तोंडचं पाणी पळवतंय पाणी!


‘पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाये लगे ऊस जैसा’  सत्तरीच्या दशकात हे गाणं सतत रेडिओवर लागायचं! माझ्या बालपणाचा काळ होता तो! तेव्हा पाणी मुबलक होतं आणि हेच पाणी पुढे तोंडचं पाणी पळवणार आहे याची कल्पनाही नव्हती!  तेव्हा सगळीकडे पाणी होतं, पाऊस वेळेवर पडायचा, जलाशये तुडुंब भरायची, इतकंच काय घरोघरी असलेल्या विहिरी पण भरून जायच्या! सगळं कसं व्यवस्थित होतं! तेव्हा लोकांजवळ जास्त पैसे नव्हते, पण भरपूर पाणी होतं!

पण हळूहळू हे चित्र बदलत गेलं. लोकसंख्या वाढत गेली. आधी घराघरात असलेल्या विहिरीतील पाणी मग नळात आलं, मग बाटलीत आणि आता तर तेंही मिळेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे!

कशामुळे झाले असावे हे? जगातल्या अनेक देशांमध्ये फिरलो. इंग्लंड, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका सारख्या विकसित देशांत कुठेच पाण्याचा प्रश्न नाही. मग आपल्यालाच हा प्रश्न का भेडसावतो? नाही म्हणायला दक्षिण आफ्रिकेसारखे देश सोबतीला आहेत. पण मुख्यत्वे आशिया खंडातील विकसनशील देशात हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.

पाण्याचा प्रश्न इतका बिकट का झाला आहे याबद्दल अनेक तज्ञांनी संशोधन केले आहे! माझ्या एका विक्षिप्त मित्राच्या अजब तर्कानुसार आजच्या पाण्याच्या तुटवड्यासाठी बॉलीवूड जबाबदार आहे. त्याचे म्हणणे असे की सत्तरीच्या दशकात प्रत्येक चित्रपटात नायिकेला कृत्रिम पावसात मनसोक्त भिजविले जात होते. म्हणजे पावसात ओलेत्या नायिकेचे गाणे नसले तर सेन्सर चित्रपट पास करणार नाही की काय, अशी शंका यावी! पण त्याच्या मते या पावसाच्या गाण्यांमध्ये बॉलीवूडने लाखो लिटर पाणी वाया घालविले आणि त्यामुळे भारतात पावसाचा तुटवडा निर्माण झाला.

आता हा अजब तर्क हसण्यावारी नेला तरी त्यात थोडेफार तथ्य आहेच. केवळ बॉलिवूडचं नव्हे प्रत्येक ठिकाणी आपण अविचारीपणे पाणी वाया घालविले आहे! पाणी ही जपून वापरायची गोष्ट आहे आणि ते वाया घालवू नये, याची जाणीवच आपल्याला फार उशिरा झाली! तोपर्यंत वेळ निघून गेली होती!

उरलीसुरली कसर आपण पूर्ण केली ती वृक्षतोडीने! सिमेंट, कॉंक्रिटची जंगले वाढतंच गेली आणि जंगलांचे प्रमाण कमीकमी होत गेले! निसर्गाचा समतोल बिघडविण्यात अशा प्रकारे आपण पूर्णपणे यशस्वी झालो, पण त्याच्या भीषण परिणामाची जाणीव न ठेवता!

शहरीकरणामुळे अजून एक प्रश्न तयार झाला की पाण्याला जमिनीमध्ये जायला आपण वाटच ठेवली नाही. जिकडे बघावे तिकडे सिमेंटचे रस्ते! सगळ्या नद्यांमध्ये, तलावांमध्ये गाळ साचलेला! पाण्याला नदीकडे जायलाही आपण वाट ठेवली नाही. मग हेच पावसाचे पाणी शहरात शिरून विध्वंस करू लागलं. पावसाळ्यात अतिवृष्टी आणि इतर वेळी पाण्याची बोंबाबोंब! अशी परिस्थिती निर्माण झाली.

यात सगळ्यात जास्त भरडला गेला तो शेतकरी वर्ग! शेतीचा उद्योग पूर्णपणे पाण्यावर अवलंबून आहे. विहिरी बांधून तरी काय उपयोग? जर आडातच नाही तर मग मोटेत कुठून येणार?

तिसरे महायुद्ध हे पाण्यावरून लढले जाईल असे म्हणतात. आजची परिस्थिती पाहून हे खोटे वाटत नाही. परिस्थिती किती भीषण आहे हे चेन्नईच्या पाणीसंकटाने दाखवून दिले आहे, पण ती खरंतर त्यापेक्षाही भयानक आहे.

नुकतीच सिएनएन वर एक बातमी वाचली, ती वाचून तर झोपच उडेल. या बातमीनुसार भारताला पाणीप्रश्न सोडवायला अजून फक्त पाच वर्षे वेळ आहे, नाहीतर लाखो, करोडो लोकांचा जीव धोक्यात येईल. नीती आयोगाच्या रिपोर्टनुसार भारतातील प्रमुख २१ शहरांमधील पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. या शहरांमध्ये बंगलोर, हैद्राबाद, चेन्नई, दिल्ली सारखी प्रमुख शहरे आहेत. भारतीय जलाशयांमध्ये १/३ पेक्षा कमी साठा आहे. भारताच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज वाढतच जाईल. पावसाचे प्रमाण कमी होते आहे आणि सरासरी तापमान वाढतेच आहे. या उन्हाळ्यात विदर्भातील तापमान ५० डिग्री पर्यंत जाऊन पोहोचले होते!!



सरकार याबाबत प्रयत्न करीत आहे. नुकतेच स्वतंत्र जलशक्ती खाते निर्माण करण्यात आहे आहे आणि हा प्रश्न सोडविण्याचा गंभीरपणे प्रयत्न सुरु आहे. 
पण प्रत्येक प्रश्न हा सरकारनेच सोडविला पाहिजे ही भूमिका आपण सोडली पाहिजे. हा  देश माझाही आहे आणि मी माझ्या परीने पाणी वाचविण्याचा, वृक्षसंवर्धन करण्याचा आणि पाणी साठविण्याचा प्रयत्न करील असे जर प्रत्येकाने ठरविले तर हा देश परत सुजलाम सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही आणि आपण पुन्हा मंगेश पाडगावकरांचे शब्द आठवू,

           श्रावणात घननीळा बरसला
           रिमझिम रेशीमधारा
           उलगडला झाडातून अवचित
           हिरवा मोरपिसारा!


अविनाश चिंचवडकर


No comments:

Post a Comment