जगूया आनंदे ...भाग ६

 

Decision Making


अगदी प्रत्येक क्षणी आपण सगळेच कोणता ना कोणता निर्णय घेत असतो. आपल्या नकळत सहज ही प्रक्रिया घडते. प्रत्येक वेळी आपल्याला अपेक्षित असेल तसेच घडेल/होईल असे नाही. तरीही निर्णयांच्या परिणामांचा आयुष्यावर, व्यक्तिमत्वावर चांगला /बरा /वाईट प्रभाव पडू शकतो. निर्णय घेताना असलेल्या अपेक्षा आणि सत्य यात खूप तफावत असेल तर परिस्थितीशी जुळवून घेताना कठीण जाते. यासाठी Decision Making एक महत्वाचे जीवन कौशल्य मानले जाते. निर्णय घ्यायला वयाची अट/बंधन नाही. लहानपणी मोठयांच्या सल्ल्याने/विचारांनी आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आपण निर्णय घेतो. मोठे झाल्यावर मात्र आपले आपल्याला निर्णय घ्यावे लागतात.

 

आता एखाद्या बाबतीतला निर्णय घेताना कोणती काळजी घ्यावी? सर्वात आधी निर्णय घ्यायची वेळ आली आहे हे लक्षात यायला हवे. नंतर त्या संदर्भात उपलब्ध असलेले पर्याय आणि त्याचे संभावित परिणाम यांचा सर्वांगीण विचार करून मग कृती करावी. जोपर्यंत विचारांचे कृतीत रूपांतर होत नाही तोपर्यंत तो फक्त विचार राहतो. कृतीत उतरल्यानंतर त्याला निर्णयाचे स्वरूप येते. नेहमी अपेक्षित परिणाम साधेल याची १००% खात्री देता येत नाही. So always be ready with the plan B.

 

निर्णय घेताना नेमक्या अडचणी कुठे येतात? तर द्विधा मनस्थिती/परिस्थिती किंवा स्वभाव. असे केले तर काय होईल? नुसतेच मनात येणारे प्रश्न/शंका आणि विचार. बाकीचे काय म्हणतील? संबंध बिघडतील का? आत्ता नको- पुढे केंव्हातरी पाहू. ( habit of procrastination) शेवटी गाडी पुढे सरकतच नाही. पर्यायाने निश्चित काही ठरत नाही. खूप गोष्टी एकत्र आल्या तर बऱ्याच वेळी कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे याची गल्लत होते.

 

भावनेच्या भरात किंवा आततायीपणे कृती झाली तर अशा निर्णयाचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. आपल्याला नेमके काय करायचे आहे हे ठरवता आले नाही तर हातची संधी गमवावी लागते. लहान असताना मित्रांची निवड/ संगत हा महत्वाचा विषय असतो. तरुण मुलामुलींना (प्रामुख्याने peer pressure मुळे) - सिगरेट, दारू, नशिले पदार्थ सेवन करण्याची वाईट सवय लागते. अशावेळी जर मित्रमैत्रिणी भरीला पाडत असतील तर ठामपणे नाही म्हणायचे धाडस दाखवावे लागते. यामुळे स्वतःला शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान होण्यापासून तुम्ही वाचवू शकता.


 त्यावेळी आयुष्यात योग्य वेळी धाडसी निर्णय घेणे किती महत्वाचे आहे ह्याची प्रचिती येते. काहींना आपण घेतलेल्या निर्णयाला दुसऱ्याने दुजोरा दिला की बरे वाटते. पण ह्यामध्ये स्वतःची निर्णयक्षमता ते कमकुवत करत असतात. दुसरे आपल्या वतीने ठरवितात. यात तुम्हाला गृहीत धरले जाण्याची शक्यता जास्त असते. दुसऱ्यांचे मत, सल्ला घेणे चांगले आहे, पण अंतिम निर्णय स्वतःचा असावा. एखादा निर्णय चुकला तर नुसते वाईट वाटून घेण्याऐवजी कुठे चूक केली हे पाहायला हवे.

 

निर्णय घेताना... प्रामुख्याने दोन गोष्टींची काळजी घ्यायची - आपण निर्णय स्वत:साठी, की इतर कोणासाठी, कशासाठी, घेणार आहोत? आणि दुसरे असे की या निर्णयावर अवलंबून असणारे पुढचे निर्णय कोणते यांचे गांभीर्य असले पाहिजे. उदा.- नोकरी वा जोडीदार निवडताना, बारावी पास झाल्यानंतर कोणती शाखा निवडायची, science /commerce /arts ज्यावर पुढचे सर्व career निश्चित होते. अशावेळी पूर्णपणे विचार, घरातील अनुभवी मंडळींचा, तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

 

योग्य वेळ, योग्य निर्णय, योग्य कृती, आत्मविश्वास(confidence) आणि आत्मसन्मान (self-respect) वाढवते. निर्णय-कृती-परिणाम आणि त्यांची जबाबदारी आपण स्वतः घ्यायची ही सवय आणि समज येते. निर्णय चुकला तर आपण इतर कोणालाही दोष देत नाही. यश किंवा अपयश हे दोन्ही आपलेच असते.

 


डॉ.पूर्वा रानडे




No comments:

Post a Comment