कल्लोळ

 


अश्वत्थ म्हटलं की अध्यात्मिक वाटतो आणि पिंपळ म्हटलं की समोर 'पार ' दिसतो. अघळ पघळ गप्पा...मनाचं रितं होणं. माझ्याही आठवणीत असाच एक पिंपळ आहे. त्याच्या अंगाखांद्यावर खेळत मी लहानाची मोठी झाले. मित्र मैत्रिणी सोबत खेळणं बागडणं तर कधी खाऊची वाटी हातात घेऊन तिथेच तर असायची मी. मी एकटी नाही तर त्याच्या भोवती सतत कुणीतरी असायचं. शनिवार रविवार तर गप्पाष्टकाचा फड असायचा, अगदीच कुणाला वेळ नसेल तर रामराम तरी व्हायचा.

हा पिंपळ जितका फ्रेंडली होता तितकाच स्वतःचा आब राखून असायचा. कधी कधी तर कडक धोरण असायचे! एरव्ही त्याच्या पानांची होणारी सळसळ.... कधी स्वतःचे पानही हलू देत नसे. त्यावरून मी त्याचा मूड ओळखत असे. माझं विश्वच त्याच्या पायाशी होतं. तेव्हा तो मात्र उंच झेपावत दूरदृष्टीने काही ठरवत होता.

पिंपळाचं खोड, पान औषधी असतं म्हणे, इथे तर पूर्ण झाड माझ्या आयुरारोग्यासाठी झिजत होतं. या झाडाखाली थोडा वेळ थांबलं तरी भरपूर प्राणवायू मिळतो म्हणे,मला तर तो जन्मभराचा मिळाला.

लग्नानंतरही मी प्रत्येक वेळी घरी गेले की त्याच्या सर्वदूर व्यापाने माझं माहेरपण हिरवं गार होत असे. झाड जुनं झालं तरी बुंध्याशी पानं फुटलेली दिसायची, ही जगण्यातली वृत्ती होती! माझं विश्व् त्या पानावर तरुन नेणारं हे झाड एक तपापूर्वी अचानक कोसळलं... ते माझं पितृछत्र होतं. अनेक वादळं अंगावर घेऊन आता सुखाचे वारे वाहत असताना एका समाधानाच्या क्षणी त्याने अचानक निरोप घेतला.

झाडाची एकच बाजू बघत असलेली मी, आता मला पलीकडची बाजूही स्वच्छ दिसत होती. त्या बाजूने सुद्धा इतक्या लोकांचे प्रेम बघून माझा आदर अजूनच वाढला. प्रत्येकाचे त्याच्याशी आपले असे एक नाते होते. झाड गेलं तरी पार तसाच होता. परवाच्या खेपेला मात्र तिथे एक इमारत झाल्याचे कुणी सांगितले, म्हणजे तो पारही.. गेला. जून महिन्यात येणारा पर्यावरण दिवस, आज पितृदिन.आणि आता कुठूनसे कानी येणारे देवीचे भजन...

कल्लोळात स्नान केले

ओल्याने मी वर आले..

मी मात्र आज त्या सगळ्या आठवणींच्या कल्लोळात सचैल न्हाऊन ओलेत्याने वर आलेय.

मला त्या आठवणी पुसायच्या नाहीत.

 

उल्का कुलकर्णी

No comments:

Post a Comment