'लिहू आनंदे' लेखन कार्यशाळा अहवाल

 


'बंगळुरू मित्रमंडळ' या बंगळुरू मधील एका संस्थेने २१ आणि २२ फेब्रुवारी २०२१ रोजी 'लिहू आनंदे' ही ऑनलाइन लेखन कार्यशाळा आयोजित केली होती. लेखनाची उर्मी असणाऱ्या नवलेखकांना लेखनाचे तंत्र समजून घेता यावे, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता. ज्येष्ठ समीक्षक, संपादक, प्रा.डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांच्या  मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा पार पडली

 

डॉ.वंदना बोकील-कुलकर्णी यांनी ललित व ललितेतर साहित्य यांतील अंतर समजावून सांगितले. स्वतःच्या पिंडधर्मानुसार प्रवासवर्णन, जाहिरातलेखन, दृकश्राव्य माध्यमांसाठी संहितालेखन, पुस्तक परिचय असे अनेक प्रकार कसे हाताळावेत हे समजावले. लेखन शैली, मोजक्या आणि नेमक्या शब्दांत मांडणी याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. लेखन प्रसिध्द करणं ही एक जबाबदारीची कृती असल्याने त्याबद्दलची सत्यता पडताळून पहाणे, किंवा त्यासंबंधीचा अभ्यास करणे हे किती महत्वाचे आहे हे त्यांनी विषद केले. विशेषतः वृत्तपत्रीय लेखनात शब्दमर्यादा पाळणे किती महत्त्वाचे ठरते याचीही जाणीव दिली.

शिबिरार्थींना कोणत्याही रुपबंधात १०० शब्दांत लेखनाचा छानसा गृहपाठ त्यांनी दिला होता. सर्वांचं लेखन वाचून २२ फेब्रुवारीला त्यावर सविस्तर चर्चा केली. प्रत्येकाने इतरांच्या लेखनातील त्रुटी मनमोकळेपणे सांगितल्या. विविध साहित्याचा रसास्वाद घ्यायला शिकवणारी, सजग वाचकही घडवणारी ही चर्चा खूप आनंददायी होती.

 

डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी

डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी आजवर स्वतंत्रपणे किंवा इतरांबरोबरही विशेषतः कथा लेखन, गद्य-पद्य अभिवाचन यांच्याही कार्यशाळा घेतल्या आहेत. तुलनेने ही काहीशी प्राथमिक स्वरुपाची आणि मागणीनुसार आयोजित केलेली कार्यशाळा होती. विविध प्रकारच्या स्पर्धांना परीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. 'संवादसेतू' या त्यांच्या संपादनातील दिवाळीअंकाने गेल्या पाच वर्षात उत्कृष्ट दिवाळी अंकाच्या पंक्तीत महत्त्वाचे स्थान पटकावले आहे. त्यांचे मार्गदर्शन मोलाचे असल्याचा प्रत्यय अनेकांनी आजवर घेतला आहे.

ह्या मोलाच्या अनुभवानंतर त्यांच्या पुढच्या उपक्रमाची आपण नकळत वाट पाहू लागतो, असाही सुखद अनुभव या कार्यशाळेनंतर आला.

इतकी सुनियोजित कार्यशाळा घेऊन, पुण्यातून त्यात आम्हालाही सहभागी करून घेतल्याबद्दल बंगळुरू मित्रमंडळ यांना मनापासून धन्यवाद!

यासाठी मित्रमंडळातील श्री अमित बागुल, श्वेता पानवलकर, नरेन नंदे यांचे अनमोल सहकार्य लाभले. मधुरा ओगले देव हिने समर्पक मजकूर लिहून दिला आणि अनघा बोडस हिने आकर्षक पोस्टर तयार केले. या सगळ्यांचे मनापासून आभार.


स्वाती कर्वे, प्रज्ञा घाणेकर

पुणे


No comments:

Post a Comment