लहान होते तेव्हा मला, भीती वाटे अंधाराची;
शेजारच्याच खोलीत एकट्याने जायला,
मी तयार नसायची.
मग आईजवळ
हट्ट करायची,
चल ना माझ्याबरोबर!
दिवा दे लावून, मग परत ये हवं तर!
कधी ती यायची, पण कामात असली,
तर मात्र ती एक युक्ती करायची;
म्हणायची...
जा बोलत माझ्याशी मोठ्याने,
मी सोबत आहे असंच वाटेल मग अगं,
अन् ती देखील मोठयाने बोलायची माझ्याशी,
आणि म्हणायची, "मेघना, मी आहे गं!"
मग नसे वाटत, मला भीती जराशीही,
वाटे...
आई असता सोबत, काळजी नाही कशाचीही!
असेच दिवस, महिने, वर्षं, झपाझप उलटली;
पाहता पाहता काळ गेला,
आज माझी मी स्वतंत्र झाली.
पण मोठं झालं म्हणजे भीती पूर्ण जाते,
असं नाही बरं का...
अजूनही कधी वाटली भीती,
तर आईलाच मारते हाका.
ती ही मग पूर्वीसारखीच म्हणते,
काळजी करू नकोस अगं...
हो पुढे, भिऊ नकोस,
"मेघना, मी आहे गं...!"
मेघना भावे
तत्त्ववादी
No comments:
Post a Comment