आम्हा पन्नास
वर्षांहून जास्त जुन्या मित्रांनी नुकतीच एका यात्रा कंपनीबरोबर सपत्निक जपानची सहल
केली. सहप्रवासी आपल्यापेक्षा १० वर्षे तरुण
असलेले पाहून, जग पाहण्यासाठी आता फार दिवस उरलेले नसल्याचा साक्षात्कार झाला.
टोक्योला
उतरल्यावर सर्वप्रथम जी गोष्ट आपले लक्ष वेधून घेते ती म्हणजे सगळीकडे व सगळ्या गोष्टींमधे
दिसणारा व्यवस्थितपणा. एरवी टोक्यो ही न्यूयॉर्क किंवा लंडनची जपानी आवृत्ती म्हणावयास
हरकत नाही, उदा. तीच मॅकडोनाल्ड किंवा स्टारबक्सची दुकाने, फक्त कार सगळ्या जपानी.
तेथे बघितलेल्य़ा गोष्टींमधे दोन उल्लेखनीय़ वाटल्या. याकोहोमा भागात, विसाव्या शतकाच्या
दुसर्या दशकात आलेल्या सुनामीनंतर तेथे रहाणार्या भारतीयांनी बांधलेली पाणपोई आणि
टोयोटा कंपनीच्या शोरूममधे ठेवलेल्या भविष्यकालीन कार्स.
बऱ्याच प्रवाशांना
जपानला जाऊन माउंट फूजी न दिसता परत य़ावे लागते,
कारण तो सदैव धुक्याने वेढलेला असतो. आम्ही मात्र नशीबवान. आम्हाला उत्तम सूर्यप्रकाशात
दोन बाजूंनी, जपानी संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेला हा सुप्त ज्वालामुखी पाहता आला.
तेथे त्याला ‘फूजीसान’ म्हणजे आपल्याकडचा ‘फूजीराव’ म्हणतात. दगडाला देवत्व देण्याच्या
बाबतीत जपानी लोक आपले भाऊ शोभतात.
माउंट फूजी
पाहून आणि एका रमणीय तळ्याच्या बाजूला पारंपारिक जपानी जेवणाचा आस्वाद घेतल्यावर एका
बुलेट ट्रेनमधून ७०० कि.मी.चा प्रवास अडीच तासांत करून आम्ही हिरोशिमाला पोहचलो.
तेथे गेल्यावर
तेथील नागरिकांनी अणुबाँबने झालेली दुर्दशा भावनिक व भौतिक दृष्ट्या किती उत्तमपणे
पचवली आहे हे दिसून येते. मुद्दाम जतन केलेल्या एका इमारतीशिवाय एकसुद्धा इमारत पडीक
किंवा रंग उडालेली दिसत नाही. संपूर्ण शहर, टोक्यो, ओसाका, किंबहुना कुठल्याही प्रगत
देशांतील शहराइतकेच सुंदर व आखीव-रेखीव आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, ज्या निर्विकारपणे
तेथील नागरीक त्या दुर्घटनेबद्दल बोलतात त्यावरून त्यांनी संबंधित व्यक्ती व देशाला
क्षमा केल्याचे दिसून येते.
Model of the atom bomb, named Little Boy dropped on Hiroshima at 8.15 am 6th August 1945 |
Peace monument |
School Children offering paper cranes |
शांती स्मारकाच्या
तिसऱ्या बाजूला एक प्रदर्शनाची इमारत आहे. तेथे दाखवल्या जाणाऱ्या, मॉनीटरवरील चित्रफिती
आणि जतन केलेल्या वस्तू मनावर कायमचा आघात करतात व सर्व लोक अंतर्मुख होऊन निःशब्दपणे
बाहेर पडतात. तिथे’ असलेली लहान तीन चाकी सायकल, पुन्हा घशात आवंढा आणते. तेथेच ह्या
शहराच्या नागरिकांनी एवढ्या मोठ्या प्रलयातून बाहेर पडण्याकरिता केलेल्या प्रयत्नांची
आणि मानसिकरित्या सावरून मनाला कटूता किंवा विक्टिमहूडच्या भावनेपासून दूर ठेवण्यात
मिळालेल्या यशाकडे बघितले की खरे शूरवीर आणि देशभक्त कोण असतात हे कळते.
हिरोशिमाहून
सडकमार्गे, ४०० कि.मी.चा प्रवास करून आम्ही ओसाकाला पोहचलो. जपान हा बेटांचा देश आहे
हे पुस्तकात वाचल्यामुळे वाटेत लागलेली, ऑस्ट्रिया किंवा स्विटझरलंडसारखी दिसणारी जंगले
पाहून आश्चर्य वाटले. आणि अशा वाटेवरसुद्धा भारतीय जेवण देणारे हॉटेल शोधल्याबद्दल
आमच्या यात्रा कंपनीचे कौतुक वाटले व मेरा भारत महान है, हे पुन्हा पटले.
ओसाका शहाराच्या
बाहेर असलेला किल्ला बाहेरून पहाताना चेरी ब्लॉसम कशाला म्हणतात हे तेथील बागेत बहरलेल्या
असंख्य चेरीच्या झाडांमधून हिंडताना कळाले.
आमच्या प्रवासाच्या
शेवटच्या टप्यात आम्ही जपानच्या जुन्या राजधान्या, क्योटो आणि नारा ह्या शहरांना भेट
दिली. शालेय पुस्तकांत वाचलेले जपान क्योटोत दिसले. लाकडाची बैठी घरे, त्यांच्या टुमदार
बागा आणि बौद्ध मंदिरे. येथेसुद्धा ह्या देशानी आधुनिकतेची आणि पारंपरिकतेची किती व्यवस्थित
सांगड घातली आहे, हे खालील उदाहरणानी सिद्ध होईल.
क्योटोतील
एका मंदिराच्या परिसरातील एका झऱ्याचे पाणी प्याल्याने आयुष्य वाढते असा समज आहे. साहजिकच
तेथे लांब रांग असते, पण एकदा वापरलेले लांब दांड्याचे ग्लास यू.व्ही. किरण वापरून
निर्जंतुक करण्याचे मशिनसुद्धा बसविलेले आहे. नारा येथे तेथील राष्ट्रीय उद्यानात शेकडो
हरीण दिसतात. ही हरिणे म्हणजे आपले पूर्वज आहेत अशी जपानी लोकांची समजूत आहे.
No comments:
Post a Comment