श्री कैलाशजी - अर्थात श्री कैलास पर्वत. म्हटलं तर एक सदा बर्फ़ाच्छादित पर्वत. पण धार्मिक आणि अधार्मिक अशा दोन्हीही मनांमध्ये कुतूहल, आदर उत्पन्न करणारे एक नैसर्गिक आश्चर्य. या कैलास पर्वताची परिक्रमा दोन वर्षांपूर्वी आम्ही केली. लिपूलेख खिंडीमधून जाणाऱ्या या मार्गाने सुमारे १५० किमी चालत केलेल्या या सफरीमध्ये, कैलाशजी, हिमालय या बरोबरच आमच्या ग्रुपमध्ये असलेले ५० जण हा सुद्धा एक अनुभवच होता. त्याबद्दल एक पुस्तिकाच लिहावी लागेल - पण या फोटो फिचरमध्ये या सगळ्याची फक्त झलक.
वाटेत जागोजाग यात्रेकरूंचं स्वागत केले जातं. "आम्हाला जाता येत नाही, तुम्ही चालला आहेत तेव्हा तुमची सेवा करू द्या .." अश्या भावनेने लोकं सामोरे येतात. वेगवेगळ्या भेटवस्तू देऊन कोडकौतुक केले जाते. |
या फोटोतल्या मुली दर चार दिवसांनी १८ वेळा तीन तास असा भजनांचा कार्यक्रम यात्रेकरूंसाठी सादर करतात. त्यांच्या श्रद्धेपुढे मान झुकवावीशी वाटते. |
ह्या गोलूबाबाच्या मंदिरातल्या घंटा. नवस बोलण्यासाठी ह्या मंदिरात घंटेला आपली इच्छेचा कागद लावून प्रार्थना करतात. काही जण स्टॅम्प पेपर वापरून आपला निर्धार व्यक्त करतात. |
आठवड्याच्या वैद्यकीय तपासण्या, बसचा अवघडून केलेला प्रवास संपवून शेवटी चालायला लागलो |
सबंध प्रवासात हिमालयाची जी विविध रूपं दिसतात त्यातले हे पहिले हिरवेगार दर्शन .. जसजसे उंचीवर जातो तसतसे राखाडी रंग जास्त दिसत जातो आणि शेवटी तो पांढऱ्या रंगात दाबून जातो! |
या रस्त्यावरच्या एका कॅम्पचे हे चित्र. मंडळी चहा पिऊन आता उद्यापर्यंततरी चालायला सुट्टी या आनंदात गप्पा गोष्टींमध्ये मग्न आहेत. |
त्यात परत जागोजाग धबधबे आणि दरड कोसळण्याची भीती ... पण थ्रिलिंग प्रवास. |
गुंजी ते नाभीढांग हा खड्या चढणीचा रस्ता - घोडयांनासुद्धा वारंवार थांबावे लागते. हिमालय आणि रौद्र सौंदर्य |
या नाभीढांगच्या कॅम्प समोर ओम पर्वत आहे. बर्फात उमटलेलं ओम अक्षर बघायला मिळणं हा एक सुंदर अनुभव असतो. |
चीनमधला दुसरा दिवस. मग होतं मानससरोवराचं पाहिलं दर्शन .. आमच्यासाठी काकणभर महत्वाचं - कारण त्यादिवशी आमच्या लग्नाचा वाढदिवसही होता ! दुधात साखर. |
मानससरोवर आणि नतमस्तक - No other option !! |
कैलास परिक्रमेची तयारी - कपड्यांच्या दोन तीन लेयर्स .. all set to go |
परिक्रमा सुरुवात करतात यमद्वारापासून ... साडेतीन प्रदक्षिणा घालत कैलास पर्वताकडे बाहेर पडायचे आणि सुरुवात करायची. समज अशी की जर परिक्रमा तुमच्या नशिबात नसेल तर तुम्हाला इथे संकेत मिळतो. |
या ठिकाणी कैलासजींचं अत्यन्त मनोहर दर्शन होतं. |
कैलास पर्वताच्या बाजूने चालता येण्यासारखी मोठी घळ आहे. त्यातून चालत जायचे असते - साधारणपणे ४० किमीचा हा प्रवास दोन मुक्कामात होतो. |
या परिक्रमेतला सगळ्यात उंच पॉईंट डोलमा पास आहे. डोलमा ही तिबेटी देवता आहे - आणि या मार्गाचं रक्षण करण्याची तिची जबाबदारी असते. हे रंगी बेरंगी ध्वज तिच्या प्रार्थनेसाठी अर्पण केलेले असतात. |
या मार्गावर डोलमा पास नंतर लगेचच गौरीकुंड नावाचं तळं दिसतं. या तळ्याचं पाणी कधी गोठत नाही असं म्हणतात. |
याचसाठी केला होता अट्टाहास - पहिल्या दिवशीचा मुक्कामाच्या पाठीला अथांग, उन्नत, राजस, कैलाशजी आहेत! किती बघू आणि किती नाही. मन धन्य धन्य करून टाकणारं हे दर्शन. |
मग आम्ही मानस सरोवरावर आलो. परत तेच. किती सुंदर.
निळ्या रंगाच्या किती छटा! अथांग विस्तार. पवित्र जल. मन शांत करणारी जागा. नतमस्तक
करायला लावणारी.
|
फोटो बरेच आहेत - आठवणी त्याहून जास्त. अनुभव - कडू, गोड, सुखद, मन थक्क करणारे, घाबरावणारे, सैनिकांचा अभिमान वाटायला लावणारे ... अविस्मरणीय या शब्दाचा अर्थ नीटच समजावणारे!!
अभिजित टोणगांवकर
No comments:
Post a Comment