सध्या लॉकडाऊन मुळे घरासमोरच्या रस्त्यावर वाहनांची अजिबात वर्दळ नाही. आसपासच्या सोसायट्यांमधल्या मुलांनी या रस्त्याचे खेळण्याचे मैदान केलं आहे. गॅलरीत बसून त्यांचे खेळ बघणे हा माझा विरंगुळा!
आज अशीच संध्याकाळी गॅलरीत बसले होते. समोरच्या फूटपाथवर मुलींनी टिपऱ्यांचा डाव मांडला होता. फरशीचा छोटा तुकडा तळव्याच्या मागच्या बाजूवर ठेवून, तोल सांभाळत लंगडी घालत आठ घरं पार करायची हा खेळ चालू होता. तो बघत असताना नकळत मी माझ्या बालपणात पोहोचले. परकराचा ओचा बांधून खेळलेली फुगडी, बस फुगडी, कोंबडा, टिपऱ्या सगळे झर्रकन डोळ्यांसमोर आले.
सगळ्यांना आवडे फारच फार॥
झिम्म्याचं पण असंच की हो... झिम पोरी झिम ,कपाळाचं भिंग म्हणत म्हणत, एकमेकींना टाळया देत गोल फिरायचे. टाळी चुकू दयायची नाही. एकोपा, सांघिक भावना आणि आजचा परावलीचा शब्द 'mindfulness' याचे हळुवार संस्कार करणारा हा खेळ! पिंगा, बसफुगडी, कोंबडा यातून हसत खेळत सांध्यांना व्यायाम.
मला सागरगोटे खेळायला खूप आवडायचे. एक्की, दुखई करत नऊपर्यंत डाव जायचा. डोळे, हात याची अचूक सांगड घालायला शिकवणारा हा खेळ. या खेळामुळे या वयातही डोळे उत्तम तर आहेतच पण प्रत्येक कामात अचुकता हवी हे ही संस्कार झाले.
लंगडी, खो खो, शिवणापाणी
या सांघिक खेळांनी हार-जीत आनंदाने स्वीकारायला शिकवलं. जिंकण्यामधले यश सगळयांचे
असते. मैत्रिणींनो, संसाराचा डाव पण सांघिक खेळच नाही का?
यात सगळयांचे योगदान असते. आपण हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.
माझ्यासारख्या तुम्ही सुध्दा लहानपणी मोठ्ठा गोल करून कानगोष्टी खेळला असाल ना?
पहिल्या खेळाडूने सांगितलेले वाक्य जसेच्या तसे किती वेळा शेवटचा
खेळाडू सांगतो? क्वचितच... बरोबर? मग
यातून सांगोपांगी गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही हे तत्त्वज्ञान तर हा खेळ सांगत
नाही?
माझे बालपण खेडयात गेले. गावात दहा-बारा सोवळ्या आज्ज्या होत्या. त्या रोज
दुपारी एकीकडे पट खेळायला जमायच्या. हा खेळ तीन तीन तास चाले. हरणारीला चिडवणे मग
तिने ईर्षेने पुढचा डाव जिंकणे आणि सगळ्यांनी भरपूर हसून खेळून त्याचे कौतुक करणे
यात त्या सगळ्याजणी आपली दुःखे, एकटेपणा सगळं सगळं
विसरून जायच्या. हा खेळ जगण्याची उमेद हरायची नाही, आत्ताचा
डाव आपल्या बाजूने नाही पडला, पण पुढचा नक्कीच पडेल हे
शिकवायचा. नुसता पटच नाही तर झोका, पत्ते, सापशिडी सगळेच खेळ हसत खेळत जगायला शिकवतात.
दोन घडीचा डाव, याला जीवन ऐसे नाव
माळ यशाची हासत घालू, हासत हासत तसेच झेलू
पराजयाचे घाव…झेलुया पराजयाचे घाव
याला जीवन ऐसे नाव...........
अनुराधा कोठावळे
No comments:
Post a Comment