Critical Thinking
Critical Thinking म्हणजे सोप्या
भाषेत सांगायचे तर, कोणत्याही
गोष्टीवर/प्रश्नावर सर्व बाजू
विचारात घेऊन गंभीरतेने
केलेला विचार. मी प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी परिस्थितीचा पूर्ण साकल्याने विचार करू शकते/शकतो का? ह्या
प्रश्नांचे सकारात्मक उत्तर म्हणजे Critical thinking. सभोवतालच्या परिस्थितीचे आकलन, त्यानुसार काढलेले निष्कर्ष आणि त्यावरून
घेतलेले निर्णय.
आता प्रश्न हा आहे, की असा विचार शिकवून करता येतो, का ते मुळात असावे लागते? तर उत्तर असे आहे की याची जर सवय केली तर ते सहजी शक्य आहे. मग यासाठी काय करुया? तर आपले कान आणि डोळे उघडे ठेवूया. आंधळेपणाने कोणावरही विश्वास न ठेवता, एकदा मला काय वाटते, हे स्वतःलाच विचारुया. आपल्या विचारबुद्धीला चालना देऊया.
सभोवतालच्या परिस्थितीचे आकलन, निरीक्षण शक्ती, त्यानुसार काढलेले निष्कर्ष आणि त्यावरून
घेतलेले निर्णय. उदाहरणार्थ कोणी रागारागाने बोलत आहे. तर आपण त्याच्या शब्दांकडे लक्ष देण्याऐवजी
त्याची नेमकी आत्ताची गरज कोणती आहे? रागाचे
कारण काय असू शकते?
हे समजून घेतले की त्याला मदत करणे, समजून घेणे सोपे जाईल. असे साकल्याने विचार करायची सवय लागली, की आपण आपोआपच सजग राहतो. ह्या सवयीमुळे मिळणाऱ्या संधींचा फायदा करून घेता येतो. नवीन कल्पना, नवीन मते यांचे दिलखुलासपणे स्वागत करता येते. विचार एकांगी होत नाही. गृहीत समज (assumptions) असतील तर त्यात कितपत तथ्य आहे ते ही पडताळून कृतीत पारदर्शकता येते.
प्रत्येक क्षणाला आपल्या नकळत आपण निर्णय
घेतच असतो. पण काहीवेळा आपल्यासमोर गोंधळात टाकणारी
स्थिती उत्पन्न होते.
मन द्विधा होते. निर्णय घेणे कठीण होऊन बसते. त्यावेळी Critical
thinking करण्याच्या सवयीमुळे आपल्या पूर्व अनुभवाचा आणि माहितीचा वास्तवाशी
अचूकपणे मेळ घालता येतो. निर्णयाला
आपोआपच बळकटी येते. मलाच सगळं कळतं! माझंच फक्त बरोबर असतं! किंवा भावनेच्या भरात निर्णय घेऊन अमलात
आणलेली कृती - या कशालाही इथे अर्थ नसतो. कारण विचारांती घेतलेला निर्णय अथवा कृती
यांना वास्तवाचा मजबूत
पाया असतो.
घाईघाईने घेतलेला निर्णय/कृती यामुळे भविष्यात पश्चात्ताप करायची
वेळ येऊ शकते.
सर्वांगी विचार करायला शिकायचे कसे? हे पडताळून पाहायचे असेल तर खालील प्रश्न एकदा स्वतःला विचारा.
मी दुसऱ्या कोणाचा सल्ला घेतो का?
दुसऱ्यांचे मतप्रवाह/विचारधारा मी ऐकतो का?
मला माझ्या निर्णयात/कृतीत बदल करावा लागला तर तसा तो बदल आनंदाने स्वीकारायला जमेल का?
माझा निर्णयाच्या आड माझा अहं तर येत नाही ना?
Critical Thinking म्हणजे थोडक्यात पूर्वग्रह दूषित नसलेले
विचार, वास्तवाशी आधारभूत निर्णय आणि कृतींचे मूल्यमापन …......
पुढील भागात - विचारांच्या नवीन दिशा --- Creative Thinking ……
डॉ.पूर्वा
रानडे
No comments:
Post a Comment