भेट तुझी माझी स्मरते. . . .

 



लहानपणापासून लता मंगेशकर या नावाची जबरदस्त मोहिनी मनावर होती. आमच्या पिढीने तर पाळण्यात गाई गाई करताना पण त्यांचीच गाणी ऐकली होती. पुढे जीवनाला सामोरं जाताना प्रत्येक प्रसंगात लता मंगेशकरांच्या स्वरांची साथ होतीच. किंचित जाणत्या वयात आनंद म्हणजे काय ते त्यांच्याच गाण्यातून समजलं. मन बेचैन झालं की त्यावर दीदींच्या गाण्यांचा चंदनी लेप लावून घेणं हे तर नेहमीचंच होतं. दीदींच्या अभंगामधून आम्ही संत पाहिले, देशभक्ती शिकली. तरुणपणी त्यांच्याच स्वरलयीत मेंदीच्या पानावर झुलणारं मन अनुभवलं. संगीताशी संलग्न असलेल्या प्रत्येकाच्या मनातल्या मोराचा पिसारा दीदी सदा फुलवतच राहिल्या आणि दीदींच्या  गाण्याबरोबर लता मंगेशकर या व्यक्तीचंही अढळ स्थान रसिकांच्या मनात निर्माण झालं. जगाच्या पाठीवर कुठेही जा, दीदींची गाणी आपल्याबरोबर असलीच पाहिजेत अशी माझी स्वतः ची आणि इतर कितीकांची भावनाही प्रत्यक्षात अनुभवायला यायला लागली. दीदींचे स्वर जीवनात अतूटतेने गुंफले गेले होते.

 

आमच्याकडे येणाऱ्या स्नेही मंडळींकडून लतादीदीबद्दल काही ना काही नेहमी ऐकायला मिळत असे. लंडनचे मधूकाका अभ्यंकर लतादीदींबद्दल खूप सांगायचे दीदी त्यांच्या घरी लंडनला उतरल्या होत्या. त्यानंतर दीदीने त्यांना पाठवलेले भाराचे पत्र त्यांनी आम्हाला सर्वाना मोठ्या कौतुकाने वाचायला दिले होते. माझी चुलत बहीण डॉ वंदना घांगुर्डे नियमित प्रभुकुंज मध्ये जाणारी. दीनानाथ मंगेशकरांवर तिने पीएचडी केले आहे. तिच्या बरोबर गप्पा मारताना दिनाबाबांबरोबर दीदींचा उल्लेख यायचा. वि..खांडेकरांच्या कन्या मंदाताई खांडेकर आमच्याकडे राहायला आल्या होत्या तेव्हा त्या नुकत्याच प्रभुकुंज मध्ये राहून आल्या होत्या.

 

'नाच ग घुमा' पुस्तकाच्या लेखिका माधवीताई देसाई इथे बंगलोरच्या आमच्या घरी राहायला आल्या होत्या. त्यांना  लतादीदींनी दिलेलं, गळ्यातील लॉकेट त्यांनी मला आवर्जून दाखवलं होतं. त्यातलं पदक उघडता यायचं आणि त्यात भालजी पेंढारकर यांचा म्हणजे बाबांचा फोटो लतादीदींनी आठवणीने बसवून घेऊन त्यांच्या कन्येला म्हणजे माधवी देसाईंना दिला होता. बंगलोर मध्ये मी इथल्या प्रसिद्ध गायिका श्यामला भावे यांच्याकडे जायची. त्यांनी मुंबईत राहून लतादीदींना कन्नड भजने शिकवली होती असाही उल्लेख मी श्यामला ताईंकडून ऐकला होता. पण जन्मल्यापासून मला सुखवण्याऱ्या ह्या स्वरमाधुर्याला मी कधी पाहणार? असे मला राहून राहून वाटायचे.

 

मध्यंतरीच्या काळात श्यामला भावेंचे  जीवनचरित्र लिहीत होते. एकदा श्यामलादीदींचा मला फोन आला. त्या म्हणाल्या,"मी पुढच्या आठवड्यात दोन तीन दिवस मुंबईला जाणार आहे. माझ्या हस्ते लता मंगेशकर यांचा सत्कार आहे." मी अवाक झाले. मी म्हटलं, "मला पण यायचं आहे या कार्यक्रमाला". श्यामलादीदीं म्हणाल्या, "माझी तिकीटं काढून पण झाली." कुठेही कार्यक्रम असला की त्वरित तिकीट बुक करण्याची श्यामला भावेंकडची शिस्त मला माहित होती.

 

मी म्हटलं, आता तिकीट कितीही महाग झालेलं असलं तरी मी तुमच्याच फ्लाईट मधून मुंबईला येणार आहे. आणि हा कार्यक्रम संपेपर्यंत तुमचा पदर घट्ट धरून ठेवणार आहे." मला बाकी काही माहीत नाही. त्या हसल्या. त्यांनी विमानाची माहिती दिली. आणि पुढच्याच आठवड्यातल्या एका सुरम्य सकाळी आम्ही मुंबईतील अंधेरीला श्री.मोहन आणि सौ.मानसी भावे यांच्या घरी पोचलो.

 

कार्यक्रम त्याच संध्याकाळी वर्सोव्याला पं.हरिप्रसाद चौरासिया यांच्या वृंदावन गुरुकुल मध्ये होता. योगायोग असा की त्या दिवशी तारीख होती १४ फेब्रुवारी २०१४. तिथे पोचल्यावर जाणवलं, हे वृंदावन गुरुकुल म्हणजे भगवंताच्या छायेतली वास्तू आहे. आत गेल्यावर उजव्या हाताला देवघर होतं. आत मुरलीधर आणि राधादेवी. दिव्याची शांत तेवणारी ज्योत आणि वातावरणातला पवित्र सुगंध अंतरंगातल्या गाभाऱ्यात पावित्र्य शिंपडून गेला.

 

डाव्या बाजूला आणखी एक हॉल होता. सत्कार समारंभ तिथे होणार होता. हॉलमध्ये सगळीकडे शुभ्रता भरून राहिली होती. खाली बसण्यासाठी अंथरलेल्या गाद्यांवर,गिरद्यांवर आणि खुर्च्यांच्या पाठीवर स्वछ पांढरी आच्छादने होती. भिंतीवर पांढऱ्या फ़ुलांच्या गुच्छांची सजावट शोभा वाढवत होती. स्टेज असं काही उभारलं नव्हतं. खाली अंथरलेल्या गालिच्यावर सर्वांना  दिसतील अशा गोलाकार पाठी असलेल्या खुर्च्या ठेवल्या होत्या.

 

थोड्या वेळाने समारंभासाठी माणसं जमू लागली. जमलेले सगळे बहुतेक सात स्वरांचे उपासक होते. त्या दिवशीचा लता मंगेशकर यांचा सत्कार केरळ मधील पयन्नूर गावी असलेल्या 'सतकलापीठम', या संस्थेतर्फे होणार होता. तेथील स्वामीजी कृष्णानंद भारतीजी लताजींना 'सतकलारत्न पुरस्कार' देणार होते. या कार्यक्रमाला मुंबईतले बरेच मल्याळी भाषिक तर होतेच पण केरळच्या पयन्नूर गावाहून एकवीस मल्याळी कुटुंब फक्त या कार्यक्रमाकरता मुंबईला ली होती.

 

थोड्या वेळाने हरिप्रसादजी आले. उस्ताद अमजद अली खान सपत्नीक आले. आणि मग अचानक जराशी धांदल उडाली. लताजींची गाडी गेट समोर येऊन थांबली. लताजी हॉलमध्ये आल्या. मोरपंखी काठाची पांढरी शुभ्र साडी त्यावर मोरपिसांची नक्षी. कानात लखलखत्या हिऱ्याच्या कुड्या आणि चेहऱ्यावर सात्विक स्मितहास्य. बरोबर कुटुंबातील दोन तरुण माणसं होती. बहुतेक आदिनाथ मंगेशकर आणि त्यांच्या पत्नी असाव्यात. ती मंडळी मागच्या खुर्च्यांवर बसली. लतादीदी, श्यामला ताई, हरिप्रसादजी आणि केरळचे स्वामीजी पुढच्या रांगेत.

 

लतादीदी त्या दिवशी खूप आनंदात दिसत होत्या. तिथे जमलेल्या मंडळींची त्या लांबूनच स्मितहास्य करून दखल घेत होत्या. माझी नजर त्यांच्यावरच खिळली होती. आज वृंदावनात साक्षात शुभ्र वस्त्रधारी सरस्वतीला बघायची मंगलघडी साधता आली होती. माझ्याकडे बघून पण त्यांनी सुंदर स्मितहास्य केलं कितीतरी वर्षांची ओळख असल्यासारखं!

 

लताजींचा सत्कार सुरू झाला. स्वामीजी, श्यामला भावे आणि हरिप्रसादजी या तिघांनी मिळून सन्मान करताच लताजींच्या मल्याळी गाण्याचे सूर वाजले, 'कदली कांकदली' (यु ट्यूब वर हे गाणं आजही ऐकता येते). मधुर स्वरांची पखरण झाली. सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. लताजी सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या, 'परमेश्वराच्या मनात असेल तर नक्की केरळच्या आश्रमात येऊन जाईन.' पुढे इतरांची भाषणे झाली.

 

निघता निघता लतादीदींना अभिवादन करून पुढे जावे म्हणून लोक त्यांच्याशी बोलायला जात होते. मी पण धाडस केलं आणि त्यांच्या जवळ गेले. रत्नागिरीला नाटकाच्या निमित्ताने दीनानाथजी यायचे तेव्हा आमच्या घरी माझ्या पणजोबांबरोबर ब्रिज खेळायला यायचे. त्यांचे पाय लागलेत आमच्या घराला. आणि माझ्या बहिणीने वंदनाने पुस्तक पण लिहिलंय. असे सांगितले त्यांना.

 

त्यांनी हसून किंचितसे  माझ्या खांद्यावर थोपटलं. मी पटकन त्यांना नमस्कार केला आणि साक्षात दीदींनी माझ्या पाठीवर हात ठेवला. कार्यक्रम संपला. बाहेर सर्वांकरता खास मराठी पद्धतीचे  साग्रसंगीत जेवण होतं. पण पोट खरंच भरलं होतं. आणि आयुष्यात एकदा तरी लताजींना भेटले या भावनेने मन कायमचं तृप्त झालं होतं. 


शर्मिला पटवर्धन फाटक, बंगलोर.



No comments:

Post a Comment