हे हिमालया.....



हे हिमालया,
भारावले मी तुझ्या दर्शनाने
विस्मित झाले तुझ्या भव्यतेने
आकाशास भिडणारी
तुझी उंच शिखरे
कुठे कुठे त्यावरी बर्फ गोठलेले

गर्द हिरव्या शालीत
पर्वत हे लपलेले
कधी धुके कधी ढग
त्यावरी थांबलेले
मधूनच खळखळत
झरे धावणारे
सौंदर्य तुझे हे
किती मोहणारे

चित्रकार मी,
मम कुंचल्याने
करू पाहाते चित्रित
तव सौंदर्याते
चितारले कितीही
तरीही ना संपते
नवनवीन रूप तुझे
पुन्हा नजरेस दिसते

हिमालय म्हणाला,
नको करूस घाई
मज रूपास चितारण्याची
जा फिरून घे दुनिया
मग ये माझ्यापाशी
पण येशील तेव्हा एकटीच ये
तुझ्या व्यथा, काळज्या, कटकटी
घरातच ठेवून ये

मग मिसळून जाशील माझ्यात
एकरूप होशील
इथल्या निसर्गात
जे तुला आजवर
जाणवलं ही नव्हतं
त्याचा अनुभव मग
घेशील तू साक्षात्

संपेल जेव्हा असा
तुझ्यामाझ्यातील भेद
विरून जातील मनातील
चित्र काढण्याचे बेत
जी तू तोच मी असेन जर
कसे काढावे बरं
स्वतःचेच चित्र?




मंजूषा आपटे

No comments:

Post a Comment