्वीकारले.
कुष्ठरोग्यांना माणसात आणले आणि माणुसकीची गुढी उभारली. त्यांच्या पुढच्या पिढ्या ही गुढी आणखी आणखी उंच नेत आहेत

नर्मदा परिक्रमा करून त्यावर पुस्तके लिहिणारे अनेकजण आहेत. पण नर्मदा प्रकल्पातील विस्थापितांचे दुःख, वेदना समजून, घरदार नोकरी सोडून त्यांच्यात जाऊन रहाणाऱ्या भारती ठाकूर यांनी विस्थापितांच्या घरात साक्षरतेची आणि स्वावलंबनाची गुढी उभारली आहे. अशी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेकदा दिसतात. कितीतरी माणसे अशी पण असतात की जी आपले दैनंदिन जीवन सांभाळूनही इतरांच्या जीवनात आनंदाची गुढी उभारण्याचा प्रयत्न करत असतात. या अशा अनेक लोकांमुळे गुढीपाडवा या सणाला किंवा गुढी उभारणे या परंपरेला खरा अर्थ लाभतो.
जानेवारीत सुरु होणाऱ्या नववर्षाला आपण स्वतःच्या सुख समृद्धी साठी, आरोग्यासाठी काही ना काही संकल्प करतो. यावेळी या नववर्षाला स्वतःच्या घरात जैताची, स्वानंदाची, समृद्धीची, सायुज्जतेची गुढी आपण उभारूयात आणि त्याच बरोबर या वर्षभरात आनंदाची, साक्षरतेची, माणुसकीची, अशी कुठली ना कुठली गुढी दुसऱ्या कुणाच्यातरी दारात उभी करण्याचा संकल्प आपण सगळ्यांनी करून या सणाच्या परंपरेला एक नवा आयाम देऊयात. बघा पटतंय का!!!!


वैजयंती डांगे
                                                                           

No comments:

Post a Comment