कीचकवध


 

गणपतीच्या सुट्यांनंतरचा आज ऑफिसचा पहिला दिवस. बाप्पाची आठवण काढकाढत सगळे आपल्या कामात पुन्हा लक्ष घालायचा प्रयत्न करत होते. साडे दहाच्या सुमारास चहासाठी भेटल्यावर सगळ्यांनी गणपतीतल्या गंमतीजमती सांगितल्या. काहींच्या घरच्या, तर काहींच्या सार्वजनिक बाप्पांच्या. आज टी टाईम जरा जास्तच लांबला. जागेवर परतताना शेखरने मला हळूच खुणावलं आणि सलील आरोसकरच्या दिशेने डोळे फिरवले. मला कळलं नाही. मी खांदे उडवले.

"अरे, तो आला नाही चहाला. सकाळपासून नजर चुकवून कामातच डोकं खुपसून बसलाय."

"बरं मग?"

"तुला पुढील गोष्ट लिहायची आहे ना? मग त्याला लंचटाईममधे गाठू."

आता मी काय लिहायचं ह्याची जबाबदारी सुद्धा आमच्या ह्या थोर मित्राने घेतली आहे. असो. ठरल्याप्रमाणे आम्ही त्याला लंचला कॅन्टीनला नेला.

"काय रे सलील? आज चहा पार्टीला आला नाहीस? ठीक आहे ना सगळं?", शेखरने एकदम मुद्द्याला हात घातला. ह्याला संसदेत पाठवला तर किती पटापट देशाचे प्रश्न सोडवेल (किंवा निदान विचारेल) असं वाटून गेलं.

सलीलचा चेहरा पडला होता. त्याने खालचा सूर पकडून बोलायला सुरुवात केली.

"अरे यार!!!! यंदा लग्नानंतरचा पहिला गणपती. गावी गेलेलो आम्ही दोघंही. आता परत आलोय तर शा रागवून बसलीये." सलीलची बायको शा तामिळ आहे. पण मुंबईत वाढल्यामुळे थोडं फार मराठी तिलाही कळतं. सलील तिला घेऊन कोकणात गणपतीला गेला होता.

"का रे? काय झालं मग?" शेखर.

"आता काय सांगू? अरे, गावात दर वर्षीसारखं नाटक बसवलं होतं. मी येणार म्हटल्यावर माझ्या चुलत भावाने, विनायक दादाने मेसेज पाठवला की आम्हाला दोघांनाही स्टेजवर यावं लागणार. तशी पद्धतच असते आणि तो मान असतो वगैरे सांगून मला तयार केलं. 'कीचक वध करूचा आसा आणि तुमका लास्ट मिनीट धुतराष्ट आणि गांधारीचो रोल दिलाहा.' असा दादाचा व्हाट्सअँप  आला. सोबत बी.आर.चोप्रांच्या महाभारताची 'कीचक वध' एपिसोडची युट्युब लिंक, ज्यात वास्तविक धृतराष्ट्र-गांधारी कुठेही दिसत नाहीत!

 

आता हे सगळं वाचल्यावर माझ्या पोटात गोळा आला. शा भरतनाट्यम् एक्स्पर्ट. तिचे व्यावसायिक दर्जाचे कार्यक्रम होतात यार. ते कुठे, आणि आमच्या गावचं नाटक कुठे. Anyways.... तिला हे सांगितल्यावर ती जाम excite झाली आणि पटकन 'हो' सुद्धा म्हणाली. माझ्या पोटातला गोळा अजून तिथेच होता. ठरलेल्या दिवशी, रात्री आरतीनंतर गणपतीच्या देवळासमोरच्या पटांगणात बांधलेल्या स्टेजवर नाटक सुरु झालं. आम्हाला दोघांनाही मुकुट घालण्यात आले. स्टेजवर मागे दोन खुर्च्या दिल्या होत्या आणि स्टेजवर काय करायचंय ह्याची थोडी फार कल्पना दिली होती.

 

'तुमचो गेश्ट अपिअरन्स आसालाश्टाक. वैनी, ही पट्टी बांधूक इसरू नाका...पुट धिस आय पट्टी ... आणि तू रे सायबा, बुबुळ वर करून दवर स्टेजचे रवतकच. कस्सा??? अस्सा.' असं म्हणून आमच्या डायरेक्टरने, म्हणजे गुरवाच्या बबनने Vampire सारखे डोळे वर करून दाखवले. शाच्या अपेक्षा खूपच उंचावलेल्या होत्या. ती डोळे बंद करून कॅरेक्टर पकडत होती. आणि माझ्या पोटातल्या गोळ्याचा कधीही फुटू शकणारा फुगा झाला होता. पडदा उघडला. समोर खचाखच पब्लिक. जोरदार शिट्या आणि टाळ्या झाल्या.

 

सिंहासनावर मत्स्यदेशाचा विराट राजा बसला होता आणि आजूबाजूला अज्ञातवासातले पांडव आपापली अज्ञात कामं करताना दिसत होते.... आणि.. आणि... पहिला शॉक लागला... सिंहासनामागे सुक्या बांगडयाचं (माश्याचं) तोरण लावलं होतं. पुढे बसलेल्या प्रेक्षकांच्या ते लक्षात आलं.

"बांगडो लायला मरे माथ्यार. कोणे रे तो? काड पैलो. देवळाच्या आवारान सुको बाजार? बबन, गुरवाचो पोर तू. बापाकडल्यान अक्कल घे."

एकच गोंधळ उडाला. पडदा पडला. बबनने शिवरामाला बोलावला. नेपथ्य अर्थात डेकोरेशन त्याच्याकडे होतं.

"भ%व्या, काय करतंस? ताडी मारून इलंयस?"

"दादा, तू माका बोललंस ह्यो शरद मत्स्य देशाचो राजा. म्हणून मुद्दाम फील पकडायला. श्रावन-भाद्रपदान सुकोच बाजार मेळता. ताजो माल म्हारग. परवडूक नाय." शिवरामने कारण सांगितले. बबन्याने त्याच्या सणकन कानाखाली दिली आणि सुक्या बांगड्याची माळ फुले खाली काढायला लावली. माझी बुबुळं आपोआप वर गेली आणि शाच्या डोळ्यांवर आत्ताच पट्टी बांधावी असं वाटून गेलं. पण ती फक्त "व्हॉट रबिश" इतकंच म्हणाली. पडदा पुन्हा उघडला. बबनने जनतेची जाहीर माफी मागितली आणि शो पुन्हा सुरु झाला.

कोकणातला प्रेक्षक अतिशय जागरूक असतो. तो दाद देतो, शिव्या देतो, झालंच तर उधारीची आठवण करून देतो. विराट राजाने बृहन्नडेला गळ्यातली माळ दिल्यावर प्रेक्षकांतून कोणीतरी "आयलो व्हडलो सावकार. तिका माळ देतंय. मजे अडीच हजार गिळून बसलंय सिंवासनार ह्यो बेवडो शरद." असं ओरडलं.

भीमाच्या एंट्रीला, "कर्मा, हो भीम? झुरळाक घाबरतंय मेलो. नुसतोच आंगान वाढलंय हा कोंबो खाऊन. हं." असं ऐकू आलं.

कीचक द्रौपदीला दरबारात अपमानित करतो तो सीन सुरु झाला. द्रौपदीने युधिष्ठिराकडे आशेने पाहताच, "तो मुको पंचायतीन पण घुम्या बाशेन बसता. तो काय करुचो नाय. तूच फायट मार गो मजे बाय." असा शेरा आला.

कीचकाच्या वधाला तर प्रेक्षकांतून प्रचंड शिट्या आल्या. "ठेच मेल्याक पायताणान. आमच्या पोरीक छेडतंय? त्या दाम्याच्या अनंताक आमी जसो ठेचलो तस्सो ठेच." एका दोघांनी स्टेजवर येण्याचा प्रयत्न सुद्धा केला. कीचक घाबरून भीमाने मारण्याआधीच मरून निपचीत पडला.

 

आता शेवटचा सीन आला. गांधारी, आय मीन शा आणि मी, अडखळू नये म्हणून साहजिकच एकमेकांचा हात धरून स्टेजवर आलो. पुन्हा जोरदार शिट्या. "बाळूचो सलील मरे हो? कसो बायलेचो हात धरुन चलता निर्लज्ज. बाळो, गेलो रे पोरगो तुज्या हातातून नवी नवकलेच्या हातान. मी बुबुळं खाली करुन बाबांकडे पाहिलं. ते मोठमोठ्याने हसत होते. सगळेच खो खो हसत होते. शाला पट्टीमुळे काही दिसेना आणि कळेना. थोडक्यात वाचलो. ती खूप नर्व्हस झाली होती पण. आम्ही पांडवांना आशिर्वाद देऊन बॅकस्टेज आलो. आणि फायनली काय तो पडदा पडला.

'why were they all laughing constantly? what was so funny? This is such a serious story. But no body in the audience was serious. And on the top, on our entry they whistled.....so cheap!!!!!!', शाने सगळं फस्ट्रेशन माझ्यावर ओतलं... असं हे सगळं महापुराण घडलं आणि आता घरात शांतता पसरलीये."

"अरे तिला 'जाने भी दो यारों' चा लास्ट पार्ट दाखव. ही तुझी केस थोडी फार तशीच झाली.", शेखर एकटाच हसला. पण आम्ही दोघंही सिरीयस असल्याने त्याने लगेच आवरतं घेतलं.

"मला सांग. ती भरतनाट्यम शो ला तुला नेते तेव्हा तू एन्जॉय करतोस का?" मी विचारलं.

"चल रे. झोप येते जाम. पकाऊ आहे सगळं ते. सगळे कसे परीक्षेला बसल्यासारखे शांत बसलेले असतात."

"हे तू तिला सांगितलंयस?"

"नाही. पण तिने जास्त डोकं खाल्लं ना तर नक्कीच सांगणार. ते ही कोकणी स्टाईलमधे. मी पण कोकणी माणूस आहे. ऐकूचो नाय."

"शाबाश मेरे शेर. दिखा दे अपनी औकात... आय मीन दहाड." शेखरने तेल शिंपडलं.

"सलील, ऐक. आता हे प्रकरण गरम आहे. त्यात अजून तेल ओतू नको. जरा वातावरण शांत झालं की एखाद्या वेळी हसत हसत तिला हे सांग. तुमच्या आवडी निवडी, तुमच्या संस्कृतीचे बारकावे, तुमच्या जोडीदाराला कळणं गरजेचं आहे. आता शेखरने नाही का, अशीच वेळ बघून आपल्या गांजाच्या सवयीबद्दल अश्विनीला सांगितलं होतं."

"काय???" शेखर उडाला.

आता आम्ही दोघे  हसत होतो आणि शेखर सिरीयस झाला होता. "सॉरी यार, गंमत केली". लंच टाईमही संपत आला होता. सलील सकाळपेक्षा बराच मोकळा दिसत होता. लंचनंतर त्याने गावाहून आणलेले मोदकही वाटले. बाप्पाच्या राज्यात उगाच टेन्शन घेऊन फिरणं बरोबर नाही. हो ना?

 

म्हणा तर मग... गणपती बाप्पा... मोरया!

 

मानस

No comments:

Post a Comment