किस्से दुसऱ्या महायुद्धातील - २


एक गाँव की कहानी

ते निसर्गाच्या कुशीत लपलेले चिमुकले गांव होते. जनसंख्या फक्त ६४८. एका शांत दुपारी गावच्या वेशीवर काही सैनिक आले. त्यांनी सगळ्या नागरिकांना गावांतल्या चौकात गोळा व्हायला सांगितले. कारण विचारतां ओळखपत्रांची तपासणी करावयाची आहे असे उत्तर मिळाले. सगळे जण गोळा झाल्यावर पुरुषांना आणि बायकामुलांना वेगळे केले गेले. पुरुषांना गवताच्या कोठारात आणि बायकामुलांना एका चर्च मध्ये नेण्यात आले.
काही कळण्याच्या आंत गवताच्या कोठारात गोळीबार सुरु झाला. पायांवर गोळ्या झाडून सगळ्यांना जायबंदी केल्यानंतर त्या गवताच्या कोठाराला पेटवून देण्यात आले. फक्त माणसे पळून जाऊ लागली त्यातील जणांना गोळ्या घालून ठार केले. अशा प्रकारे एकूण १९० पुरुष मृत्यू पावले.
ते सैनिक नंतर ज्या चर्चमध्ये बायकामुलांना नेले होते तेथे गेले. चर्चच्या अवतीभोवती ज्वालाग्राही स्फोटके पेरली गेली चर्चला आग लावली. अग्निकांडातून वाचण्यासाठी खिडक्यांमधून बाहेर पडणाऱ्यांवर मशिनगन द्वारे बेछूट गोळीबार केला गेला. ह्या हत्याकांडातून फक्त एक ४७ वर्षीय महिला, Marguerite Rouffanche वाचली. एकूण २४७ महिला २०५ मुले ह्या नरसंहारात बळी पडले. ह्या दुर्दैवी गावाचे नाव Oradour-sur-Glane होते .
हे सगळे कां कसे घडले?
फेब्रुवारी १९४४ मध्ये  2nd SS Panzer Division "Das Reich" दक्षिण फ्रान्सच्या Valence-d'Agen, गावी तळ ठोकून होती. दोस्त राष्ट्रांनी नॉर्मंडीच्या किनाऱ्यावर सैन्य उतरवल्यानंतर ह्या डिव्हिजनला तेथे जाण्याचा हुकूम मिळाला. ह्या डिव्हिजन मध्ये एक तुकडी 4th SS Panzer Grenadier Regiment होती, ज्याच्या पहिल्या बटालियन चे नेतृत्व Adolf Diekmann करीत होता. १० जून १९४४ला सकाळी Diekmann ला बातमी मिळाली की भूमिगत स्वयंसेवकांनी SS-Sturmbannführer Helmut Kämpfe चे अपहरण केले आहे. त्याचा बदला म्हणून आणि परिसरात दहशत बसविण्यासाठीAdolf Diekmann ने हे हत्याकांड घडवून आणले. 
Diekmannच्या ह्या पाशवी कृत्याचा जर्मन सेनापतींकडून मोठ्या प्रमाणात निषेध झाला आणि त्याच्या विरुद्ध चौकशी बसविण्यात आली. पण पुढे काही दिवसातच Diekmann एका चकमकीत ठार झाला; तसेच हा अत्याचार करणाऱ्या तिसऱ्या कंपनीचे बहुतेक सैनिक लढाईत कामी आले आणि ती चौकशी थांबवण्यात आली.
युद्धोत्तर खटले :
१२ जानेवारी १९५३ ला फ्रान्सच्या सैनिक न्यायालयापुढे Bordeaux येथे ह्या हत्याकांडात भाग घेतलेल्या २०० सैनिकांपैकी जिवंत असलेल्या ६५ सैनिकांवर खटला भरण्यात आला. दोषीं पैकी फक्त २१ जण उपस्थित होते कारण उरलेल्यांना पूर्व जर्मनीने ताब्यात देण्यास नकार दिला. ११ फेब्रुवारी १९५३ ला २० जणांना दोषी मानून शिक्षा ठोठावण्यात आल्या. ह्या हत्याकांडाशी संबंधित असलेला शेवटचा खटला जानेवारी २०१४ रोजी Werner Christukat, ह्या ८८ वर्षीय सैनिकावर जर्मनीत Cologne येथे दाखल करण्यात आला; पण पुराव्याअभावी डिसेम्बर २०१४ ला तो मागे घेण्यात आला.
उपसंहार:
द्वितीय महायुद्धाच्या पश्चात राष्ट्रपती General Charles de Gaulle यांनी बेचिराख झालेल्या Oradour-sur-Glane ला आहे त्याच स्थितीत मानवी क्रौर्याचे प्रतीक म्हणून जतन करण्याचे ठरविले नवे गाव शेजारील जमिनीवर वसविले. २०१२त ह्या गावांची लोकसंख्या २३७५ होती. १९९९मध्ये राष्ट्रपती Jacques Chirac यांनी गावांत एका संग्रहालयाचे उदघाटन केले, ज्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांच्या वैयक्तिक वस्तू, उदाहरणार्थ बंद पडलेली हाताची घड्याळे ठेवलेली आहेत. सप्टेम्बर २०१३ रोजी फ्रान्सचे राष्ट्रपती François Hollande आणि जर्मन राष्ट्रपती Joachim Gauck यांनी ह्या दुर्दैवी गावाला एकत्रित भेट दिली. जर्मनीच्या राष्ट्रपतींनी फ्रान्सच्या भूमीवर झालेल्या सगळ्यात मोठ्या नरसंहारा पैकी एका स्थानास भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती.
२८ एप्रिल २०१७ ला फ्रान्सचे आताचे राष्ट्रपती Emmanuel Macron,Oradour-sur-Glane येथे अध्यक्षपदाचे उमेदवार असताना म्हणून आले त्यांनी ह्या हत्याकांडातील एकमेव जिवंत व्यक्ती, Robert Hébras ची भेट घेतली.
डॉ.दिलीप कानडे



No comments:

Post a Comment