इराण – पासरगड आणि पर्सेपोलीस


शिराझहून जवळच इराणच्या इतिहासातील पासरगड आणि पर्सेपोलीस ही दोन महत्त्वाची ठिकाणे आहेत. जगात इतक्या प्राचीन काळातल्या, म्हणजे अडीच हजार वर्षांपूर्वीच्या फारच कमी वास्तू उरल्या आहेत. अडीच हजार वर्षांपूर्वी अकिमेनिअन घराण्यातल्या ‘सायरस’ या पर्शियन राजाने मेडिअन्स ह्या इराणच्या मध्यभागातील जमातींचा पराभव करून, पर्शियन साम्राज्य उभे केले. या ‘सायरस’ राजाची समाधी पासरगडला आहे. आजही या ठिकाणी ‘सायरस’ राजाच्या राजवाड्याचे भग्नावशेष आहेत. आम्ही ते दुरूनच पाहिले.

सम्राट सायरसने आपले पर्शियन साम्राज्य स्थापले. मात्र हे साम्राज्य त्याने मानवतेच्या दृष्टिकोनातून वाढवले. ५५० बी.सी. या काळात त्याने स्वतः जिंकलेल्या राज्यांमध्ये धर्म बदलाची सक्ती केली नाही. हरलेल्यांचे शिरकाण केले नाही. उलट सर्वांना सहृदयतेने वागवावे असे त्याने लिहून ठेवले व तसेच तो वागलाही! जिंकलेल्या राज्यांतील माणसे, संपत्ती या कशाचाही त्याने विध्वंस केला नाही. बाबेल जिंकल्यानंतर, तिथल्या ज्यू लोकांना जेरुसलेमला परतायला त्याने आडकाठी केली नाही. लोकांना मारले तर नाहीच, पण आपण जिंकलेल्या राज्यातील जनतेला त्याने गुलामही बनवले नाही. आपले हे सारे विचार त्याने एका झाडाच्या खोडावर कोरून ठेवले आहेत. त्यालाच आज ‘सायरस सिलिंडर’ असे म्हणतात. सायरसने लिहिलेल्या विचारांना ‘नैसर्गिक कायदा – Natural Law’ असे संबोधतात. युनायटेड नेशन्सच्या मानवाधिकार समितीने लिहिलेल्या मसुद्याचे मूळ या सम्राट सायरसच्या नैसर्गिक कायद्यात आहे. आजही या ‘सायरस सिलिंडर’ची प्रतिकृती युनायटेड नेशन्सच्या इमारतीत आहे. मूळ सिलिंडर मात्र ब्रिटनच्या संग्रहालयात आहे.

पासरगड येथे सम्राट सायरसची समाधी आहे. सहा पायऱ्या असलेली ही समाधी तशी छोटीच आहे. पण इराणमधील इतर इमारतींप्रमाणेच प्रमाणबद्ध व देखणी आहे. सायरस राजाने इराणी लोकांना दिलेली आणखी एक भेट म्हणजे बागा! इराणमध्ये जिथे जाऊ तिथे बागा-उद्याने दिसतात. आणि याची सुरुवात सम्राट सायरसपासून झाली आहे. ‘पॅराडाईज़’ वा स्वर्ग कसा असेल याची कल्पना करताना या बागांची रचना त्याने केली. ‘Paradise’ हा शब्द मुळातून मेडीअन भाषेतून आला. ‘Pairi’ म्हणजे सभोवताल आणि ‘daeza’ किंवा ‘diz’ म्हणजे भिंत! याचे शब्दशः भाषांतर म्हणजे भिंत असलेली बाग किंवा जागा!
या जागेत पाण्याचा भरपूर वापर करून, म्हणजेच कारंजी, कालवे, छोटेसे तळे बांधून वसवलेली बाग. फळे, फुले असलेली बाग, कारंजी, तळे आणि मधोमध एक महाल वा देखणी इमारत असणे, हे या पर्शियन बागांचे वैशिष्ट्य! अशा या बागा इराणमध्ये सर्व ठिकाणी आढळतात. जगभरातील वास्तुविशारदांनी बागेची संकल्पना ही पर्शियातूनच उचलली आहे. असा हा सुसंकृत सायरस राजा!
त्याने आपल्या छोट्याशा समाधीसाठीही काही ओळी लिहून ठेवल्या आहेत. त्या अशा –

O Man, whoever you are and
Wherever you can come from,
For I know you will come,
I am Cyrus, who won the Persians
their Empire.
Do not therefore, begrudge me,
This bit of earth, that covers my bones.

अशा या सम्राट सायरसच्या समाधीपुढे नतमस्तक होऊन, आजच्या जगाच्या शांततेसाठी प्रार्थना करून आम्ही त्याचा निरोप घेतला.
***********

पर्सेपोलिस

इराणमधील सगळ्यात महत्त्वाचे, प्रेक्षणीय आणि अतिप्राचीन स्थळ म्हणजे पर्सेपोलिस! या शहराचे प्राचीन नाव होते ‘पार्सापुरा’. इराणच्या पार्स या भागाची ही राजधानी. शिराझपासून सत्तर किलोमीटर अंतरावर असलेले हे पुरातन ठिकाण! या प्राचीन जागी मी कधी येईन, प्रत्यक्ष ही जागा पाहीन, असे मला स्वप्नातही कधी वाटले नव्हते. साधारण अडीच हजार वर्षांपूर्वीची ही वास्तू हा आज जागतिक ठेवा आहे.

जाताना मनात प्रचंड उत्कंठा होती. आजूबाजूला डोंगर दिसत होते. अधून मधून थोडीशी शेती दिसत होती. डोंगर मात्र कोरडेठाक! डोंगरावर कोठेही गवताचे पातेही दिसत नव्हते. इराणमधले रस्ते चांगले आणि आमची बसही चांगली होती. त्यामुळे तासा-सव्वातासात आम्ही पर्सेपोलीसला पोचलो. बस थोड्या दूर अंतरावर थांबली. नोरूजची सुट्टी असल्याने इथेही चिकार गर्दी होती. जाताजाता आमची गाईड ताहोरे आम्हाला माहिती सांगत होती.

सम्राट दारियुशची ही वासंतिक राजधानी! सम्राट दारियुश हा सम्राट सायरसचा वारस. सम्राट दारियुशने त्याच्या काळात पर्शियन साम्राज्याचा खूप विस्तार केला. जवळ जवळ २८ राज्ये त्याच्या काळात पर्शियन साम्राज्याचा भाग होती. ही गोष्ट अलेक्झांडर जन्मायच्या दोनशे वर्षांपूर्वीची आहे. त्या काळात पर्शियन साम्राज्य जगात सर्वात मोठे आणि समृद्ध होते. अशा या सम्राटाची ही राजधानी होती. पर्शियन राजे हे झोराष्ट्रीयन धर्माचे होते. त्यांचा ‘नोरुज’ हा सर्वात मोठा सण! वसंत ऋतूच्या आगमनाचे स्वागत करण्यासाठी हा सण साजरा करतात. म्हणून ही वासंतिक राजधानी! या सणाच्या निमित्ताने सम्राट दारियुशच्या साम्राज्यातील सर्व मांडलिक राजे, त्याला भेटायला येत असत.

दारियुशने पर्सेपोलीस बांधायला सुरवात केल्यापासून १३० वर्षांनी ती पूर्ण झाली. दारियुश नंतरच्या राजांनीही त्यात अधिकाधिक राजवाडे उभारून ही राजधानी अधिकच सुंदर बनविली. ही राजधानी बांधताना सम्राट दारियुशने अनेक देशांतून, वेगवेगळ्या कामात तरबेज असलेले कामगार बोलावून घेतले होते. या कामगारांना त्यांच्या कामाप्रमाणे व कौशल्याप्रमाणे वेतन मिळत होते. स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणेच वेतन मिळत होते. कधी कधी बायकांना अधिक कौशल्यपूर्ण काम केल्यावर पुरुषांहूनही अधिक वेतन मिळाल्याच्या नोंदी आढळल्या आहेत. तसेच स्त्रियांना बाळंतपण व त्यानंतर काही खास भत्ते आणि अधिक शिधा देण्यात आल्याची माहितीही उत्खननात मिळालेल्या खापरावरून मिळते.

चालता चालता समोर एक प्रचंड मोठा चौथरा दिसला. वर जायला दोन्ही बाजूंनी पायऱ्या होत्या.  मैदान ओलांडून आम्ही पायऱ्यांजवळ आलो. पायऱ्या चढायला अगदी सोप्या! दोन पायऱ्यांमधील अंतर अगदी कमी. त्यामुळे चढताना त्रास झाला नाही. या पायऱ्यांवरूनच सम्राट दारियुशचे मांडलिक राजे कधी काळी आपले नजराणे घेऊन, आपल्या सरदारांसकट सम्राटाला मानवंदना द्यायला आले असतील. वर आल्यावर समोरच एक प्रचंड मोठा दरवाजा दिसला. याला ‘गेट ऑफ
ऑल लँन्डस’ असे म्हणतात. आलेले सर्व निमंत्रित राजे याच दरवाजातून आत जात असत. या दरवाजातील अर्ध नर आणि अर्ध पशू असलेले पुतळे आपले स्वागत करतात. येथून आत गेल्यावर एक भव्य कक्ष असायचा. येणारे पाहुणे आत येऊन या ठिकाणी विसावा घ्यायचे. सम्राटांचा प्रतिनिधी मग येथे येऊन निमंत्रितांना मानाने आत घेऊन जायचा. आत जाताना ‘आर्मी स्ट्रीट’ या रस्त्याने पाहुण्यांना घेऊन जात. सम्राटांच्या सैन्याची कल्पनाही निमंत्रितांना या वेळी येत असे.

येथून उजवीकडे वळले, की प्रथम लागतो, तो ‘शत सोतून पॅलेस’! म्हणजे शंभर खांबांचा राजवाडा वा दालन. आजही तिथे जमीनदोस्त झालेल्या शंभर खांबांचे चौथरे आहेत. या प्रचंड दालनात आलेल्या राजांना सन्मानाने बसवले जायचे. याच दालनात भेटींची देवाण-घेवाण व्हायची. कारण फक्त मांडलिक राजेच सम्राटाला भेटी देत असत असे नाही, तर सम्राटही सर्वांना भेटी देत असत. ‘नोरुज’ हा पारसी नववर्षाचा सुरवातीचा सण, अशा भेटीगाठी देऊन सम्राट साजरा करत असे. ताहोरे आम्हाला माहिती सांगत होती. ‘शत सोतून’ पॅलेसकडून आम्ही ‘आपादाना पॅलेस’कडे जात होतो. आता बाजूला असलेल्या प्रत्येक भिंतीवर भित्तीचित्रे होती. यातल्या प्रत्येक चित्रालाही काही अर्थ होता. इथले प्रसिद्ध चित्र म्हणजे सिंह आणि बैलाच्या झुंजीचे चित्र. इथे सिंह आणि बैल हे राशींचे प्रतीक आहेत. सिंहाने बैलाचा पराभव केलाय म्हणजे वृषभ रास मावळून सिंह रास सुरू झाली आहे. हिवाळा संपून वसंत ऋतू आला आहे, हे या चित्रातून सूचित करायचे आहे.

याशिवाय भिंतीवर त्या काळातील राजांची, मानकऱ्यांची, त्यांनी आणलेल्या भेटींची अशी अगणित चित्रे आहेत. प्रत्येक माणसाची केशभूषा, वेशभूषा, मस्तकावरील पगड्या, दाढ्या सगळे वेगवेगळे! यावरून आपण आफ्रिकेतील, सीरियातील, इजिप्तमधील अशी माणसे ओळखू शकतो. काहींच्या हातात शस्त्रेही आहेत. राजाला द्यायला अनेकांनी चषक, सुरया आणलेल्या दिसतात, तर काहींनी मेंढा, उंट असे प्राणीही भेट म्हणून आणलेले दिसतात. फक्त अरबस्तानात मिळणाऱ्या दोन उंचवटे असणाऱ्या उंटाचे चित्रही इथे आहे. या लोकांची वस्त्रे, कानातले, गळ्यातले अलंकार हे सगळे मिळून हा एक दृश्यरूप इतिहासच आहे. एका चित्रात पायातील बुटांची शू लेसही दिसते. अर्थात जुन्या पद्धतीची! काहींची दाढी लांब, तर काहींची छोटी, वेगळ्या पद्धतीने राखलेली, तसेच चित्रातल्या केसांवरूनही कोणत्या प्रदेशातील माणसे आहेत ते समजते. या चित्रात ‘फर्वहार’ या झोराष्ट्रीयन प्रतीकाचे चित्रही अनेक ठिकाणी आढळते.
सम्राटांच्या सुरक्षेसाठी दहा हजार सैनिकांचा खास ताफा नेहेमी सुसज्ज असायचा. या सैनिकांची भित्तीचित्रेही आहेत. सम्राट दारीयुशचे राज्य पश्चिमेकडे इजिप्त पासून ते पूर्वेकडे भारतापर्यंत पसरले होते. भारतातील आखूड धोतर नेसलेल्या एका माणसाचेही भित्तीचित्र तिथे आहे. ही चित्रे इतक्या बारक्या सारक्या गोष्टींसकट काढली आहेत की पाहून आश्चर्य वाटते.

हे सगळे पाहत आम्ही ‘आपादाना पॅलेस’ पाशी आलो. या राजवाड्यात सम्राट दारियुश मान्यवरांच्या भेटी-गाठी घेत असे. हा त्या काळातील व पर्सेपोलिसमधीलही सर्वात भव्य राजवाडा होता. जवळजवळ अडीचशे फूट लांब व रुंद! सहा उंचच उंच खांबांच्या सहा रांगा येथे होत्या. आज मात्र या ‘आपादाना पॅलेस’चे भग्नावशेष तेवढे शिल्लक आहेत. इथे उभे राहून, पूर्वी हा वैभवशाली राजवाडा कसा असेल, याची कल्पना करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. ‘आपादाना’च्या डावीकडे
‘ताचारा पॅलेस’ होता. हा सम्राट दारियुशचा खाजगी राजवाडा. आकाराने लहान पण तितकाच देखणा! या राजवाड्याच्या जवळच ‘हादिश’ हा राजा झेरेक्ससचा खाजगी राजवाडाही आहे. याशिवाय ‘हारिम’ हा राजस्त्रियांचा राजवाडाही आहे. आता याच ठिकाणी संग्रहालय आहे. पण ‘नोरुज’मुळे ते बंद असल्याने ते पाहता आले नाही. सगळी माहिती सांगून, फोटो काढण्यासाठी आम्हाला मोकळे सोडून, ताहोरे इतर प्रवाशांकडे वळली.

आम्ही अक्षरशः अवाक् होऊन आजूबाजूला पहात होतो. अडीच हजार वर्षांपूर्वींची भव्य वास्तू, फक्त अडीच तासात पाहणे, समजून घेणे, या वास्तूचा सारा इतिहास जाणणे हे केवळ अशक्य होते. पण जे पाहिले, जे समजले, ते ही स्तिमित करणारे होते. पर्सेपोलीसच्या पाठच्या डोंगरावर तिसऱ्या आर्थाझेरेक्ससची कबर होती आणि आमच्या समोर पर्सेपोलीसची भव्य राजधानी होती. अलेक्झांडरने ३३० बी.सी. मध्ये ही वास्तू जाळून टाकली होती. कारण पर्शियन राजांनी त्याआधी दोनशे वर्षे ग्रीसवर स्वारी करून, तिथले अथीनादेवीचे प्राचीन आणि अनुपम सुंदर मंदिर जाळून टाकले होते. त्या काळात पर्शियन राजांना फक्त ग्रीस साम्राज्याचीच धास्ती वाटत होती. तिथला ज्ञानाचा वारसा, लोकशाहीची तिथे झालेली स्थापना यामुळे पर्शियनांनी ग्रीकांवर चढाई केली होती. पर्सेपोलीस जाळून अलेक्झांडरने त्या वेळच्या अपमानाची परतफेड केली.

मानवाची भव्यतेची, सौंदर्याची आणि निर्मितीची ओढ आणि त्याचवेळी त्याच्यामधील विध्वंसक वृत्ती, धर्म, क्षेत्र, वंश या बद्दलचा दुराभिमान – या दोन्ही गोष्टी या ठिकाणी मला प्रकर्षाने जाणवल्या. कोण बरोबर, कोण चूक यावर विचार न करता, मी त्या प्राचीन राजधानीला, ती बांधणाऱ्या कारागिरांना, तंत्रज्ञांना मनोमन वंदन केले.

पर्सेपोलीसहून जवळच ‘नेक्रोपोलीस’ ही जागा आहे. पर्सेपोलीसला फार्सी भाषेत ‘तख्त-ए-जमशीद’ असे म्हणतात तर नेक्रोपोलीसला ‘नक्श-ए-रोस्तम’ असे म्हणतात. रस्त्याच्या बाजूलाच चार मोठे डोंगर आहेत. त्यांच्यासमोर एक मोकळे मैदान आहे. या चार डोंगरात सम्राट दारियुश, त्याचा मुलगा झेरेक्सस, नातू आर्थाझेरेक्सस व पणतू दुसरा दारियुश यांच्या कबरी आहेत. हे सर्व राजे झोराष्ट्रीयन असल्यामुळे, मेल्यावर त्यांच्यावर अंतिम संस्कार करतात व त्यांची शवं डोंगरमाथ्यावर गिधाडांना खाण्यासाठी चाळीस दिवस ठेवत. गिधाडांनी कातडी-मांस खाऊन उरलेली हाडे, दारूने धुवून पुसून मोठ्या मानाने या थडग्यात पुरत असत. ही थडगी दुरुनच पहावी लागतात.

इथे बघण्यासाठी चार भित्तीचित्रे आहेत. एका चित्रात ‘अनाहिता’ ही पर्शियन देवता नर्से राजाला शक्तीवलय किंवा डायडेम देत आहे, असे दाखवले आहे. यातील देवीची वेशभूषा, राजाचे कपडे, अलंकार सुरेख कोरलेले आहेत. दुसऱ्या चित्रात पर्शियन राजांनी रोमनांविरुद्ध जय मिळवला, त्याचे वर्णन आणि चित्रण आहे. या चित्रात पहिला शापूर या शूर ससेनियन राजाची महती सांगितली आहे. भित्तीचित्रांसोबत इथे एक चौकोनी इमारतही आहे. या इमारतीला ‘काबा ऑफ झरतुष्ट्र’ असे म्हणतात. अकिमेनिअन काळात बांधलेल्या या इमारतीचा नेमका काय हेतू होता, कशासाठी ती बांधली यावर अनेक मते आहेत. मात्र कोणालाही याबद्दल पक्की माहिती नाही.

संध्याकाळ होत होती. सम्राट सायरस आणि सम्राट दारियुशच्या या ऐतिहासिक ठेव्याला मनात साठवत, आम्ही शिराझच्या दिशेने निघालो.


स्नेहा केतकर


No comments:

Post a Comment