जगूया आनंदे - १०

 

Coping with stress

तणावाशी मुकाबला कसा करावा

Stress (तणाव)- शरीराने दिलेला संकेत असतो. हे संकेत साधारणपणे स्वभावात आलेला चिडचिडेपणा, सतत चिंताग्रस्त मन, झोपेच्या तक्रारी अशा आणि इतर अनेक प्रकारे जाणवतात. Stress हा काही प्रमाणात आवश्यक आहेच, कारण त्यामुळे व्यक्तीतील सुप्त गुणांना चालना मिळते. पण हाच stress त्रासदायी वाटतो, जेंव्हा त्याला सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्य आपल्याकडे नसते.

 

शास्त्रीय संशोधनाद्वारे तणावाचे शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक (emotional) होणारे नकारात्मक परिणाम सिद्ध झाले आहेत. सतत तणावाला सामोरे जाताना शरीरात बरेच बदल होतात. तणावाचे स्वरूप व्यक्तिसापेक्ष आहे. जसे  लांबचा प्रवास एखाद्याला कंटाळवाणा वाटतो, तर एखाद्याला हा प्रवास आवडू शकतो. बालपणीचे आणि वाढत्या वयानुसार येणारे अनुभव आपल्या डोक्यात कोरले जातात. अनुभवातून किंवा लहानपणच्या आठवणीतून निर्माण झालेल्या कल्पना ह्या खोलवर रुतून बसलेल्या असतात. बऱ्याच वेळेला आपल्या क्रिया आणि प्रतिक्रिया या अनुभवातूनच होत असतात. stress जर उच्च पातळीवर जास्त काळापर्यंत राहिला तर तो भावनिक समतोल, आरोग्य आणि बुद्धी (विचार शक्ती) आणि पर्यायाने तुमच्या संपूर्ण जीवन शैलीवर परिणाम करतो.

तणावावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय काळजी घेणे आवश्यक आहे? त्याबद्दल समजून घेऊया.


एखादा प्रश्न, परिस्थिती, तिला हाताळण्याची क्रिया किंवा या बाबतची प्रतिक्रिया याबद्दल सजग असणे. आपण का आणि काय करत आहोत? याचा विचार आणि त्यानुसार पूर्वतयारी असणे. आपल्यातील क्षमता, सीमा (limitations) यांचे अवलोकन/परीक्षण केलेले असायला हवे.

 

स्वत: बद्दल चुकीच्या कल्पना ठाम बसलेल्या असतील, जसे कीमाझ्यातच काहीतरी कमी आहे", मीच कुठंतरी कमी पडले/पडलो असेनअसे समज-गैरसमज शारीरिक आणि मानसिक तणावास कारणीभूत ठरतात. त्याच्यावर काम करायला हवे. एक उदाहरण देते.

 

निखिल (नाव बदलून) बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदाधिकारी आहे. पण अजून एखादे presentation किंवा एखादा talk द्यायचा असला तर त्याला कमालीचे tension येते. खरेतर त्याची तयारी अतिशय उत्तम असते. पण तरीही तो घाबरतो. याचे  कारण त्याच्या लहानपणात आहे.

तो सहावीत असताना वर्गात सर्वांसमोरच  त्याचा हिंदीचा पेपर त्याने कसा लिहिला आहे - त्याच्या किती चुका झाल्या आहेत हे शिक्षकांनी वाचून दाखवले होते. त्यावेळी त्याला जो धक्का बसला होता, त्याने त्याचा आत्मविश्वास कमी झाला होता. आणि त्याला मनात भीती बसली, की आपण चूक तर करणार नाही ना? सगळे आपल्याला काय म्हणतील? त्यामुळे हा ताण त्याच्या मनावर कायम यायचा.

 

वयानुसार निसर्गतः होणारे शारीरिक, मानसिक बदल यांची जाणीवही होताच असते. वाढत्या वयानुसार ताण सहन करणे कठीण होते. आपल्याला कोणत्या गोष्टींचे टेन्शन येते? आपण टेन्शन बऱ्याच काळ सहन तर करत नाही ना? याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे. फार काळ मनावर ताण राहिला तर त्याचा आपल्या तब्ब्येतीवर परिणाम होतो. मनाला विश्रांती मिळत नाही, त्याचे गंभीर परिणाम शरीरावर दिसू लागतात.

 

आहार, विचार आणि झोप यांचे गणित जमते आहे ना याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जर यात वारंवार बदल होत असेल त्याचा ताण येऊ शकतो.

 


तणावमुक्त जीवन जगण्याची गुरुकिल्ली कोणती? किंवा मंत्र कोणता? तर life style change पण म्हणजे नेमके काय?

 

मन आणि शरीर यांचा परस्पर पूरक संबंध आहे. त्यामुळे खाणं, झोप आणि नियमित व्यायाम यावर नियंत्रण आणि नियमितपणा असायला हवा. ही झाली तब्ब्येतीची काळजी. पण आपले विचार, कल्पना, मतप्रवाह जर कालबाह्य झाल्या असतील तर त्या प्रयत्नपूर्वक झटकून टाका. त्यामुळे मनाला नव संजीवनी लाभेल. नवीन दिवसाची सुरुवात ही न आवडलेल्या, न पटलेल्या विचारांना झटकून देऊन करा. दिवसभर करायच्या कामांची यादी बनवा, त्यात आपले छंद वेळात वेळ काढून जोपासायचे हा भाग असू द्या. ही झाली मनाची निगराणी. यामुळे मन, विचार आणि कृती यात एकवाक्यता असेल. मन आणि शरीर यांच्यात एकतानता येईल.

 

डॉक्टरांनी सांगण्याची वेळ येण्याआधी आपल्या दिनचर्येत समजून-उमजून बदल करायचे. बदल हा हळूहळू टप्प्या-टप्प्प्याने करायचा. सातत्य नि नियमितपणा ह्याची मनाशी खूणगाठ बांधायची. वयानुसार जबाबदारी पार पडताना कोणती कामं आधी करायची आणि कोणती नंतर याचे निर्णय परिस्थितीचा विचार करून घेतले जावेत. स्वयंशिस्तीचा परिणाम हा दीर्घकाळ टिकणारा असतो.

 


योगासने, प्राणायाम, ध्यान-धारणा, बागकाम यासारख्या आवडीमुळे ही तणाव कमी व्हायला मदत होते. तणावावर मात करता आली की आपोआप शरीर आणि मन आनंदी राहते. कामाचा दर्जा सुधारतो कारण कामावर लक्ष केंद्रित करता येते. त्यामुळे चुका कमी होतात. वेळ वाचतो. एकूण ज्याला आपण जीवनमान म्हणतो ते सुधारते. आयुष्याच्या ह्या टप्प्यावर आणखीन आपल्याला दुसरं काय हवे?


डॉ.पूर्वा रानडे 




No comments:

Post a Comment