एक्सरसाईज टायगर: एक शोकांतिका

प्रत्यक्ष युद्धामधे मनुष्यहानी अपरिहार्य असल्यामुळे स्वीकार्य असू शकते, पण युद्धाभ्यासात ६३९ सैनिकांचा बळी जाण्याची घटना, द्वितीय महायुद्धात एकदाच घडली. त्याचीच ही कहाणी.
LST 289 before the attack

पार्श्वभूमी : १९४२ च्या अंतिम महिन्यापासून, उत्तर फ्रांसमधील नॉर्मंडीच्या तटावर आक्रमण करून जर्मनी विरूद्ध दुसरी आघाडी उघडण्याच्या ऑपरेशन 'ओवलोड'ची तयारी जोरात सुरू होती. त्यामधील सर्वांत पश्चिमेला असलेल्या उटाहा बीचवर आक्रमण करण्याच्या सरावासाठी दक्षिण इंग्लंडमधील डेवॉन काउंटी कौन्सीलला, स्लेप्टन सैन्ड चा परिसर, तेथील जनावरांसकट पूर्णपणे रिकामा करण्यास सांगण्यात आला, कारण ह्या सरावात जिवंत दारूगोळा वापरण्यात येणार होता. प्रत्यक्ष युद्धात भाग घेणारे अमेरिकन सैनिक अननुभवी असल्यामुळे असे करणे आवश्यक झाले होते व म्हणूनच ह्या सरावात भाग घेणा-या सैनिकांची संख्या पण हजारोंमध्ये  होती.

२७ एप्रिल १९४४ च्या दुपारी हे सैनिक प्लिमथच्या किना-यावर L.S.T (Landing Ship Tanks) प्रकारच्या ८ युद्धनौकांवर चढू लागले. त्यांच्या बरोबरच पाण्यात तरंगू शकणारे रणगाडे, हलकी मोटर वाहने, मशीनगन, दारूगोळा व इतर युद्ध सामुग्री पण लादण्यात आली. L.S.T प्रकारच्या युद्धनौकांची प्रतिकारशक्ति फारच तोकडी होती व म्हणून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी एच.एम.एस. स्किमिटरह्या युद्धपोताला दिली होती. प्रत्यक्षात, ह्या युद्धपोताची काही किरकोळ दुरूस्ती होत असल्यामुळे, ते बरोबर नव्हतेच; पण हा फक्त सरावच असल्यामुळे कोणी त्या गोष्टीची फिकीर केली नाही.

ह्या सगळ्या जथ्याला 'लेम बे'च्या खाडीत एकत्र होउन तेथून स्लेप्टन सैन्डच्या किनाऱ्यापर्यंत जाऊन तेथे गोळाबारी करत समुद्रकिनाऱ्यावर उतरून त्याला काबीज करावयाचे होते.

ठरल्याप्रमाणे सगळ्या L.S.T, २८ एप्रिल १९४४ ला पहाटे  २ वाजता 'लेम बे' ला पोहचल्या. तेथून, एक रांग करून, स्लेप्टन सैन्डकडे निघाल्या. अचानकपणे ४ जर्मन ई-बोटींनी त्यांच्यावर आक्रमण केले. त्यांनी डागलेल्या पाणसुरंगांमुळे (torpedoes) L.S.T बुडाल्या व तिसरी जायबंदी झाली. ह्या नौकांवरील सैनिक अननुभवी असल्यामुळे त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी दिलेली लाईफ जैकेट कंबरेला गुंडाळली होती. त्यामुळे आणि पाठीवरील वजनामुळे असे सैनिक पाण्यांत उतरल्यावर तोंडघशी पडले व बुडाले. पोहू शकणारे सुद्धा बर्फाळ पाण्यात जास्त वेळ तग धरू शकले नाही व एकूण ६३९ सैनिकांना वीरमरण आले.

LST 289 after the attack

उरलेल्या L.S.T नां ताबडतोब पळ काढण्याचा आदेश देण्यात आला, पण L.S.T ५१५ च्या कॅप्टन जॉन डायलने तो धुडकावून तेथेच थांबून १३४ सैनिकांना बुडण्यापासून वाचविले. दिलेल्या आदेशाचे पालन न करण्यासाठी व त्यांच्या युद्धनौकेवरील व्यक्तिंचे जीव धोक्यात घालण्यासाठी, त्यांना कोर्ट मार्शलपण केले गेले.

ऑपरेशन ओवरलोडचे बिंग फुटू नये म्हणून जिवंत वाचलेल्या सैनिकांना, ह्या दुर्घटनेची कोठेही वाच्यता न करण्याची तंबी देण्यात आली व तसे न केल्यास कोर्ट मार्शलला सामोरे जावे लागेल, ही धमकी पण दिली गेली. मृत्यु पावलेल्या सैनिकांच्या घरच्यांनासुद्धा काहीही सांगितले गेले नाही.

BUT THOSE BRAVE MEN DID NOT DIE UNHONOURED OR UNSUNG.

त्याचे श्रेय केन स्मॉल ह्या व्यक्तिकडे जाते व म्हणून पुढील हकीकत त्यांच्या मुलाच्या शब्दात :
माझे वडील बाहेरून येउन डेव्हन शहरांत स्थाईक झाले होते. तेथे त्यांनी एक हॉटेल सुरू केले. पुढे काही दिवसांनी त्यांना काही कारणांनी प्रचंड डिप्रेशन आले. त्यांतुन बाहेर पडण्यासाठी त्यांनी रोज समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारावा, असे त्यांच्या एका मित्राने सुचविले. तसें करतांना एकदा त्यांना काडतूसांच्या रिकाम्या पुंगळ्या मिळाल्या. अधिक चौकशीकरता ह्या किनाऱ्यावर युद्धसराव केला गेला होता, असे त्यांना समजले. कुतूहलापोटी, आपण खोल समुद्रात जावून बघावे असे त्यांनी ठरविले व आपल्या एका डायव्ह मित्राला नौकेत बरोबर घेतले. त्याने जेव्हां खोल समुद्रात बुडी मारली तेव्हां तेथे एक बुडालेला रणगाडा आहे असे त्याला समजले.
Sherman tank memorial Slapton sands Devon U.K

आणी माझ्या वडिलांचे डिप्रेशन जावून त्यांना तो रणगाडा बाहेर आणण्याचे ध्येय सापडले. त्यांनी त्या रणगाड्याची मालकी असलेल्या United States Armed Forces (U.S.A.F) शी पत्रव्यवहार करून तो १ डॉलर किमतीत विकत मागितला. पुढे अमेरिकन लोकप्रतिनिधींच्या मदतीने तो ५० डॉलरला त्याचे युद्ध स्मारक करण्यासाठी मिळविला.

आता प्रश्न रणगाडा पाण्याबाहेर काढण्याचा होता. त्यासाठी रणगाड्याखाली एअर बैग्ज फुलवून त्याला गाळातून काढले, पाण्यातून ओढत काठांवर आणले व बुल्डोरच्या मदतीने पाण्याबाहेर आणले. हे सगळे करण्यांत माझे वडील जवळ जवळ दिवाळखोरीला आले होते, पण माझ्या आईने त्यांना पूर्ण साथ दिली.

रणगाडा पाण्या बाहेर येण्याच्या घटनेला जन माध्यमांनी खूप प्रसिद्धि दिली व अमेरिकन व ब्रिटीश सैन्यांनी ह्या रणगाड्याच्या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा दिला. दर वर्षी २८ एप्रिलला दिवंगत सैनिकांचे नातेवाईक येतात व त्यांना श्रद्धांजली देतात. त्यांच्यापैकी लॉरी बोल्टन ह्या विशेषकरून उल्लेखनीय आहेत. त्यांचे काका ह्या दुर्घटनेत निवर्तले व काही वर्षांनी त्यांच्या काकांच्या वाढदिवशी त्यांचा जन्म झाला. आता त्या दरवर्षी येथे येतात.

मित्रांनो! ह्यालाच खरी देशभक्ती आणी संरक्षण दलातील व्यक्तीबद्दल आदर म्हणतात.

दिलीप कानडे

संदर्भ:
1. World War Two Podcast no. 79:"The forgotten Dead."
2. www.exercisetiger.com
3. Google Search.

No comments:

Post a Comment