कोपनहेगन डायरी- ६

 

प्रेक्षणीय स्थळे 


कोपनहेगन शहराची ओळख करून देताना तिथल्या महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळांबद्दल सांगणं तर जरुरीचंच आहे.

 जगातल्या अनेक प्रसिद्ध शहरांप्रमाणेच इथेही राजवाडे, संग्रहालय, बागा, चौक तर आहेतच. पण कोपनहेगनचे प्रतिष्ठित, प्रतीकात्मक स्मारक म्हणून जे प्रेक्षणीय स्थळ आहे ते म्हणजे, "द लिटिल मरमेड". समुद्राच्या किनार्‍याजवळ एका मोठ्या खडकावर बसलेल्या छोट्याश्या मरमेडचे ते हे कांस्य (bronze) शिल्प. प्रसिद्ध डॅनिश लेखक हैन्स क्रिस्टिन एंडरसन याच्या सुप्रसिद्ध परीकथेवरून हे शिल्प बनवण्यात आलेलं आहे.

लिटिल मरमेड

'लिटिल मरमेड' या नावाप्रमाणेच छोटंसं म्हणजे फक्त चार फूट उंचीचं हे शिल्प आहे. डॅनिश इतिहासामध्ये अनेक वेळा या शिल्पाचे नुकसान करण्याचा प्रयत्न झाला. परंतु १९१३ पासून ते आज पर्यंत हे शिल्प कोपनहेगनचं प्रथम क्रमांकाचं प्रेक्षणीय स्थळ राहिलं आहे.   

हैन्स क्रिस्टिन एंडरसन याच्या द लिटिल मरमेड खेरीज इतरही अनेक परीकथा प्रसिद्ध आहेत. त्यापैकी द अगली डकलिंग, द एम्पायर्स न्यू क्लोथ्स, द प्रिंसेस एंड द पी, द स्नो क्वीन इत्यादी परीकथा तुमच्याही परिचयाच्या असतीलच.

शहराच्या टाऊन हॉल जवळच एंडरसनचा स्मारक पुतळा आहे. तसेच त्याचे जन्मगाव असलेल्या ओडेन्स या शहरात त्याचे घर व म्युझियम देखील जतन करून ठेवले आहे.

हैन्स क्रिस्टिन एंडरसन
कोपनहेगन हे अनेक कालव्यांसाठी आणि त्या कालव्यांमधून जाणाऱ्या बोटींच्या सफरी साठी प्रसिद्ध आहे. लहान, मोठ्या अनेक कालव्यांमधून तासभर फिरणारी ही बोट इथल्या अनेक महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळांची सफर घडवते. इथल्या सर्व कालव्यांना जोडणारे जे अनेक जुने व नवे पूल आहेत ते पाण्याच्या पातळीपासून फार उंचावर बांधलेले नाहीत. त्यामुळे या बोटी पुलांखालून जाताना इतक्या छोट्या जागेतून जातात की त्या पुलांच्या भिंतींना  आपण सहजच हात लावू शकतो. पूल जवळ आला की उभे राहणं तर दूरच राहिलं, पण शरीराचा कुठलाही भाग बोटी बाहेर काढायला प्रतिबंध आहे. नाही तर डोकं, अंग आपटून जखमी व्हायचं.

निहाव हे एक दुसरे प्रेक्षणीय स्थळ, जे पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. मुख्य बंदराला लागून काठावरती १७ व्या आणि १८ व्या शतकातल्या इमारती इथे अजूनही आहेत.

निहाव

कालव्याच्या काठाशी रंगीबेरंगी इमारतींची असलेली रांग, त्यांच्या समोर उभ्या असलेल्या अनेक शिडाच्या बोटी, जाझ आणि इतर संगीताची रेंगाळणारी धून, रंगीबेरंगी दिव्यांनी सजलेले कॅफे, रेस्टॉरंट, खाण्याच्या विविध पदार्थांचे वास, निरनिराळ्या पेयांनी भरलेले ग्लास, या सर्वांनी तयार झालेल्या जादूमयी, मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणात, बेधुंद व्हायला सर्वच पर्यटकांची गर्दी येथे उसळलेली दिसते. 

कोपनहेगन मधल्या प्रेक्षणीय वास्तूंमध्ये दोन राजवाडे आणि एक किल्ला प्रसिद्ध आहे. 

त्यातला अमलिंबर्ग हा राणी आणि राजघराण्यातील इतर व्यक्तींचे वास्तव्य असलेला राजवाडा.

हा राजवाडा म्हणजे एकच मोठी इमारत नाही तर एकसारख्या दिसणाऱ्या चार मोठ्या इमारती आहेत. या इमारतींच्या मध्ये खूप मोठा अष्टकोनी चौक आहे. 

प्रथमदर्शनी या सर्व इमारती इतक्या साध्या दिसतात की ते राजवाडे आहेत यावर विश्वासच बसणार नाही. अर्थात हीच डेनिश आर्किटेक्चर डिजाइन ची खासियत आहे. कुठेही फार कमानी, सजावट, नक्षीकाम, कोरीव खांब इ. बाह्य दर्शनी दिसत नाही. 

राजवाड्यांचे अंतर्गत भाग कदाचित खुप सुशोभित असतीलही. पण राजपरिवाराच्या वास्तव्यामुळे हे सर्व भाग पर्यटकांसाठी बघायला उपलब्ध नाहीत. आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना राणीने इथेच शाही भोजनाचे आमंत्रण दिले होते.

त्यातल्या एका इमारतीमध्ये छोटसं संग्रहालय आहे जिथे काही राजेशाही कपडे, दागिने, वस्तू, भांडी इ. इ‌. गोष्टींचं प्रदर्शन आहे. ते पर्यटकांसाठी बघायला खुलं असतं. 

कोपनहेगन मधला एक छोटासा किल्ला म्हणजे रोजेनबर्ग कैसल. यात प्रवेश करायला परवानगी आहे. लाकडी जमीन असलेला हा किल्ला बराच जुना आहे. बाहेरून साध्याच दिसणार्‍या या किल्ल्याचा आतील भाग मात्र सुशोभित आहे. अनेक मूर्ती, निसर्ग चित्र, राजघराण्यातील लोकांची चित्रे तसेच राजा, राणीच्या खोल्यांमधून त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर, वस्तू येथे बघायला मिळतात. अनेक जुन्या, सुंदर टॅपेस्ट्री इथे जतन करून ठेवल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे सर्व डेनिश क्राउन ज्वेलरी इथे बघायला मिळते. त्याचप्रमाणे कोरोनेशन कारपेट आणि थ्रोन चेयर ऑफ डेन्मार्क इथे जतन करून ठेवलेले आहे.

किल्ल्याच्या भोवती पाण्याची मोट आहे आणि त्या पलीकडे अतिशय सुंदर शाही बाग आहे.

पर्यटकांबरोबरच स्थानिक रहिवाशांमध्ये देखील ही बाग फिरायला येण्यासाठी खूप लोकप्रिय आहे.









तिसरी महत्त्वाची वास्तू म्हणजे
क्रिस्तेंबर्ग पैलेस.

इथल्या मोठ्या भागात डैनिश पार्लमेंट, प्रधानमंत्र्यांचे कार्यालय आणि डेन्मार्कचे सुप्रीम कोर्ट आहे. इथे आत जाण्यासाठी परवानगी नाही.

उरलेल्या भागामध्ये रॉयल रिसेप्शन आणि डायनिंग रूम, थ्रोन रूम, ग्रेट हॉल आहेत. इथे मात्र पर्यटक आत जाऊ शकतात. हा सर्वच भाग अत्यंत देखणा आणि शाही थाटाचा आहे. सुंदर गुळगुळीत पॉलिश केलेली लाकडी फरशी, त्यावर सुरेख गालिचे, सजलेले छत, त्यावर मोठी झुंबरे, सुरेख डिझाईन व रंगाचे शाही फर्निचर, पडदे, वेगवेगळी चित्रे आणि पुतळे यांनी सजलेल्या सर्व खोल्या राजेशाही आणि खूपच सुरेख आहेत.

अर्थात अनेक महालांमधून आपण हे बघितलेलं असतं. त्यात विशेष ते काय? हो ना? 

पण इथल्या ग्रेट हॉलमधल्या भिंतीवर लावलेली अप्रतिम, सुरेख, रंगीत अशी १७ टॅपेस्ट्रीज मात्र अगदी निराळी, वेगळीच !! त्या ग्रेट हॉलचं सौंदर्य या टॅपेस्ट्रीज मुळे अगदी खुलून दिसतं. 



वाइकिंग एज पासून ११०० वर्षांचा डॅनिश इतिहास अनेक रंगीत धाग्यांनी मिळून, गुंफून इतका सुंदररीत्या आपल्यासमोर ठेवला आहे की नजर हलत नाही त्यांच्यावरून.

डेन्मार्क मधल्या अनेक महत्त्वाच्या चांगल्या-वाईट घटना, लढाया, वास्तू, शिल्प, निसर्ग, तसेच राजे, राण्या, विविध क्षेत्रातले अनेक महत्त्वाचे लोक यांमध्ये गुंफून आपल्यासमोर प्रस्तुत केले आहेत. तसेच काही टॅपेस्ट्रीज मध्ये जागतिक युद्ध, जगातल्या काही महत्त्वाच्या घटना, व्यक्ती दाखवल्या आहेत.

अभिमानाची गोष्ट म्हणजे त्यातल्या एका टॅपेस्ट्रीमध्ये जगातल्या अनेक महत्त्वांच्या व्यक्तींमध्ये महात्मा गांधींचा चेहरा ही समाविष्ट आहे.



या सर्व टॅपेस्ट्रीज विणायला एकंदर १० वर्षे लागली. त्यांच्यावरुन नजर ढळत नाही आणि हॉलमधून पाय बाहेर निघत नाही.

इथली ही सर्व प्रेक्षणीय स्थळ पाहताना जाणवते की यांच्या देशातला सांस्कृतिक, राष्ट्रीय व नैसर्गिक ठेवा किती सुंदर रीतीने जतन करून ठेवला आहे.

आपल्या भारतामध्ये अशा कितीतरी वास्तु, निसर्गरम्य स्थळ आहेत. पण आपण मात्र त्यांना चांगल्या प्रकारे जतन केलेले नाही याची टोचणी मनाला लागून राहिली. 

आणखीनही काही स्थळांची माहिती सांगायची आहे. पण ती आता पुढच्या भागात ......


नीना वैशंपायन



No comments:

Post a Comment