🌹🌹🌺🌺गणपती बाप्पा मोरया !!🌹🌹🌺🌺
संपादकीय
श्रावणाच्या सरींशी लपंडाव खेळता खेळता गणेशोत्सव दाराशी येऊन ठेपला की!!!!! ह्या वेळच्या कट्टा मध्ये वाचा देशोदेशीच्या गणेशोत्सवाबद्दल!!!! बुद्धीची ही देवता विश्वाच्या कानाकोपऱ्यात आपले अस्तित्व जाणवून देते आहे. श्रावणातील सणवार सगळेच आनंदात व उत्साहात साजरे करतात. त्यांचे स्वरूप थोडे बदललेले आहे इतकेच. कसे ते वाचा 'सणवार' ह्या लेखात. 'कीचकवध' गोष्टीतून जाऊया कोकणातील धमाल गणेशोत्सवात. 'आठवणीतला सिनेमा' ह्या शीर्षकाखाली दर महिन्याआड एका उत्कृष्ट सिनेमाची आठवण करून देणार आहोत. चांगल्या कलाकृती, मग ते साहित्य असो वा सिनेमा, कधीच जुने होत नाही. दर वेळी पाहताना त्यातील नव्या जागा आपल्याला सापडत जातात. कट्टाच्या चोखंदळ वाचकांना आवडेल असे वाटत आहे ही सिनेमाची वाट!!!
याशिवाय मित्रमंडळातील कार्यक्रमांचा अहवालही जरूर वाचा. लेखाखाली त्या कार्यक्रमाची link ही देत आहोत. त्यामुळे तुम्हांला तुमच्या सोयीने तो कार्यक्रम पहाताही येईल.
आपल्या मित्रमंडळाचे नवे वर्ष गणेशोत्सवापासूनच सुरु होते. आणि तसेच आपल्या कट्टाचेही. गेल्या वर्षी सुरु झालेल्या अनेक लेखमालाही ह्या महिन्यापासून आपला निरोप घेणार आहेत. जीवन कौशल्ये, गीताई, स्वरानंद ह्या लेखमालांचे शेवटचे भाग सप्टेंबर कट्टा मध्ये देत आहोत.
जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करणाऱ्या लेखमाला कट्टात द्याव्या असा आमचा प्रयत्न असतो. तो कितपत सफल झाला हे आम्हाला कळवलेत तर आनंद होईल. लेखमालेच्या लेखकांचे मनापासून आभार!!!!! अर्थात ह्या लेखमाला 'संग्रहित लेखमाला' ह्या शीर्षकाखाली 'मित्रमंडळ कट्टा' वर तुम्हांला वाचायला मिळतीलच.
त्याशिवाय एकटेपण, एखादे चालणे आणि दु:ख माझे वाटायचे ह्या कविता नक्की वाचा. सभोवताली उत्सवाचे वातावरण असतानाच आपले एकटेपण वा दु:ख अधिक तीव्रतेने जाणवते. आयुष्याचा हा देखील एक पदर आहेच........
सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!!!!
आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहे. कट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाईप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.
स्नेहा केतकर
No comments:
Post a Comment