अप्सरा आली..........
या एप्रिल महिन्यामधलीच गोष्ट! बंगलोरला माझ्याकडे आंब्याच्या
उद्योगात काम करायला येणाऱ्या मुलांना संध्याकाळी घराजवळ सोडत
होते. कॉलेजमध्ये
नुकतीच जायला लागलेली काही मुलं आणि कॅशियरचे काम करणारा, पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेला थोडा
सिनियर मुलगा.
सिग्नलला गाडी थांबवली आणि अचानक
गाणं कानावर पडलं,
'अप्सरा
आली इंद्रपुरीतून खाली.......'
बंगलोरमध्ये अशा अचानक मराठी गाण्याच्या ओळी
कानावर पडणं सहसा घडत नाही. मी मागे वळून पाहिलं तर यातल्याच एका
मुलाच्या मोबाईलवरन हे स्वर नाचत गात येत होते. मी कन्नड भाषेत विचारलं ,"हे गाणं माहीत
आहे तुम्हाला?"
उत्तर आलं,"मॅडम, केवढे पॉप्युलर गाणं आहे हे. एकदम सुपरहिट!"
ग्रॅज्युएट झालेला मुलगा आणि First PUC मध्ये जाणारी दोन्ही मुले सांगत
होती. मी पुन्हा
आश्चर्य चकित होत विचारलं, ""हे मराठी गाणं? की
शब्द कन्नड मध्ये आहेत?"
"नाही, मॅडम, कन्नड
नाही, मराठी भाषा
आहे. प्रचंड पॉप्युलर गाणं आहे हे. कितीतरी जणांचा रिंगटोन आहे हा. मोबाईलवर, इन्स्टाग्रामवर बघा, बहार उडवली आहे या गाण्याने. गेली चार पाच वर्षे धुमधडाक्यात चालू
आहे."
दिवसभर आंब्याचं दुकान चालवताना झालेल्या
सगळ्या दमणुकीवर कुणीतरी मंत्र टाकून सारा शीण घालवून टाकावा तशी अवस्था झाली
माझी. माझी खुशी
बघून मुलांनी गाण्याचा आवाज मोठा केला. या गाण्याने आपले स्वत्व टिकवून
परप्रांतीयांना मंत्रमुग्ध केलेलं बघून माझं मन खरंच प्रफुल्लित झालं.
कवी गुरू ठाकूर यांचे शब्द, अजय अतुल यांचे संगीत, बेला शेंडे यांचा आवाज...चित्रपटात
हे गाणं चमक
चांदणी सोनाली कुलकर्णी हिने चंदेरी पेहरावात हे गाणे तितकेच देखणे सादर केले आहे.
ड्रायव्हिंग करता करता स्वर कानांवर
पडत होते. कन्नड
भाषिक तरूणाई ऐकत होती....
कोमल काया, की
मोहमाया, पुनव
चांदणं न्हाले
सोन्यात सजले,
रुप्यात भिजले, रत्नप्रभा
तनू ल्याले
ही नटली थटली, जशी
उमटली चांदणी रंगमहाली
मी यौवन बिजली,
पाहून थिजली, इंद्रसभा भवताली
अप्सरा आली,
इंद्रपुरीतून खाली........"
काय मनोवेधक शब्द. या शब्द सुरांनी वेडावले नाही ते खरं
रसिक मनच नव्हे.
या लावणीचे कवी गुरू ठाकूर यांना अनेकांनी, अनेकदा विचारलं की 'अप्सरा आली' हे एका सौंदर्यवतीचे वर्णन असले, तरी ते लिहिताना तुमच्या समोर नेमकं
कोण होतं?
गुरू ठाकूर यांच्या उत्तराचा आशय असा
होता की, ही लावण्यवती म्हणजे लावणीच. साहित्य विश्वातील ती साक्षात अप्सरा
आहे. कोमल काया
की मोहमाया? असा गोड प्रश्न त्यांना ही आपल्या
आयुष्यातील पहिलीच लावणी लिहिताना पडला आणि त्यांना जाणवलं, की ही नुसती सुंदर नाही तर शृंगार
रसात नटून थटून ती एखाद्या अप्सरेसारखी पृथ्वीतलावर उतरली आहे. आणि कस्तुरी सारखी मनामनात दरवळते
आहे. नेमक्या याच
विचारातून हे काव्य कागदावर उतरलं असंही त्यांनी सांगितलं. खरंच लावणी काव्यप्रकार आणि नृत्य
सुद्धा भल्याभल्यांना भुरळ घालतो. रंगेल रसिक तर तिला आपल्या पद्धतीने
बेभान होऊन दाद देतातच,पण
अनेक विद्वान,अगदी संत कवींनी देखील तिच्या रुपलावण्याची दखल घेतली आहे. शब्दप्रभु कवी गुरू ठाकूर यांनी या
लावणीतून एकाच वेळी दोन अर्थ किती समर्थपणे मांडले आहेत. गाण्याला मिळालेलं यश अनेकांचं असतं
हे खरंच,
पण त्याचा पाया मुळात गीतकाराने रचलेला असतो.
ही लावणी रचताना, हे प्रतिभेचे दान
घेताना कवींची मनस्थिती कशी असेल? याचा विचार करताना गुरू ठाकुर यांचेच
शब्द मन तरंग होऊन आले......
कधी शब्द आले सुरांनीच
न्हाले
मलाही न कळले कसे गीत
झाले
गुरू ठाकुर उत्तम छाया चित्रकार, चित्रकार, व्यंगचित्रकार, लेखक सुद्धा आहेत. त्यांनी शब्दांनी चितारलेले हे
अप्सरेचे चित्र,
अनेकांच्या मनावर साऱ्या सुंदरतेसह उतरलं आहे. आज मराठी मुलांप्रमाणेच दाक्षिणात्य
भाषा बोलणाऱ्या अनेक मुलांच्या आयपॉडवर, मोबाईलमध्ये ही अप्सरा उतरून आली
आहे. लोक
संगीतातील नवलाई त्यातून मिळणारा आनंद नवीन पिढीला नक्कीच कळला आहे.
गुरु ठाकूर |
असं म्हणतात, हृदयापासून निघालेलं हृदयापर्यंत
पोचते ! आणि ते
पोचताना कसलाही अडथळा येत नाही. ना भाषेचा ना अंतराचा.
या अप्सरेने मराठी न कळणाऱ्या लोकांची
मने जिंकून हेच तर सिद्ध केलंय.....
शर्मिला पटवर्धन फाटक, बंगलोर
No comments:
Post a Comment