जीवनस्पर्शी -भाग ३

 अजूनी अंतरात......


भावगीत ऐकणं हा जीवनाचं प्रतिबिंब दाखवणारा आणि मनावर फुंकर घालणारा अनुभव असतो. त्यातील काही जीवलग भावगीतं कानातून सरळ गळ्यात उतरतात, आपण ती पुन्हा पुन्हा गुणगुणायला लागतो. कालांतराने अशी गाणी थोडीशी विस्मरणात गेली तरी त्यांचं आणि आपलं नातं कायमस्वरूपी असतं; कारण ही गाणी बऱ्याच वर्षानीही आपल्या मनाचा ठाव घेतात. परवा असेच खूप वर्षांनी सुप्रसिद्ध गायिका प्रमिला दातार यांनी गायलेलं. 

 

"बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात,

भेट आपुली स्मरशी काय तू मनात?"  - हे गाणे  ऐकले.

 

मूळ रेकॉर्डमध्ये हे गाणे पंडित वसंतराव देशपांडे यांच्या भावगर्भ, लाघवी स्वरात आहे. श्रीनिवास खळे यांची अर्थ खुलवणारी संगीतरचना कवितेच्या सौंदर्यात भर घालते. मुळात हे शब्दशिल्प कवी वा.रा.  म्हणजे वामन रामराव कांत यांचे. अतिशय आल्हाददायक आणि चपखल शब्दांच्या बांधणीने घडलेलं! प्रियकर प्रेयसीच्या भेटीचे संदर्भ निसर्गसाक्षीने आपल्यापुढे ठेवणारं भाव गहिरे  गीत.

 


"छेडीती पानात बीन थेंब पावसाचे

ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाचे

मनकवडा घन घुमतो दूर डोंगरात"

 

शा निसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रेम फुलत असतानाच पुढच्याच कडव्यात कवी विरह देखील दाखवून देतो.

 


"त्या गाठी, त्या गोष्टी, नारळीच्या खाली

पौर्णिमाच तव नयनी भरदिवसा झाली

रिमझिमते अमृत ते विकल अंतरात॥"

 

फक्त 'विकल' या एका शब्दात कवीने फार मोठा आशय व्यक्त केला आहे. आता त्या भेटी होत नाहीत तरी त्याच्या मनात आठवणी अजूनही भळभळत आहेत, हे फक्त एका शब्दात सांगण्याचं कवीचं सामर्थ्य अलौकिक आहे. कवितेतील निसर्ग चित्रण जसे लक्षवेधी आहे तसेच शब्दातून साकारले जाणारे भावबंधही खिळवून ठेवणारे आहेत. निसर्ग आणि प्रियकराचे मन यांची एकात्मता या रचनेत फार सुंदर साधली गेली आहे. "गेयता" हा गुण सुद्धा यातल्या शब्दा-शब्दा मधून जाणवतो. यात वापरल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाच्या अंतरात किंचित उदासवाणे पण गेय संगीत आहे हे लक्षात येतेच.

 


हातासह सोन्याची सांज गुंफताना

बगळ्यांचे शुभ्र कळे मिळूनी  मोजताना

कमलापरी मिटती दिवस उमलूनी तळ्यात"

 

हे तळे म्हणजे कवीचे मन आहे. आणि त्याच्या मनात या दिवसांच्या मधुर आठवणींची उघडमीट चालू आहे.

 

कवितेच्या पहिल्या ओळीपासून हे जाणवते की कविला ही बगळ्यांची माळ आपल्या आतुर भेटीची साक्षीदारच नव्हे तर प्रतीकच आहे असे वाटते. त्या सर्वसाक्षी आकाशाकडे पाहिलं की त्या अंबरासह पूर्ण आसमंतात आपल्या प्रेमाच्या आठवणी रेखलेल्या आहेत असे या अतिउत्कट मनाच्या प्रियकराला वाटत राहते. कवितेच्या सुरवातीलाच कवी बगळ्यांची माळ फुले (फुलणे) असे वर्णन करतो. 'उडणे' या क्रियापदाचा वापर इथे नाही. 'फुले' या शब्दातून मनाच्या तारा छेडल्या गेल्याचं जाणवतं. त्यामुळे 'बगळ्यांची माळ' म्हणजे त्या भेटी असाच अर्थ काढणं मनाला जास्त पटतं. कारण शेवटी कवी म्हणतो,

 

तू गेलीस, तोडून ती माळ, सर्व धागे

फडफडणे पंखांचे शुभ्र उरे मागे

सलते ती तडफड का कधी तुझ्या उरात?"

 

प्रेयसीची ताटातूट झाली तरी कवीचे मन फार समजूतदार आणि सुसंस्कृत आहे. कवितेत प्रेयसीच्या शारीरिक रूपाची वर्णने कोठेच येत नाहीत. कवीचे प्रेम समंजस आहे. आता ती जवळ नसली तरी कवीच्या मनाच्या कॅनव्हासवर निर्मळ शुभ्रता उरलेली आहे. जशी ती त्या बगळ्यांच्या माळेत होती. म्हणजेच भेटींमध्ये होती.

 

गाणं वाचताना आपल्याला कवीला मानवंदना द्यावीशी वाटते. खरंच वा.रा.कांताच्या चित्रमय शब्दकलेची शक्ती फार मोठी आहे. कवी अनिल, बोरकर, कुसुमाग्रज यांच्या पंक्तीत स्थान असणाऱ्या वा.रा.कांतानी रसिक मनाला मोहात पाडणाऱ्या अनेक तरल गहिऱ्या शब्दरचना काव्य रसिकांसमोर ठेवल्या आहेत. मूळचे मराठवाड्यातील आणि नंतर मुंबईत स्थायिक झालेल्या वा.रा.कांतानी विपुल साहित्य लिहिले. शततारका हा रुबायांचा संग्रह, वेलांटी, वाजली विजेची टाळी, मावळते शब्द यासारखे चौदा कवितासंग्रह, दोन नाटकं, दहा अनुवादित ग्रंथ, समीक्षापर लेख, ललित लेख अशी मोठी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे.

 

६ ऑक्टोबर १९१३ साली नांदेड मध्ये जन्मलेले वा रा कांत मराठी सारस्वताचे खरे समर्थक होते. मराठवाड्यात जेव्हा निजामाची राजवट होती आणि उर्दूचे आक्रमण जेव्हा मराठी भाषेवर सतत होऊ लागले तेव्हा त्या प्रांतात मराठी भाषेचे स्थान अढळ राहावे या करता तिथल्या काही साहित्यिकांनी जीवापाड प्रयत्न केले. त्यातले एक प्रमुख साहित्यिक म्हणजे वा. रा. कांत. साहित्य क्षेत्रातले अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. ८ सप्टेंबर १९९१मध्ये त्यांचे  मुंबईत निधन झालं. ते आपल्यातून गेले पण अनेक अविसमरणीय कवितांचा ठेवा आपल्यासाठी ठेवून.

 

"सखी शेजारीणी तू हसत राहा,हास्यात पळे गुंफित राहा" किंवा "आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको" शिवाय "राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे" किंवा सुधीर फडके यांनी गायलेलं "त्या तरुतळी विसरले गीत" तसेच "आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको" या सारख्या त्यांच्या शब्दरचना दिग्गज संगीतकारांचा स्वरसाज लेवून रसिकमनात रुंजी घालत राहिल्या.

 

तरी पण, बगळ्यांची माळ फुले ऐकताना ....माझी तरी अवस्था "बगळ्यांची माळ फुले अजुनी "अंतरात" अशी होते.

 

शर्मिला पटवर्धन फाटक. बंगलोर.



No comments:

Post a Comment