मेंदूला झिणझिण्या आणि मनाला बधिर करणारे एक नागडे, विदारक सत्य
एकेका फ्रेम मधून उलगडत जाते.
माणुसकीला काळीमा फासणारा नरसंहार आणि स्त्रियांवरील अत्याचार पाहतांना अगतिक
असल्याची भावना जास्त तीव्रतेने जाणवते. इतका द्वेष ,तिरस्कार कुठून, केव्हा, कुणामुळे निर्माण होतो... यातही घाणेरडे राजकारण आहेच आणि हे सांगताना लाज
वाटते. ही सर्व प्रक्रिया १९८६ पासूनच
सुरू होती. १९ जानेवारी १९९०च्या रात्री त्याचा कळस झाला आणि नेसत्या वस्त्रानिशी, जीव मुठीत धरून, अब्रू वाचवत हे सुखवस्तु, हवेल्यांमध्ये राहणारे लोक
बेघर, असहाय्य, कफल्लक अवस्थेत रातोरात मिळेल त्या वाटेने, मार्गाने भयभीत अवस्थेत स्थलांतर करत होते.
काश्मीरची संस्कृती, इतिहास, कला, हिंदु सनातन धर्माची उज्वल परंपरा, प्राचीन मंदिरे कुठे सगळे लुप्त झाले की आमच्यापासून ते दडवून ठेवण्यात आले? याला
कोण जबाबदार?
एक सुजाण दक्ष नागरिक म्हणून आम्ही
ही काहीच का जाणुन घेतले नाही? कारण सत्य स्वीकारायची सुद्धा भीती वाटते आम्हाला. समाज नाकर्ता, षंढ झालेला
आहे. सर्व धर्म समभाव या वृत्तीचे भूत मानगुटीवरून आता हाकलून दिले पाहिजे.
हा सिनेमा बनवताना दिग्दर्शकाने खूप काही मोह आवरले आहेत. कुठेही भडकपणा नाही.
महिलांवरील अत्याचाराचे चित्रण करताना कोणतीही मर्यादा ओलांडली नाही. पार्श्वसंगीत
आहे पण पटकथेला योग्य असेल तेवढेच. काश्मीरचे सौंदर्य दाखवण्याचा मोह आवरला आहे, कश्मीरी पंडित, त्यांची घरे ,आतली सजावट सगळे अगदी बारकाईने दाखवले आहे.
एकदा तरी चित्रपट नक्की पहावा असा आहे. दिग्दर्शन उत्तम आहेच कारण त्यांनी
पीडितांचे दुःख समजून घेतले आहे. प्रत्येक कलाकाराने आपापली व्यक्तिरेखा अतिशय
उत्कटपणे आणि प्रामाणिकपणे निभावली आहे. चित्रपटाची कथा ज्याच्या भोवती विणली आहे
तो कृष्णा पंडित याचा शेवटचा प्रसंग आणि त्यातील संवाद सगळ्यांचे बुरखे फाडणारा
आहे.
स्वप्ना सोमण
No comments:
Post a Comment