जगूया आनंदे - भाग ११

 

Coping with Emotions

भावनांचे व्यवस्थापन

भावना मग त्या प्रेम, आनंद, दुःख, राग, तिरस्कार, तिटकारा, द्वेष, किळस, भय आणि अशा अनेक स्वरूपात व्यक्त होतात. कधी कधी त्या कृतीतून, शब्दातून किंवा चेहेऱ्यावर उमटतात, वाचता येतात. कुणी दिलखुलास गाणं गुणगुणत असेल तर व्यक्ती बहुतेक आनंदी असावी असा निष्कर्ष काढता येईल. कुणी जोरजोरात ओरडत असेल तर तो रागावला आहे हे समजायला काही कठीण नाही, नाही का?

 

भावना आणि मूड यात मात्र किंचित फरक आहे. भावना ह्या क्षणिक असतात. कोणत्याही भावनेमागचे कारण शोधायला सोपे असते. मूड काही तासांपासून ते कित्येक दिवसांपर्यंत राहतो. प्रत्येक वेळी तो चेहेऱ्यावर किंवा कृतीत दिसेल असे निश्चितपणे सांगता येईल असे नाही. मात्र आपल्या भावनांविषयी प्रत्येक क्षणी सतर्क असायलाच हवे बरं  का. कारण भावना आणि जीवन शैली यांचा जवळचा संबंध आहे.

 

भावनांना आवर का आणि कसा घालायचा हे जाणून घेऊया.

एखाद्या कठीण प्रसंगाला सामोरे गेल्यामुळे दुःख, राग, संमिश्र भावना - नैराश्य, असहाय्यता अनुभवास येतात. आणि अशा भावना जेंव्हा बऱ्याच काळ दबून राहतात तेंव्हा त्या मनातील गुंतागुंत वाढवतात. ज्यामुळे स्ट्रेस येतो, शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. भावनांवर जर अंकुश राहिला नाही तर व्यक्ती सैरभैर होते. सिगारेट, दारू यांचे व्यसन लागण्याची शक्यता वाढते.


शरीरात hormonal imbalance होतो. छोट्या छोट्या गोष्टीत चिडचिड होते. सारखे सारखे मूड बदलतात. विचार आणि वागणे दोन्ही बिघडायला लागते. आपल्याच वागण्यात आणि बोलण्यात एकवाक्यता, सुसूत्रता राहत नाही. सतत भेडसावणारी चिंता/काळजी याचा परिणाम आपल्या मूडवर, रोजच्या दिवसभराच्या कार्यक्रमावर होत असतो. कठीण परिस्थिती हाताळताना पूर्ण साकल्याने विचार आणि निर्णय घेणे सोपे जात नाही. वारंवार असे प्रसंग झेलावे लागले तर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो.जीवनात आंनद आहेयावर विश्वास बसत नाही. मानसिक क्लेश, पीडा, नैराश्य किंवा नकारात्मक विचार ह्यामुळे मनस्ताप होतो. उगीचच अपराधीपणाची भावना निर्माण होते. बराच काळ चिंता करून मेंदू शिणून जातो. झोप, भूक यावर तर परिणाम लगेच दिसून येतात. अशावेळी आपल्याला काय आणि कसं वाटतं आहे ह्याची समज असणे (awareness ) गरजेचा आहे.

 


एक उदाहरण देते. मीनल (नाव बदलून) आज कॉलेजमधून बास्केट बॉल खेळात फायनल जिंकून आली. घरात आली तीच मोठ्याने ओरडत 'आई आम्ही जिंकलो. ही बघ ट्रॉफी. बरोबर तिच्या मैत्रिणीही होत्या. आईने खुश होऊन तिला जवळ घेतले. त्यावेळी ती एकदम आईच्या अंगावर ओरडली,आई अगं काय करतीयेस? सोड ना?” आईला नेमके  तिच्या ओरडण्याचे कारण कळेना. आई आत निघून गेली. थोड्या वेळाने सगळ्या गेल्यावर मीनलने आईला आत येऊन घट्ट मिठी मारली!! तिचे वागणे आईला समजले नाही. शेवटी आईने विचारले, 'काय ग, मगाशी का चिडलीस माझ्यावर? त्यावर मीनल म्हणाली 'आई ग माझ्या सगळ्या मैत्रिणी होत्या ना. त्या हसतील ना मला.'

 

मीनलला झालेला आनंद आणि आईला मीनल ओरडल्यामुळे वाईट वाटलेले होते, या दोन्ही गोष्टी स्पष्ट होत्या. यावरून भावना समजायला हव्यात, तशा त्या व्यक्तही योग्य तऱ्हेने करता यायला हव्यात. कारण आपल्या भावना योग्य पद्धतीने दुसऱ्यापर्यंत पोचल्या नाहीत तर गैरसमज होण्याची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याची सुद्धा वश्यकता असते. यावर तुम्हाला तुमची क्रिया किंवा प्रतिक्रिया ठरवता येते.

 

लहान मुलांच्या बाबतीत हे नेहमी घडते. त्यांना सांगायचे एक असते. पण प्रत्यक्ष बोलतात वेगळेच. लहान वयात त्यांची शब्द संपदा कमी असते. त्यामुळे त्यांना  आपल्याला काय वाटतंय हे नेमक्या शब्दात सांगता येईलच असे नाही. त्यामुळे दुसऱ्याच्या भावना समजणे हे ही फार महत्वाचे असते. याची काळजी घ्यायला हवी. भीती, दुःख, राग ह्या भावना सतत अनुभवायला येत असतील तर त्याचे कारण शोधायचा प्रयत्न करायला पाहिजे. त्यावर मग मार्ग काढता येतो. नाहीतर विचारात नकारात्मकता येते. आणि आयुष्यातली उमेद हरवत जाते.

 

हे भावनिक संतुलन आणि संयम साधण्यासाठी पहिल्यांदा आपल्या भावना काय आहेत हे माहिती पाहिजे. फार काळ नकारात्मक विचार किंवा भावना मनात ठेवू नयेत. कारण त्या साठत राहिल्या तर त्यांचा  नको त्या वेळी आणि नको त्या ठिकाणी उद्रेक होऊ शकतो. योग्य शब्दात त्या व्यक्त करायची सवय चांगली. साठलेल्या किंवा दबलेल्या भावनांना वाट करून दिल्यामुळे मनावरचे दडपण/ओझे कमी होते. रडावेसे वाटले/रडू आले तर मनसोक्त रडावे. हा नैसर्गिक उपाय आहे. त्यात कमीपणा/मनाचा कमकुवतपणा असे काहीही सिद्ध होत नाही. लोक काय समजतील/म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा मनावर आलेला भावनिक ताण कमी होणं जास्त महत्वाचे असते.

ताण कमी करण्यासाठी योगाभ्यास, प्राणायाम हे ही उपयोगी पडतात. तुमचे छन्द, आवडी-निवडी असतील तर त्या जपल्या पाहिजेत. नियमित व्यायामामुळे तुमच्या शरीरातील toxins घामावाटे निघून जातात. त्यामुळे तुम्ही फ्रेश होता. रोजची शांत झोप ही तेवढीच महत्वाची. जेंव्हा आपण नकारात्मक भावना आणि विचारांचे शिकार होत नाही तेंव्हा आपण जीवनात/आयुष्यात आनंदात राहू शकतो. आजूबाजूला तोच आनंद पसरवू शकतो.

 

सकारात्मक आणि नकारात्मक कोणत्याही असल्या तरी भावनांचा अतिरेक होऊ नये!!!!

भावनिक संतुलन/समतोल साधला जायला हवाच………



डॉ.पूर्वा रानडे




No comments:

Post a Comment