हेल्मेट


यंदाही "Employee of the Year" साठी हिचंच नाव आलंय.
"ही बाई म्हणजे तेंडुलकर आहे." मी स्वतःशीच म्हणालो.
गेली वीस-बावीस वर्षं ती हेच करत होती. हेल्मेटला पट्टा लावायचं काम, एखाद्या यंत्रासारखं.
असेंब्ली लाईनवर तिचा वेग सगळ्यात जास्त होता. गेल्या काही र्षांत किती यंत्रणा बदलली, किती डिझाईन्स बदलली.
ती मात्र कायम होती, सगळ्यांशी जुळवून, आपला वेग कायम ठेवून.
मध्ये काही दिवस आली नव्हती. बरोबर आहे, सगळ्या मशीन्सप्रमाणे हिलाही विश्रांती हवी.
पण तिच्या लाईनचा वेग कमी झालाय, हा इकडे ठेवलेला डेली रिपोर्ट पेपर तरी असंच सांगतोय.
"काय रे, तुझ्या लाईनचा स्पीड कमी झालाय. काय झालंय?" मी लाईन सुपरवायझरला जरा दरडावूनच विचारलं.
"सर. आंटीचा प्रॉब्लेम झालाय जरा. होईल थोड्या दिवसांत ठीक सगळं."
"नीट सांग काय झालंय?"
तो मला असेंब्ली लाईनच्या खिडकीकडे घेऊन गेला.
"सर, दोन आठवड्यांपूर्वी हिचा मुलगा गेला. पंचवीस वर्षांचा होता. गाडीने उडवला हायवेवर. हा बाईकवर होता. हेल्मेट नुसतंच घातलेलं. पट्टा अडकवला नव्हता. जागच्या जागी गेला. डोकं डिव्हायडरवर आपटलं म्हणे.
तेव्हापासून पट्टा लावून झाला की ही प्रत्येक हेल्मेटला असंच छातीशी कवटाळते. काहीतरी पुटपुटते. स्पीड वीस सेकंद कमी झालाय सर."
माझं डोकं सुन्न झालं. गळा दाटला." Employee of the Year " च्या सर्टिफिकेटवर सही करताना आज पहिल्यांदाच हात थरथरत होते.


मानस

No comments:

Post a Comment