मागील भाग : 12-पालकत्व- नकार: छोट्या-मोठ्यांचा
त्याच्या कल्पनाशक्तीच्या धावेकडे
बघत तिने हळूच आवंढा गिळला. रंगीत पिसार्यासमोर घरातल्या पसार्याचा विचार फिका पडला.
‘मुलं काय बाई आम्हीही
वाढवली,पण आमची घरं नेहेमी नीटनेटकी असायची!’ असे जातिवंत टोमणे ऐकूनही त्या
मायलेकात विशेष फरक पडला नाही. या छोटुकल्याला मुक्तहस्त मिळत राहिला आणि पसार्यातून
कधी चहा,कधी पोळी,कधी मोज्यांची भाजी,कधी काय तर कधी काय निर्माण होत राहिलं.
आपली लहान मुलं आपल्या कामांच्या ‘मध्ये मध्ये’ येतात असं आपल्यापैकी अनेक जणांना वाटत असतं. आणि ती झोपली किंवा पाळणाघर/ प्ले ग्रुप अशी कुठेशी गेली की भराभर कामं संपवून घ्यायला हवीत असंही वाटतं. अगदी साहजिकच आहे असं वाटणं,कारण अगदी काही काळापूर्वीपर्यंत आपण एका विशिष्ट गतीनं कामं संपवू शकायचो. आता ते करताना आपण आपल्या लहानग्याकडे लक्ष देत असू तर त्याचा वेग कमी होणारच आहे. पण घरातल्या रोजच्याच आणि कधीच न संपणार्या कामांचा वेग कमी होताना आपण एक मोठ्ठं काम करत आहोत आणि ते खूप महत्त्वाचं आहे आणि प्राधान्यक्रमांच्या यादीत ते सर्वांत वर यायला हवं हे मात्र आपल्या शिस्तबद्ध आणि वक्तशीर मनातून निसटून जातं.
मुलं मुळातच कल्पक असतात. आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडणार्या गोष्टी मुलं खोट्या खोट्या किंवा जमेल तशा खर्या खर्या करून दाखवतात. आणि हे खूप लवकर सुरू होतं. दीड-दोन-अडीच वर्षांच्या आसपासची मुलं असं ‘प्रीटेंड अॅंड प्ले’ करू शकतात. भातुकली हा त्यातलाच प्रकार! पण कधी कधी तर काही साधनाविनाही हे नाटक त्यांना साधतं. कधी त्यांचे सर्व पदार्थ एका अधांतरी,अस्तित्वात नसलेल्या नळातून पाण्यासारखे बाहेर पडतात. तर कधी अस्तित्वात नसलेले भूभूचे डॉक्टर फक्त त्यांनाच दिसतात. बोलायला लागलेली मुलं तर या सगळ्यात धम्माल आणतात. आपल्याकडे फक्त त्यांना देण्यासाठी वेळ हवा आणि त्यांच्याएवढी मनाची लवचिकता हवी,मग तर ती अधिकच खुलून आपल्याला त्यांच्या ‘वंडरलॅंड’मध्ये येऊ देतात.
ही कल्पकता अजूनही कशाकशातून डोकावते. शिकलेली गाणी नेहेमी नीट म्हणणारा आरव अचानकपणे धून तीच ठेवून त्यातले शब्द बदलू लागला. नवीन शब्दांना तसा अर्थ नव्हता. ज्याला ‘जिबरीश’ म्हणावं असे ते चाललं होतं. शेजारच्या आज्जी लगेच म्हणाल्या,’भलता वात्रट झालाय बाई हल्ली! आधी कशी छान गाणी म्हणून दाखवायचा!’
खरंतर आरव वात्रट झाला नसून त्याची कल्पकता तो उत्स्फूर्तपणे दाखवतोय. आणि आत्तापर्यंत पाठ केलेली गाणी जशीच्या तशी म्हणून त्याने त्याच्या मेंदूची एक प्रकारची क्षमता दाखवली. आता त्याच धूनवर निरर्थक शब्द तेवढ्याच मात्रेमध्ये बसवून म्हणताना तो त्याच्या मेंदूची वेगळी क्षमता दाखवतो आहे. पण पाठांतराला आपण शाबासकी दिली आणि कल्पकतेला आपण वात्रट म्हणून हिणवलं.
खरं-खरं,खोटं-खोटं यातला फरकही हळू हळू मुलांना कळायला लागतो. या दोन्हीचा मेळ घालून स्वतःच्या शारिरीक मर्यादेत ते खेळ खेळतात. ओवीला ‘चहाटळ’ आईमुळे चहा करायला खूप आवडायचं. गॅस लावून त्यावर चहा तयार करणं हे आपल्या क्षमतेपलीकडचं आहे हे तिच्या लक्षात येत होतं. तिने सर्व साधनसामग्री खरी खरी वापरली. आईच्या मदतीने चिमूट चिमूट चहा साखरही पाण्यात घातली. दुधाच्या फंदात ती पडली नाही. तयार झालेलं रंगीत पाणी गाळणीतून गाळून कपात ओतलं आणि आईला नेऊन दिलं.
‘आई,मी तुझ्यासाठी चहा केलाय,' म्हणत रंगीत पाण्याने
भरलेला खराखुरा कप तिने पुढे केला. आपल्या तीन वर्षांच्या मुलीने आपल्याला चहा करून
द्यावा याशिवाय अधिक आनंदाची गोष्ट एखाद्या आईसाठी काय असेल! आईने खोटा खोटा चहा प्यायल्याचे
‘मट मट’ आवाज काढले.
‘आई, खरं खरं पी ना!’
ते रंगीत पाणी खरंखुरं प्यायला
काहीच हरकत नसल्याने आईनेही ते पिऊन खरीखुरी कौतुकाची थाप ओवीच्या पाठीवर दिली. ओवीला
आभाळ ठेंगणं झालं. आपण दुसर्यांसाठी काहीतरी करतो. ते त्यांना आवडतं आणि आपलं कौतुक
होतं हे त्या छोटीलाही कळलं. दुसर्यांसाठी करण्यातला आनंद काही प्रौढांसाठी मर्यादित
नसून लहानांनाही तो लागू होतो!
बाहेरून आलेल्या बाबाला अडीच वर्षांच्या
कबीरने विचारले ‘तुला पाणी देऊ?
मी देतो,मी देतो.’ अनुकरणातून शिकणं,संवेदनशीलता,करून बघण्याची धडपड कित्ती गोष्टी एका छोट्या प्रसंगातून घडत असतात. यावर
आपण काय उत्तर देतो त्यावर सगळं अवलंबून आहे. कित्ती तरी विविध प्रतिक्रिया मनात उमटू
शकतात,
‘हां! आलाय मोठा! चड्डी
सांभाळायला शिका आधी!’
‘अरे,थांब,तू सांडशील.’
‘पाण्याशी खेळायला
संधीच बघत असतो तो. काही पाणीबिणी द्यायचं नाहीस तू!'
‘अरे वा! मला तहान
लागलेली असेल हे कसं बरोबर ओळखलंस तू! धन्यवाद!’
एकदा स्वतःशीच ताडून बघा असा प्रसंग तुमच्याबरोबर घडला तर तुमच्या मनात काय काय येतं? काय यायला हवं? आणि या दोन उत्तरातलं अंतर कापण्यासाठी आपल्याला स्वतःवर किती काम करायची आवश्यकता आहे आणि आपली किती तयारी आहे ते काम करण्याची!
एकदा स्वतःशीच ताडून बघा असा प्रसंग तुमच्याबरोबर घडला तर तुमच्या मनात काय काय येतं? काय यायला हवं? आणि या दोन उत्तरातलं अंतर कापण्यासाठी आपल्याला स्वतःवर किती काम करायची आवश्यकता आहे आणि आपली किती तयारी आहे ते काम करण्याची!
प्रीती ओ.
opreetee@gmail.com
No comments:
Post a Comment