आली जरी कष्टदशा अपार

 

आली जरी कष्टदशा अपार, न टाकिती धैर्य कदापि थोर |

केला जरी पोत तो बळेची खाली, ज्वाला ते वरती उफाळी ||


अर्थ -कितीही संकट आली, त्यामुळे पुढचा मार्ग दिसेनासा झाला तरी, थोर लोक घाबरुन जात नाहीत. जसे अग्नि नेहमी वरतीच जोमाने येतो. मशाल काय किंवा साधी आगपेटी मधील काडी काय, ती पेटवून खाली केल्यावर अग्नीच्या ज्वाळा मात्र नेहमी जोराने वरतीच येतात.

काही काही वाक्ये ही अजरामर असतात आणि काळ कुठलाही असो त्या परिस्थितीत असलेल्या माणसाला ती बळ देतात असेच हे वाक्य. मनाला उभारी देणारे, विश्वास वाढवणारे, संकटांपेक्षा मोठे होऊन त्याच्याशी झुंज देण्याचे बळ देणारे. आमच्या घरातील कोणी संकटाने निराश असले की माझे सासरे कै. श्रीकांत गोविंद सबनीस हे वाक्य म्हणायचे आणि समजावून सांगायचे. हा रिवाज झाला होता त्यामुळे हे वाक्य ऐकल्यावर आपोआप उत्साह यायचा.

प्रत्येकाच्या आयुष्यात परीक्षा पहाणारा काळ येतो. अगदी संत महात्मे सुद्धा ह्यातून सुटले नाहीत. पण ते संयमाने त्या संकटरूपी परीक्षेत पास होतात आणि त्या काळावर, संकटावर मात करतात. संकटामुळे ते आपले धैर्य गमावून बसत नाहीत तर उलट दहा हत्तींचे बळ त्यांच्यात येते. हाच सामान्य आणि थोर माणसातला फरक आहे. संत महात्मे किंवा थोर माणसांचे चरित्र पाहिल्यावर ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कित्येक संतांची, देशभक्तांची (टिळक) किंवा अगदी शास्त्रज्ञांची (एडिसन) उदाहरणे ह्यासाठी देता येतील. टिळकांचे ‘पुनश्च हरिओम’ हे असेच लघुवाक्य.

निसर्ग ही मोठा गुरु आहे. आलेली परिस्थिति जशीच्या तशी आनंदाने स्वीकारणे हेच तर आजूबाजूला असणारी झाडे काय किंवा पक्षी काय आपल्याला शिकवत असतात. पानगळतीनंतर पुन्हा नव्या जोमाने झाडांना पालवी फुटते, नवनव्या कळ्या उमलू लागतात, त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनातही सुख-दु:खांचे प्रसंग येत असतात. फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशाला गवसणी घालण्याची महत्वकांक्षा वेगळीच प्रेरणा देते. पाडगावकर म्हणतात तसं, सांगा कसं जगायचे? रडत कण्हत की गाणं म्हणंत? हे प्रत्येकांनी आपापले ठरवायचे असते.

माणसाच्या जीवनात आलेल्या अडचणी प्रत्येकजणच आपापल्या परीने कमीजास्त प्रमाणात सोडवत असतो. आपल्या सर्वांच्या आयुष्यात करोनाचा हा अवघड काळ एकदम आणि अचानक आला. ह्या विषाणूने सर्वानाच अवचित पकडले. कोणीही कल्पना ही केली नव्हती अशी परिस्थिति अचानक उद्भवली. परिस्थिति एकच पण प्रत्येकावर झालेला परिणाम अगदी भिन्न. हातोड्याचा घाव काचेला चकनाचूर करतो पण लोखंडाला मात्र आकार देतो. ज्यांनी ह्या परिस्थितिचा आहे तसा  स्वीकार केला आणि धैर्याने, शांतपणे सामना केला त्यांना मार्ग नक्कीच मिळाला.

कुलूपाची किल्ली एका बाजूला फिरवली असता कुलूप लागते आणि तीच किल्ली दुसऱ्या बाजूने फिरवली असता कुलूप निघते. माणसाचा स्वभाव जिद्दी आणि प्रयत्नशील असतो. त्याचप्रमाणे प्रयत्न आणि जिद्द योग्य प्रकारे लावणे हेच गमक आहे. सर्वसामान्यपणे संकट आल्यावर हे संकट मलाच का आले ह्याचा विचार करण्यात खरंतर निम्मी शक्ती जाते. त्यानंतर नकारात्मक विचारांची शृंखला सुरू होते. नकारात्मक विचार चांगल्या विचारांना प्रत्यक्षात सिद्ध होण्यामध्ये अडसर ठरतात. पहिल्या विचारावर कार्यप्रवण होण्यामध्ये जरा काळ गेला की असे असंख्य विचार अडचणींचे डोंगर उभे करतात आणि चांगले विचार यायचे बंद होतात. थोर व्यक्तींच्या चरित्राचं परिशीलन केलं असता असं लक्षात येतं की, प्रतिकूल परिस्थितीतही केवळ सकारात्मक विचारांची साथ न सोडल्यामुळे ते असामान्य कार्य करू शकले.

करोनामुळे आलेली परिस्थिति बदलणे हे कुणा एकाचे काम नाही. हे पूर्ण जगावर आलेले संकट आहे. ताणतणावाच्या काळात तुम्ही तुमच्यापरीनं खूप काळजी घ्या.. (म्हणजे, मी व्यवस्थित हात धुवेन, social distanceचं पालन करेन, जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पाळेन) आता पुढं काय होईल याची काळजी करणार नाही. पण मी आजारीच पडणार नाही अशा भ्रमात राहणं चुकीचं ठरेल. काळजी घ्यायची आहे, करायची नाही.

कोणत्या गोष्टी नियंत्रणात आहेत, याचा विचार करणं गरजेचं आहे. तणावपूर्ण परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते. त्यामुळं तुम्हाला भीती, काळजी वाटू लागते. त्यामुळे परिस्थितीबद्दल सतत तक्रार न करीत बसता, आपल्या प्रयत्नांनी आपल्या आसपासचे वातावरण बदलता येऊ शकते. तसेच ज्या व्यक्ती जगाकडे किंवा परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टीने पाहतात, त्यांना सतत काही तरी नवे करून दाखविण्यासाठी संधी सतत मिळत राहतात. येणारी परिस्थिती ही नेहमी नवीन संधी घेऊन येत असते, अशी विचारसरणी ठेवण्याचा प्रयत्न करणे हे मात्र नक्की आपल्या हातात आहे.


मंजिरी सबनीस 



No comments:

Post a Comment