कुलूप



सारेच झाले चिडीचूप,
कडी कुलुपांसकट
निसर्ग म्हणे माणसाला,
झाली का रे वाट बिकट ।।

माझं अमुक… माझं तमुक…
मी माझ्या इच्छांचा
केलास का रे कधी विचार,
दुनियेतल्या इतरांचा ?





झाडांची केलीस कत्तल,
केलेस नद्यांचे नाले
लावलेस पंख विज्ञानाचे,
तरी रितेच सारे प्याले 


एक आला विषाणू,
जो डोळ्यांनाही न दिसे
विज्ञान आणि तंत्रज्ञान,
सकलांची त्याने काढली पिसे 


म्हणून म्हणतो...

होशील थोडा अंतर्मुख अन्
करशील का रे थोडा विचार?
स्वतःच्या या वागण्याला,
देशील का एक छान आकार?


विज्ञानाचे मूळ तत्त्व हे,
जाण,  न् सोड हामीपणा
पश्या म्हणे वाकलास थोडा,
तर मोडणार नाही असा कणा ।।

 प्रसाद सरदेशपांडे



No comments:

Post a Comment