कृतज्ञता


त्या सर्व जणींच्या आठवणींनी मन भरून येते.. कृतज्ञता दाटून येते..
आई बाबांना फोन केला की ते न चुकता एक प्रश्न विचारतात, बायका येतात ना? त्यांना माझी काळजी..आपल्या लेकीला कामं पडू नये म्हणून ते खात्री करायला विचारतात, कामवाल्या बाया येतात ना
बायकाकामवाली बाई किंवा मोलकरीण, नव्हे माझ्या लेखी माझ्या सहकर्मचारिणी. त्यांच्या  विषयीच्या कृतज्ञतेने माझं मन भरून येत. गेल्या तेवीस वर्षात या सगळ्यांनी, मला काय हवं ते करायला, नव्हे, माझं  जीवन घडवायला मदत केली. माझ्या घरची भांडी घासून, केरवारा करुन, स्वयंपाक करुन..
आठ महिन्यांची झेलम घेऊन आम्ही इंग्लंडला गेलो. आम्ही international house मध्ये राहायचो. तिथे सफाईसाठी लिंडा, मेरी, ख्रिस्ती आणि एप्रिल या चौघी यायच्या. दिवसभर लहान बाळाला घेऊन मी एकटी असायचे. या बायका झेलमला खेळवायच्या, माझ्याशी गप्पा मारायच्या. मला त्यांचा फार आधार वाटायचा. 
२००० साली आम्ही इंग्लंडवरून भारतात मुंबईला राहायला आलो आणि नंदा घर कामाला आली. नंदा म्हणजे "कमी तिथे आम्ही" अशी होती. ती तिच्या कामाशिवाय मला खूप काही मदत करायची. नेहमी हसतमुख, माझं घर साफ स्वच्छ करणारी नंदा माझ्या मनात कायमच घर करून राहिली. बंगलोरला आलो, विंड टनेल रोड वर राहत होतो. आता माझ्या पदरी दोन लेकरं होती. लक्ष्मीने मला जगायला मदत केली म्हटलं, तरी वावगं ठरणार नाही. 
आम्ही फक्त खाणाखुणांनी बोलायचो. पण आमच्यात एक chemistry होती. तिने कधी सुट्ट्या घेतल्या नाहीत, out of the way जाऊन मला फार मदत केली. तिची मी देवासारखी वाट बघायचे. या नवीन शहरात मला तिचा फार आधार वाटायचा. तीस्ताला सांभाळायला तुलसी यायची. ती माझे दीदी, दीदी करून फार लाड करायची. फार लळा लावला होता तिने मला. ती सोडून गेल्यावर मी तिला फार miss केलं .. कामासाठी नाही, पण माणूस म्हणून, मैत्रीण म्हणून.

आम्ही मार्थाल्लीला राहायला आलो. गेली अकरा वर्ष राजेश्वरी माझी सहकर्मचारिणी आहे. घड्याळ लावावं, इतक्या अचूक वेळेला येते. अकरा वर्षात अपवादाला सुद्धा न सांगता खाडा केलेला नाही तिने. For me she is the example of professionalism. तिच्यामुळे मी ऑफिसला वेळेवर जाऊ शकते, rather नोकरी करू शकते. एकदातर घरात कॅश नव्हती, तर राजेश्वरीने मला उधार पैसे दिले होते.
यांची आठवण एवढ्याचसाठी, की या कष्ट करून मानाने जगणाऱ्या, आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी धडपणाऱ्या तुमच्या-आमच्या सारख्याच सदहृदयी बायका आहेत. मला त्यांचा अभिमान वाटतो आणि त्यांनी माझ्यासाठी जे केलं त्या विषयी अपार कृतज्ञता वाटते. मी त्यांना जे काही पैसे दिले, पण त्यांनी मला जी मदत केली ती अनमोल होती.


अलका देशपांडे 

No comments:

Post a Comment