खरोखरीचा तुला दंडवत

 


परवा स्वरलता लतादीदींचं निधन झालं. अनेक कविता, लेख, आठवणी, अगदी लतादीदींना पत्र इत्यादी शब्द अभिव्यक्ती आपापल्या पद्धतीने अगदी सर्वसामान्यांपासून ते समाजातील मान्यवरांपर्यंत विविध पद्धतीने, वेगवेगळ्या माध्यमात, विविध माध्यमांवर विशेषतः समाजमाध्यमांवर येत होत्या. त्यात काही हळव्या, काही व्यवहारी, काही काही विस्तृत काही मोजक्या शब्दात, काही हृदयद्रावक आणि काही अगदी राजकीय सुद्धा वाचायला, पहायला, ऐकायला मिळाल्या. एखाद्याच्या जाण्यामुळे झालेली मानसिक स्थिती व्यक्त करावीशी वाटणं ही सहाजिक मानवी संवेदना आहे. आणि प्रत्येक व्यक्तीने कसं व्यक्त व्हावं याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहेच.

 

लतादीदी जाण्याचा माझ्यावर नक्की काय परिणाम झाला याचा मी स्वतःशीच विचार करायला लागलो. स्व.लतादीदींची प्रत्यक्ष भेट सोडा पण मी लतादीदींना प्रत्यक्ष पाहिलंही नाही. अशा माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाने जड जड शब्द वापरत दुःखाची अतिशयोक्ती करून उगाच शाब्दिक गळे काढण्याइतकं दुःख मला आत्ता झालंय का? असा प्रश्न जेव्हा मी मला स्वतःला विचारला तेव्हा त्याचं प्रामाणिक उत्तर 'नाही' असं आलं. मग मला प्रश्न पडला की मला दुःख झालंच नाही का ? त्याचं मनाकडून प्रामाणिक उत्तर 'नक्कीच झालं' असं मिळालं. मग दुःख नक्की कसलं आहे याचा अधिक विचार करता लक्षात आलं की आजचं दुःख हे माझ्यासारख्या सामान्य माणसाला दीदींच्या देहावसानामुळे त्यांची भेट किंवा दुरून दर्शन सुद्धा होण्याची अतिशय अंधुकशी शक्यताही मिटली आहे या जाणिवेत आहे.

 

त्यांच्या सहवासात असणाऱ्या, संपर्कात असणाऱ्या व्यक्तींना दीदींच्या प्रत्यक्ष देहावसानाचं तीव्र दुःख असणारच. त्यांच्या निकटवर्तियांनी त्यांच्या अनेक भक्तांनी, चाहत्यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शनही घेतलं. पण मला वाटतं माझ्यासारख्या सर्वसामान्यांसाठी त्यांचं शेवटचं गाणं हे त्यांचं खरं अंत्यदर्शन होतं. दीदींनी शेवटचं गाणं म्हटलं आणि या पुढे दीदी गाणं म्हणणार नाहीत हे कळलं तेव्हा मला आजपेक्षाही अधिक दुःख झालं होतं. खरंच त्यादिवशी मला आजच्यापेक्षाही अधिक वाईट वाटलं होतं.

 

दीदींच्या गाण्याबद्दल बोलण्याची मी अजिबात जुर्रत करणार नाही कारण एक तर माझा वकुब मी ओळखून आहे. आणि दुसरं म्हणजे माझ्यासारख्या सामान्य माणसाने अशा काही देवदत्त गोष्टी शब्दात पकडण्याचा फोल प्रयत्नही करू नये याची मला जाणीव आहे. मी इतकंच म्हणू शकतो की जसं सुर्यास्ताचं आभाळ पाहताना, भरतीचा समुद्र पाहताना, हिमालयाचं भव्य सौंदर्य पाहताना, उत्तम लागलेली तानपुऱ्याची जोडी स्वरेल गुंजारव करताना जसं वाटतं, त्याचं वर्णन करता येत नाही, तसंच अनुभवाच्या पातळीवर एक सामान्य रसिक म्हणून दीदींचं गाणं ऐकताना मला वाटायचं.

 

दीदींच्या असंख्य प्रतिमा आज ध्वनिमुद्रणांच्या रुपात आज मनामनात आहेत. आणि यापुढेही राहणार.  'हे हिंदू नृसिहा प्रभो शिवाजी राजा' हे यापुढे प्रत्येक शिवजयंतीला लागणारच. शहिदांच्या आठवणीं ' ए मेरे वतन के लोगो' याही पुढे जागवत राहणार. भक्तांच्या मनात फुललेल्या मोगऱ्यावर, रुणझुण भ्रमर रुंजी घालत राहणार. आपल्या तरुणाईत ऐकलेलं लतादीदींचं एखादं खुणेचं युगुलगीत पुढच्या निदान दोन पिढ्यातील आजी-आजोबांना 'अजून यौवनांत मी' ची जाणीव देत त्यांच्या गालावर लाली चढवत राहणार.

 

म्हणून लतादीदींना 'अखेरचा हा तुला दंडवत' असं न म्हणता माझ्यासारखा सामान्य रसिक वारंवार 'खरोखरीचा तुला दंडवत' असं निदान अजून दोन पिढ्या तरी म्हणत राहणार हे जितकं खरं....तितकंच हे लिहिताना मी एक अनाहूत आवंढा गिळला हेही खरं...

 

राजेंद्र वैशंपायन

rajendra.vaishampayan@gmail.com



No comments:

Post a Comment