'कु'आजी

 

आजही ती दिसते मला....अचानक!  ध्यानी मनी नसताना. आणि एकदम नाहीशी होते पाठमोरी....मी खूप धडपडते.....तिचा चेहरा पाहण्यासाठी.....पण गर्दीत अदृश्य होते ती!

क्षणभर जीव कासावीस होतो....डोळयांत  गोळा होतो....एकदा तरी ती दिसावी....एकदा तरी भेटावी....आणि एकदा मी शेवटचं तिला विचारावं, ......कोण लागतेस ग माझी?....ये ना एकदा तरी....तुझ्याशी खूप गोष्टी बोलायच्या राहून गेल्यात....तू कशी आहेस हे विचारायचं राहून गेलं....... तुझी सेवा करण्याची एक तरी संधी मला दे...... हे म्हणायचं राहून गेलं...... मी काहीच केलं नाही गं तुझ्यासाठी..... आणि तू मात्र सगळे ममत्व माझ्यावर उधळून मोकळी झालीस..... परतफेडीची एकही संधी न देता.... निघून गेलीस..... गुपचूप!  काही पत्ता लागू न देता!

 

मला कळायला लागल्यापासून मी तिचा हात धरून चालले. उन्हात तिच्या पदराखाली चालले. तिच्या एका खोलीच्या घरात ती एका लाकडी खुर्चीवर मला बसवायची. मला टोचू नये म्हणून मऊ सुती साडीची घडी खुर्चीवर ठेवायची. छोट्या पिशवीतून माझ्यासाठी आणलेला छोटासा खाऊ एका छोट्या वाटीत द्यायची. स्वतःसाठी भर्र स्टोव्हवर छोट्याशा कपात चहा करून फुर्र करून प्यायची. तिच्या बशीतल्या चहाचा शेवटचा घोट माझ्यासाठी ठेवलेला असायचा. त्या एका घोटात माझी सगळी तृष्णा तृप्त व्हायची. तिच्या घरात एक फळ्या-फळ्यांचा छोटा पलंग होता .त्यावर गादीची वळकटी ठेवलेली असायची. एक स्टोव्ह, एक पाण्याची कळशी, दोन पातेली, दोन कप बशा, चहा, साखर.... संपला तिचा संसार! एका ट्रंकेत दोन साड्या, दोन पांघरूणं!  बस हीच तिची संपत्ती. हातात नेहमी साधी शिवलेली खाकी कापडाची पिशवी. त्यात दोन रुमाल आणि घराच्या किल्ल्या!

 

ती उंची पुरी होती. शरीराने धिप्पाड वाटावी अशी होती .नीट्नेटकं नेसलेल्या काठ पदराच्या नववार साडीत ताठ चालायची. पांढर्‍या चिटाचं ब्लाउज आणि दोन खांद्यावर पदर असायचा. गळ्यात एक पातळशी सोन्याची चेन. मला तिचा चेहरा देवबाप्पाचा वाटायचा. तिच्या डोळ्यांमध्ये मी माझ्यासाठी अपार मायाच कायम बघितली. तिचा गव्हाळ वर्ण उन्हाने रापला होता. चेहर्‍यावर सूक्ष्म सुरकुत्यांचं जाळं होतं. कपाळावर हिरवा ठिपका गोंदवलेला होता. कानात मोत्याच्या कुड्या तिला छान दिसायच्या. तिच्या हातावर गोंदलेलं होतं.... रुक्मिणी.... हो!  तिचं नाव रुक्मिणी होतं. रुक्मिणी कुलकर्णी!  माझ्या आईची काकू. आईला लहान असताना अजून नीट बोलता यायचं नाही तेव्हा तिला ती 'कु' म्हणायची. माझी 'कु' आजी!

 

ती पुण्यात रहायची, तिच्या घरी. रोज आजोबांकडे यायची. सकाळचा नाश्ता, चहापाणी, नंतर स्वयंपाक, मागचं आवरणं, सगळं सगळं करायची. मला गरम गरम भात भरवायची. दुधावरची साय हळूच माझ्या भातात वाढायची. तिच्या पिशवीतून रोज माझ्यासाठी काहीतरी खाऊ आणायची. कधी गोळी, कधी चॉकलेट, कधी बोरं, तर कधी राय आवळे!  स्वयंपाक करता करता माझ्याशी गप्पा मारायची. तिच्या आणि माझ्या खास गप्पा असायच्या. फक्त दोघींच्या. सीक्रेट!  मग मी तिला आईच्या,भावांच्या तक्रारी सांगायची. ती पण मग म्हणायची.... जाऊ दे गं .... वेडे आहेत ते.... म्हणून तर मी त्यांना खाऊ आणत नाही..... फक्त तुझ्यासाठीच आणते.... माझ्यासमोर पटकन खाऊन टाकायचा.... त्यांना दाखवायचा नाही बरं...... आणि अगं!  आई अशीच असते. तू पण काहीतरी खोड्या करत असशील, म्हणून रागवत असेल. पण मी तिला आता रागवणार आहे..... किती ग त्रास देतेस त्या एवढ्याशा पोरीला! आणि मग मला जवळ घ्यायची..... तिच्या सुती साडीचा मऊ मुलायम स्पर्श मला तिच्यापासून दूर जाऊच नये असं वाटणारा असायचा. आणि त्याहीपेक्षा तिचा माझ्या केसांवरून, डोक्यावरून, मायेनं फिरणारा हात!  विलक्षण जादू होती त्या हातात!  सतत ते हात आपल्या डोक्यावर असावेत असंच वाटायचं मला!

 

तिची आणि माझी जोडी अख्ख्या वाड्यात प्रसिद्ध होती. तिला कोणी काही बोललेलं मला आवडायचं नाही. तिच्यासाठी मी भांडायची. तिचं कौतुक सगळ्यांना सांगायची. 'माझी कु आजी' असा तिचा उल्लेख करायची. त्यामुळे वाड्यात सगळे मला गंमतीने 'कुं'ची 'चमची' म्हणायचे! तेही चालायचं मला. आहेच मी तिची चमची!  असं म्हणायची मी .तिला फक्त मुलीच आवडायच्या. माझ्या भावांना ती तिच्या आसपासही फिरकू द्यायची नाही. माझे एकटीचे खूप लाड करायची. त्यामुळे त्यांना माझा फार हेवा वाटायचा. मी वाड्यात खेळण्यात दंग असेतर कोणीतरी येऊन मला सांगायचं.... आली बघ तुझी कु आजी.... तू अजून इथे कशी? हे ऐकलं की मी माडीवर धूम ठोकायची.... तिला पाठीमागून पकडून मिठी मारायची!  तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वहायचा! आता किती ते प्रेमाचं भरतं..... मला काम करून देशील का नाही?.... पण असं वाटायचं.... तिला मुळी काम करायचंच नाहीये.... तिला माझ्याशीच खेळायचं आहे.

 

ती तिच्या कामात दिवसभर व्यस्त असायची. मग मी पण अंगणात खेळायला जायची. संध्याकाळी खेळता खेळता एकदम लक्षात यायचं.... अरे, जिन्यापाशी हातात पिशवी घेऊन ती उभी आहे.... केव्हाची!  ती डोळे भरून मला बघत असायची. त्या डोळ्यातली माया मला तिच्याकडे खेचून न्यायची.... मला रोज गलबलून यायचं.... निघालीस तू..... ती पण जडावल्या शब्दात म्हणायची.... हो गं!  मला पण माझ्या घरी नको का जायला ?......उद्या येणार आहे ना मी पुन्हा..... मग आपण दोघी मज्जा करू.... मी तिला बाहेर रस्त्यापर्यंत पोचवायला जायची. ती दिसेनाशी होईपर्यंत तिला टाटा करत राहायची..... कोपऱ्यावर वळताना ती एकदा मागे वळून मला टाटा करायची आणि अदृश्य व्हायची.

 

ती जाईल तिथे मला बरोबर घेऊन जायची. अर्थात आईची परवानगी घेऊन. तिच्या मेव्हण्यांकडे न्यायची. ते एक खूप म्हातारे आजोबा होते. आम्ही सकाळी गेलो तर ते शंकराच्या पिंडीवर अभिषेक पात्रातून अभिषेक करत, काहीतरी स्तोत्र वगैरे म्हणत असायचे. मला बघून प्रसन्न हसायचे. त्यांच्या पण घरात कोणीच नसायचं. मला फार नवल वाटायचं.... ही माणसं अशी एकटी एकटी का राहतात..... यांच्या घरात दुसरी माणसं का नाहीत.... काहीच सामान कसं नाही? आजोबा पण माझे लाड करायचे.... म्हणायचे तिला त्या डब्यातला लाडू द्या हो.... किती दिवसांनी आणलेत तुम्ही तिला.... मग मी जमिनीवर मांडी घालून लाडू खाईपर्यंत आजी आजोबांसाठी मुगाच्या डाळीची खिचडी करायची. ती झाकून ठेवायची. आजोबांना चहा करून द्यायची. तिच्या बशीतला शेवटचा घोट मला पाजायची. मग आजोबांना टाटा करून आम्ही दोघी मागच्या अंगणात जायचो. तिथे खूप मोठे आवळ्याचे झाड होते. ते नेहमी आवळ्यांनी लगडलेले असायचे. आजी एखाद्या फांदीला हळूच धक्का द्यायची..... टपाटप आवळे खाली मातीत पडायचे.... मी फ्रॉकमध्ये ते गोळा करायची..... आणि मग ती झोळी आजीच्या पिशवीत रिकामी करायची. त्या बंगल्याच्या मालकीणबाई आवाजाने खिडकीतून बघायच्या.... अगोबाई!  माधुरी का? किती दिवसांनी आणलेत हो तिला!   काय ग!  पुरेत का तेवढे आवळे? का अजून देऊ? आजी मला डोळ्यांनी खूण करायची.... नको म्हणून..... मग मी म्हणायची.... नको काकू!  खूप घेतले.... आता बास!   आजी प्रेमाने हळूच माझ्या पाठीवर हात ठेवायची. मूक शाबासकी असायची ती!

 

कु आजी एकदा मला तिच्या गावी घेऊन गेली. तिथे कोणाच्या तरी लहान बाळाचं जावळ होतं. एका ओढ्याच्या काठावर एक छोटंसं  खूप जुनं देऊळ होतं. काहीतरी विधी चालू होते. त्यात तिला रस नव्हता आणि मलाही. मग आम्ही दोघी ओढ्याच्या काठाकाठाने चालू लागलो. ओढ्याच्या स्वच्छ पाण्यात छोटे छोटे मासे पळत होते. मला ते हातात पकडायचा मोह झाला. पण आजीने अगदी घट्ट हात हातात धरून ठेवला होता. पाण्यातले गोल गोल दगड मला खुणावत होते.... तेवढ्यात काठावर मला सापाची भली मोठी कात दिसली. तोपर्यंत मला ते काय आहे माहीत नव्हते. मग आजीने साप कसा कात टाकतो ते सांगितले. परतीच्या प्रवासात संध्याकाळी आम्ही बैलगाडीत बसून निघालो. रस्त्यात शेतं होती. मला तिच्या भावाने विचारलं काय ग, शेंगा खाणार का? मी म्हटलं इथे कुठे आहेत शेंगा? या बघ... असं म्हणत त्याने जमिनीतून एक रोप उपटून काढले आणि खाली मुळांना लगडलेल्या शेंगा माझ्यासमोर धरल्या.... एखादी जादू बघावी तसे माझे डोळे विस्फारले गेले.... मातीतून शेंगा काढल्या? कशा काय ? तो म्हणाला, अगं वेडे, शेंगा मातीतच लागतात. तेव्हा पहिल्यांदा मला कळले की शेंगा झाडाला लागत नाहीत. मुळांना जमिनीत लागतात. माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून सगळेजण खूप हसले होते. हे पण मला अजूनही आठवतंय. आजीच्या सगळ्या नातेवाईकांना सुद्धा माझ्या आणि तिच्या वेड्या प्रेमाची माहिती होती. त्यामुळे ते पण आम्हा दोघींना खूप चिडवायचे.

जसजसं वय वाढू लागलं तसे अनेक प्रश्न पडू लागले मला. मी उत्तरं  शोधू लागले. आजी दुसऱ्या घरात एकटी का राहते.... ती एकटीच कशी.... तिला कोणीच कसं नाही.... तिला मुलगा मुलगी का नाही..... ती आपल्या घरी का राहत नाही?

 

ती खरंच एकटी होती. लग्नानंतर खूप वर्षांनी सुद्धा तिला मूलबाळ झालं नाही. काही वर्षांनी तिचे यजमानही निवर्तले. ती माझ्या आजीची, म्हणजे आईच्या आईची मैत्रीण. माझ्या आईला पण तिने खूप जीव लावला. ते दुसऱ्या वाड्यात शेजारी राहायचे. तिला सावत्र भावंडं होती. माझी आजी वारल्यानंतर घरात कोणीच बाईमाणूस नव्हते. आजोबा आणि मामाचे कोण करणार? ही पण एकटीच होती. घरंदाज होती. पण तिला पैशांची पण गरज होती. मग आईने तिला आजोबांकडे आणले. ती दिवसभर घरातली सगळी कामे करून तिच्या खोलीवर परत जायची. ज्या दिवशी मला हे सगळे कळले त्यावेळी माझे वय बऱ्यापैकी मोठे होते. मला खूप मोठा मानसिक धक्का बसला. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती.... पण ती पचवण्याची ताकद माझ्यात नव्हती.

 

मला हे मान्य नव्हते....की ती माझी रक्ताची कोणी नव्हती..... तिचं आणि माझं काहीही नातं नव्हतं.... जे होते ते ऋणानुबंध होते..... पण मग तिचं प्रेम... तिची माया....गेल्या अनेक वर्षांपासून अनुभवत असलेले ते मायेचे स्पर्श.... मला जपणं.... हे काय आहे? आणि दुसऱ्या क्षणी मी तिच्या जास्तच प्रेमात पडले!  त्या रात्री मी एकटीच मनसोक्त रडले. दुसऱ्या दिवशी ती भेटली..... मी तिचे हात हातात घेतले.... घरकाम करून खरखरीत झालेले तिचे ते हात माझे फार लाडके होते..... मला झोप येत नसली की मी तिच्या मांडीवर डोकं टेकायची.... आणि ती माझ्या कानांवरून तिची खरखरीत बोटं फिरवायची.... त्या बोटांमध्ये अशी जादू होती की हळू हळू माझे डोळे मिटायला लागायचे.

 

आज माझा स्पर्श तिने जाणला..... तिच्या डोळ्यात व्याकुळता होती...... माझ्या जीवाची जास्तच घालमेल झाली..... काय विचार करत असेल ही? हिला खरं काय ते कळलं तर ही अशीच प्रेम करेल का आपल्यावर पूर्वीसारखीच? असाच काहीसा विचार ती करत असावी..... मग मीच तिला मिठी मारली..... आज मीच मोठी झाले होते तिच्या पेक्षा..... तिला पाठीवर थोपटत होते.... माझ्या आश्वासक स्पर्शाने ती गदगदून गेली. माझ्या डोळ्यांनी तिचा पदर भिजवला. एका शब्दानेही संभाषण न करता त्या दिवशी आम्ही जन्मजन्मांतराच्या गप्पा मारल्या. आम्ही दोघी जास्तच जवळ आलो. एक अतूट नातं निर्माण झालं.

 

यथावकाश माझं लग्न झालं. आम्ही एकमेकींचा निरोप घेतला तेव्हा परत आपण दिसू का एकमेकींना असेच भाव मनात होते. ती मद्रासला माझ्याकडे आली तेव्हा खूप थकलेली होती. तिच्या सहवासात माझा आठवडा भुर्रकन उडून गेला. पुन्हा आमची ताटातूट झाली. मी बाळंतपणाला माहेरी आले तेव्हा ती आवर्जून आली माझं बाळंतपण करायला. पण आता ती खूप थकली होती. तिच्याच्याने काम होत नव्हते आणि तिला गप्प ही बसवत नव्हते. तेव्हा आपण हिला खूप जपलं पाहिजे असे विचार माझ्या डोक्यात यायचे. पण त्या अवस्थेत तीच मला जपत होती. जिना उतरताना माझ्या पुढे पुढे एकेक पायरी उतरत होती. मी पडू नये म्हणून, पायरी चुकू नये म्हणून काळजी घेत होती. मी बाथरूम मध्ये गेले तर बाहेर येईपर्यंत दाराबाहेर उभी असायची. मी मनातल्या मनात खजील व्हायची. या वयात किती जपते ती आपल्याला. मला पण तुला असंच जपायचंय गं!  माझं बाळ थोडं मोठं होईपर्यंत थांब!

 

माझं बाळंतपण करून, माझ्या बाळाला मांडीवर खेळवून ती परत गेली तिच्या घरी..... परत कधीही न दिसण्यासाठी..... अल्प आजाराने ती गेली.... एकटी गेली.... ज्यांना आयुष्यभर प्रेम दिलं ते आमच्यापैकी कोणीही तिच्या जवळ नव्हते..... आमच्यावर भलं मोठं ऋण ठेवून ती गेली..... ती अशी न सांगता गुपचूप निघून गेली हे खरंच वाटत नव्हतं मला....अजूनही मी नऊवारी साडी नेसलेल्या वृद्ध आज्यांमध्ये माझी कु आजी कुठे दिसते का शोधत असते..... मला एकदा तरी तिला भेटायचंय.... हे विचारायला.... इतका जीव लावून न सांगता अशी एकाएकी का निघून गेलीस..... मला तुझी सेवा करायची एकही संधी न देता..... माझा निरोप न घेता..... तू का गेलीस?! ! ! !


माधुरी राव




No comments:

Post a Comment