जीवनस्पर्शी - भाग ६.

 

म्हणी की मैत्रिणी.....



बोलीभाषेच्या प्रचंड विविधतेत म्हणींना आगळे वेगळे स्थान आहे. आकाराने अगदी लहान पण आशय सांगण्यात महान असे म्हणी या वाक्य प्रकाराचे वर्णन करता येईल. म्हणींना लोकोक्ति असेही म्हटले जाते. हे वर्णन सार्थ आहे असे म्हणावेसे वाटते, कारण या म्हणींचा जन्मच लोकजीवनातून झाला असावा. पिढ्यान् पिढ्या संक्रमित झालेल्या या म्हणींची पाठ्यपुस्तके कधीही उपलब्ध नव्हती आणि नसतात. मात्र म्हणींमध्ये लोकजीवनाचं काळानुरूप प्रतिबिंब पडलेलं दिसतं. उदाहरणार्थ 'घरोघरी मातीच्या चुली', 'वरातीमागून घोडे', 'काखेत कळसा आणि गावाला वळसा' या म्हणी जुन्या काळातील आहेत हे आपण लगेच ओळखू शकतो.

आता काळानुरूप म्हण म्हणायची तर 'घरोघरी गॅसच्या शेगड्या' किंवा 'घरोघरी इंडक्शन स्टोव्ह' असे म्हणावे लागेल. किंवा वरातीमागून घोडे च्या ऐवजी जेवणाच्या मागून स्टार्टर असे काही म्हणावे लागेल. किंवा काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणी ऐवजी चष्मा डोक्यावर शोधतात घरभर असे म्हणावे लागेल.

लोकसंगीतातील गीतांचे कवी कोण हे जसे कायम अज्ञात असते तसे या म्हणी कोणी रचल्या हे कोणालाच ठाऊक नसते. तरीपण म्हणींमधून प्रकट होणारा अर्थ मनाला एकदा पटला, की ती म्हण माणसाच्या मनात पक्की होऊन जाते. म्हणींमध्ये व्यावहारिक शहाणपण ठासून भरलेले असते. समाजातील मानसिकता देखील या म्हणी आपल्याला छान समजावून देतात. उदाहरणार्थ 'पाठ फिरली की लोक राजाला सुद्धा पाजी म्हणतात'.किंवा 'करून गेले गाव आणि बाबुरावचे नाव', 'लेकी बोले सुने लागे', 'नावडतीचे मीठ अळणी', 'उधारीचे पोते सव्वा हात रिते' (उधार आणलेल्या मालात काहीतरी कमी असणारच), 'बढाईला पुढे आणि लढाईला मागे' (नुसती बडबड करण्यात पुढे), 'सांगायला गेले तर टांगायला जातात', किंवा 'पाप आढयावर बोंबलत अंधारात केलेलं उजेडात येतं' (खोटं केव्हा ना केव्हा उघडकीला येतंच) त्याला मोठं कारणही लागत नाही.

माणसाच्या प्रवृत्तीवर प्रकाश पाडणाऱ्या म्हणीही भरपूर आहेत. 'असतील शिते तर जमतील भुते' त्याचप्रमाणे 'जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी', 'कामापुरता मामा ताकापुरती आजीबाई', 'हात ओला तर मित्र भला', अशा माणसाच्या स्वार्थी प्रवृत्तीवर भाष्य करणाऱ्या काही म्हणी आहेत. काही म्हणींमधून जीवनाचे वास्तव सांगितलेले असते. त्यातून आपण शहाणपण शिकू शकतो. उदाहरणार्थ 'कोणी देता मोठी आशा, त्याची धरावी निराशा', 'घरात आली राणी, आईला विचारे ना कोणी'.किंवा 'गाढवाला केला शृंगार तरी ते मातीतच लोळणार', 'ऎकून घेत नाही, त्याला सांगू नये काही', किंवा 'आले पत्नीच्या मना, तिथे नवऱ्याचे चालेना'. अश्या म्हणी पाहिल्या की त्यातून मानवी प्रवृत्ती नेमकी ओळखून बरोबर मर्मावर बोट ठेवल्याची हुशारी जाणवते त्याला खरंच तोड नाही.

म्हणींमध्ये प्रचंड विविधता आहे हे खरेच, पण काहीवेळा एकाच आशयाच्या म्हणी वेगळ्या शब्द रुपात मांडलेल्या आढळतात. उदाहरणार्थ 'कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे श्याम भटाची तट्टाणी' ही म्हण दोन गोष्टींमधली प्रचंड तफावत दाखवते. याचअर्थाच्या वेगळ्या उदाहरणासाहित आलेल्या म्हणी वाचताना, ऐकताना पण मजा वाटते. उदाहरणार्थ 'कुठे बाभळ कुठे चंदन', 'कुठे मोगरा कुठे निवडुंग', 'कुठे लंका कुठे लाहोर', 'कुठे हा श्यामकर्ण आणि कोठे हा लंबकर्ण'? इ.

कधीकधी म्हणी आपल्याला हितकारक सल्ले सुद्धा विनामूल्य देतात. उदाहरणार्थ 'गोड गोड म्हणून खावे आणि वैद्यापाशी जावे' (अति गोड खाऊ नये) किंवा 'अचाट खाणे आणि मसणात जाणे' (खाण्याच्या अतिरेकाने मरण ओढवते), 'गेले ते ओझे आणि राहिले ते माझे' (हातून सुटून गेलेल्या गोष्टी विनाकारण त्रास देणाऱ्या होत्या हे समजून वाईट वाटून घेऊ नये.) 'कर्ज घेऊन आपण विसरतो पण सावकार सदा स्मरतो.'इ.

म्हणी अगदी कमी शब्दात आणि चटकदारपणे मांडलेल्या असतात. यात संक्षेपाबरोबर यमक, अनुप्रास, अतिशयोक्ती असे अलंकार आल्यामुळें सुद्धा त्या चटकदार होतात. उदा 'कडू कारले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडू ते कडूच', 'ऐन दिवाळीत दाढ दुखी', 'अग अग म्हशी मला कोठे नेशी', 'आळशाला त्रिभुवनाचे ज्ञान' इ.

तसे पाहायला गेले तर म्हणी ही छोटेखानी गद्य/पद्य वाङ्मयीन कृती असते. म्हणी हे केवळ वाक्य नसते तर त्यात त्या त्या समाजाचे प्रतिबिंब पडलेले असते. उदा - 'अव्वा चालली पंढरपुरा आणि वेशिपासून आली घरा' किंवा 'होता जिवा म्हणून वाचला शिवा'. या म्हणी खास मराठी संस्कृती, इतिहास यावर आधारलेल्या आहेत. 'आधी पोटोबा मग विठोबा' यातले शब्द मराठी प्रांताशी, भाषेशी नाते सांगतात.

असे असले तरी जगातील सर्व भाषांमध्ये म्हणी प्रचलित आहेत. आपल्या देशात तर रामायण आणि महाभारत काळापासून म्हणींचा वापर होत असल्याचे पुरावे सापडतात. परिवर्तन हा जगाचा अपरिहार्य नियम आहे. सगळ्या गोष्टी सतत रूपांतर करत असतात. मग छोट्या सुंदर चमचमीत म्हणी याला अपवाद कश्या असतील? म्हणींमध्ये सुद्धा बदल होत राहिले आणि नव्या म्हणींचा जन्म होतच राहिला आणि या पुढेही होत राहील. आता नव्या काळाला अनुरूप म्हणी वाचायला मिळतात.

★खाली मुंडी व्हाट्सअप्प धुंडी

स्वामी तिन्ही जगाचा चार्जेर विना भिकारी

मिळवत्या मुलीला मागणी फार

गोष्ट एक चित्रपट अनेक

घरोघरी फॅशनेबल पोरी

हार्ड डिस्कमध्ये नाही ते फ्लॅापीत कोठून येणार?

आपले ते पक्षांतर आणि दुसऱ्याचा तो फुटीरपणा

जया अंगी खोटेपणा, त्याला मिळे मोठेपणा

निवडणूक सरो नी मतदार मरो

हार्ड डिस्क सलामत तो सॉफ्टवेअर पचास

 

अशा कितीतरी म्हणी सांगता येतील. म्हणी कोणत्याही संदर्भात ऐकल्या किंवा वाचल्या तरी मनाला स्पर्शून जातात. जेवणाच्या ताटात कितीही वेगवेगली पक्वान्ने असली तरी कुरकुरीत, चवदार भजी जशी बाजी मारून जाते, तश्याच या म्हणी भाषेची लज्जत वाढवतात. काळाला साजेशी जीवनाची ओळख सुद्धा करून देतात. मैत्रिणीच्या जिव्हाळ्याने न दुखावता सल्ला देतात. ग्रंथ जसे गुरू असतात तश्या म्हणी देखील मैत्रीणी असतात. आपल्या हितचिंतक, कधीही अंतर न देणाऱ्या आणि हो, एखाद्या वादविवादात त्यांना वापरलं तर आपली बाजू बळकट करणाऱ्या देखील असतात. त्यांचा आधार घेऊन बोललं की त्यांच्यातली मार्मिकता योग्य ठिकाणी योग्य तो परिणाम साधतेच.

शर्मिला पटवर्धन फाटक




No comments:

Post a Comment