आज स्वर्ग लोकात बरीच धांदल,गडबड चालली होती. कुणाच्या तरी स्वागताची
तयारी चालली होती.त्यासाठी बरेच जण एकत्र जमून चर्चा करीत होते. इतक्यात साक्षात
इंद्र देव तेथे आले व सर्व गडबड शांत झाली. सर्वांनी इंद्रदेवांना
नमस्कार केला,व आपले निवेदन त्यांना वाचून दाखविले.
“महाराज, आम्ही सर्व मर्त्य
मानव आपणास नम्र विनंती करीत आहोत की,आम्हा सर्वांची लाडकी स्वरसम्राज्ञी, हिंदुस्थानची
महान गायिका लता मंगेशकर हिला देवाज्ञा झाल्यामुळे ती पृथ्वी लोकातून स्वर्ग
लोकी येत आहे. तिचे जंगी स्वागत करण्याची आम्हा सर्वांची इच्छा आहे.तरी या स्वागत समारंभास
आपण आज्ञा द्यावी.”
इंद्र देवांनी त्यावर लगेच प्रतिक्रिया दिली. "अरे हो,आपण नक्कीच
लता दीदींचे जंगी स्वागत करूया.आम्ही सर्व देव देवतांनी पण तिच्या बद्दल खूप ऐकलंय. आम्ही पण तिला
पहायला व तिचा स्वर ऐकायला खूप उत्सुक आहोत. तर चला,लागा तिच्या
स्वागताच्या तयारीला..."
आपल्या अमर संगीताने, गायकीने, अभिनयाने व गाण्यांनी जवळ जवळ
शंभर वर्षे हिंदुस्थानातील चित्रपट सृष्टी गाजविणारे हे कलाकार, ज्यांच्या चित्रपटांमधून
व संगितामधून लताने आपली अजरामर गाणी गाऊन केवळ हिंदुस्थानच
नव्हे तर अख्ख्या दुनियेला रिझवले,असे हे एकापेक्षा एक दिग्गज होते.
त्यांच्यामध्ये खेमचंद प्रकाश, अनिल विश्वास, नौशाद, सी.रामचंद्र, मदन मोहन, सचिनदेव बर्मन, रोशन, शंकर-जयकिशन, हेमंतकुमार, वसंत देसाई, सलील चौधरी, चित्रगुप्त, रवि, जयदेव, सुधीर फडके, खय्याम यांच्या
सारखे महान संगीतकार होते. ज्यांनी लताबरोबर
गाऊन अजरामर गाणी निर्माण केली असे, महंमद रफी, मुकेश, तलत मेहमूद, मन्ना डे, किशोरकुमार यांच्या
सारखे महान गायक होते. ज्यांच्या अप्रतिम शायरीला लताच्या गायकीने चार चांद लावले असे,साहिर लुधियानवी, मजरूह सुलतानपुरी, शकील बदायुनी, शैलेंद्र, हसरत जयपुरी, कैफी आझमी, जान निसार अख्तर, कमर जलालाबादी, राजेंद्रकृष्ण, आनंद बक्षी, भरत व्यास, प्रदीप यांच्यासारखे
महान गीतकार, शायर होते.
ज्यांच्या अभिनयाला लतादीदींनी आपल्या आवाजाने सजविले अशा नूतन, नर्गिस, साधना, मधुबाला, मीनाकुमारी, गीता बाली, बीना रॉय, निम्मी, नलिनी जयवंत यांच्यासारख्या
नामवंत अभिनेत्री होत्या. दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, अशोककुमार, शम्मी कपूर, मोतीलाल, बलराज सहानी, राजेंद्रकुमार, शशी कपूर, राज कुमार, गुरू दत्त, संजीवकुमार, राजेश खन्ना यांच्यासारखे
दिग्गज अभिनेते होते. आणि या सर्वांचे प्रेरणास्थान असलेले हिंदी चित्रपट सृष्टीचे
भीष्माचार्य स्वर्गीय कुंदनलाल सहगल हे देखील होते. त्यांना तर लताला
भेटण्याची खूपच इच्छा होती.
साक्षात इंद्र देवांनी लतादीदींच्या स्वागत समारंभाला आज्ञा
दिल्यामुळे सर्व जण लगबगीने कामाला लागले.
लताबाईंची कारकीर्द ख-या अर्थाने बहरली ती खेमचंद प्रकाश, अनिल विश्वास, नौशाद, सी.रामचंद्र, मदन मोहन, सचिनदेव बर्मन, रोशन, शंकर जयकिशन, हेमंतकुमार, वसंत देसाई, सलील चौधरी, चित्रगुप्त, रवि, जयदेव, सुधीर फडके, खय्याम या सर्वांच्याच
संगीतामुळे. पण लताबाईंच्या आवाजाची पारख सर्वप्रथम ज्यांना झाली त्या गुलाम हैदर साहेबांची
आठवण सगळयांनाच झाली.
त्या काळात पार्श्वगायक किंवा पार्श्वगायिका हा प्रकारच नव्हता. सिनेमात काम करणारे
नट किंवा नटयाच गाणी गात असत. संगीतकारांना अशा गायक/गायिकांना
सोयिस्कर अशा चाली बांधाव्या लागत असत. पुरूष गायकांमध्ये सहगल साहेब आणि स्त्री गायिकांमध्ये
नूरजहां, सुरैय्या हे अपवाद सोडले तर इतर गायक/गायिकांकडून गाणी गाऊन घेणे संगीतकारांसाठी
एक आव्हानच होते व त्यामुळे संगीताला पण मर्यादा येत असत.
अशातच “लता मंगेशकर” या मुलीच्या गळयातला सूर गुलाम हैदर यांना
अतिशय आवडला होता
व तिला पार्श्वगायिका या नात्याने एखादे गाणे देऊन बघूया असे त्यांना वाटले.
लतासारख्या हि-याला
पैलू पाडण्याचं काम प्रथम हैदर साहेबांनीच केलं होतं.
त्यानंतर अनेक संगीतकारांकडे लताबाईंनी अविस्मरणीय गाणी
गायली. प्रत्येक संगीतकाराचा ढंग निराळा होता, रुबाब वेगळा होता. नौशाद,मदनमोहन वसंत
देसाई यांची शास्त्रीय बैठकीची गाणी,अनील विश्वास,सी.रामचंद्र,रोशन यांची अवीट
गोडीची मेलडीयस गाणी, एस.डी बर्मन यांचं लोकसंगीताचं भांडार, ताज्या टवटवीत
फुलांसारखं शंकर जयकिशन यांचं संगीत. हे सर्व संगीतकार तसेच लताबाई बरोबर गाजलेली युगुल
गीते गाणारे मुकेश, महंमद रफी, किशोरकुमार, तलत मेहमूद, मन्ना डे हे गायक असे सर्वचजण
लताबाईंच्या आगमनाची आतुरतेने वाट पहात त्यांच्या आठवणीत रमले होते.
चित्रपट संगीताच्या सुवर्णयुगाचे हे सर्व साक्षीदार पुन्हा त्या
काळातील मैफिल लताबाईंबरोबर स्वर्गात जमवत असतील......चित्रपट गीतांच्या सुवर्ण काळातील
सुवर्ण क्षण पुन्हा अनुभवत असतील......नौशाद मियां संगीताचं संयोजन करत
असतील...साक्षात देवी सरस्वतीने तिची वीणा साथीला दिली असेल..कृष्णाचा पावा घुमू
लागला असेल.. मुकेश, रफी, किशोर, तलत, मन्ना डे हे सर्वचजण
तिच्याबरोबर युगुलगीते गात असतील..
लता आता तिचंच
गाजलेलं गाणं थोडया वेगळया शब्दात गात असेल ......
गुजरा हुआ जमाना,आया है फिर दोबारा
छायाचित्रे सौजन्य : सोशल मीडिया
अनंतकुमार जोशी
No comments:
Post a Comment