किनाऱ्यावर

 


तसा तो ही आता

सरावला होता किनाऱ्याला

अथांग सागरात न्हाऊन

वेदनेच्या निर्मनुष्य तळावर

निर्लेप अंगानं परतण्या एवढा.

 

सागराच्या अभिसारी लाटांचं

चंद्रगामी नर्तन

साक्षित्वानं पाहताना

पौर्णिमेचा चंद्र कधी

तोच होऊन गेला होता.

 

आकाशाला भिडणाऱ्या

पाण्यातल्या चंद्रवाटेवरचे

काही उबदार किरण

पांघरले होते त्याने

कधी उत्तररात्री किनाऱ्यावर

 

काही योग तुफानाशी

भोग असे किनाऱ्याचे!

मन घुमटातुनि स्वर बैरागी

मधेच घेई नि:शब्दांच्या --

दु:खवैभवी अनवट ताना!

 

हळहळले जरासे तेही --

वाळूत घर बांधताना

त्याच्या प्राक्तनासाठी!

भरतीची लाट त्यांच्यापर्यंत

कधी पोचलीच नाही किनाऱ्यावर!!

 

मधुस्मिता अभ्यंकर




No comments:

Post a Comment