जगूया आनंदे - भाग ७


 Problem Solving

Problem Solving - प्रश्न सोडविणे - हे कौशल्य व्यक्तिविशेष दृष्टिकोन स्पष्ट करते. हे व्यक्तिगत वैशिष्ठय(trait) आहे. प्रश्न आणि त्याचे शोधलेले उत्तर असा विचार यात आहे. सक्रियता(proactiveness) आणि सकारात्मकता (positivity) आहे. प्रत्येक वेळी प्रश्न हमखास सुटेल किंवा अगदी बरोब्बर उत्तर मिळेल याची खात्री नसते. उत्तर शोधण्याचा विचार करायचा प्रयत्न याला महत्व आहे. हे कौशल्य तुम्हाला आयुष्यात प्रश्नाला सामोरे जायला आणि पर्यायाने पुढे जायला मदत करते. निराशा, हताशा, परावलंबित्व (मदतीची अपेक्षा) यांना इथे स्थान नाही.

 

लहान असताना आपण कोडी सोडवत असतो. सशाला गाजरापर्यंत कसे पोचवाल? मग आपण कोणता मार्ग वाटेत न थांबता गाजरापर्यंत पोचतो, त्या वाटेवर पेन्सिल फिरवतो. सशाला गाजरापर्यंत पोचवतो. तसेच कावळ्याने दगड टाकून माठातील पाणी पिऊन आपली तहान कशी भागवली, हे ही ऐकतो. एका अरुंद पुलावर दोन मेंढया एकमेकांसमोर आल्यावर, आधी ज्या शेळ्यांनी कोण मागे सरकणार यावर भांडून आपला जीव गमावला. यावरून धडा घेऊन एक मेंढी मागे सरकली आणि तिने दुसरीला आधी जाऊ दिले आणि मग ती स्वतः पूल ओलांडून गेली आणि आपआपला जीव वाचवला. प्रश्नाचे स्वरूप, गांभीर्य जाणून घेऊन, वेळ पडल्यास प्रसंगावधान राखून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणे योग्य ठरते. हे जीवन कौशल्य स्वतःच्या किंवा दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकून येणारे शहाणपण यातून विकसित होऊ शकते.

 

दोन अधिक दोन चार असे हमखास उत्तर असणाऱ्या समस्या, सगळया व्यक्तींच्या  आयुष्यात येतील असे नाही. प्रश्न एक उत्तरं अनेक!!!! अशा समस्याही आयुष्यात येऊ शकतात. अशा वेळी कधी कधी आपली उत्तरे चुकतील. प्रश्न अनुत्तरित राहतील. कधी कधी It’s ok to fail हा महत्वाचा धडा सुद्धा खूप काही शिकवतो. इतरांचे मत घेऊन मार्ग काढता येतो. चार जणांबरोबर चर्चा केल्यावर आपल्यापेक्षा वेगळे किंवा अधिक चांगले उत्तर मिळण्याची शक्यता निर्माण होते. दुसऱ्याचे उत्तर ही बरोबर असू शकते याची जाणीव होईल. सगळ्यात महत्वाचे असे की परिस्थितीला तोंड देऊन त्यातून मार्ग काढण्याची सवय लागते.

 

घरात वाढत्या वयाची मुलं असतील तर त्यांना आपली आपली उत्तरे शोधू द्यावीत. त्याचबरोबर घरातील लोकांचे हे ही आश्वासक शब्द हवेत की चुकले तरी चालेल. आम्ही आहोत. यामुळे अनेक फायदे होतात. मुलांना readymade उत्तरे मिळवायची सवय लागत नाही. बिनधोकपणे स्वत:चे विचार, मनातली प्रश्नचिन्हें  घरच्यांसमोर मांडता येतात. चूक झाली तर लपवायची गरज भासत नाही. निर्भीडपणे खरं बोलण्याची सवय होते. घरातील वातावरणात एक मोकळेपणा येतो. परस्पर एकोप्याचे संबंध टिकून राहतात. आजूबाजूचे वातावरण मुलांना आधार देणारे असेल तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो. हेच problem solving कौशल्य मुलांना बाहेरच्या जगात वावरताना उपयोगी पडते.

 

आता समस्या सोडवायची सर्वसाधारण पद्धत/रीत समजून घेऊया. सर्वप्रथम प्रश्नाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणे आवश्यक असते.



 - प्रश्नाशी संबंधित असलेल्या लोकांचे फायदे, त्यांनी उत्तरादाखल शोधलेले पर्याय आणि त्यांचा परिणाम एकदा तपासून पाहायला हवा.

- एकदा पर्याय निवडला की हाच पर्याय सर्वात फायदेशीर आहे ना याची खात्री करायला हवी. याचे कारण असे की कधीकधी उत्तर सापडेपर्यंत काळ/वेळ/परिस्थिती बदललेली असते. यावर आपला ताबा असेलच याची शाश्वती नसते.

- उद्या पाहू!!  Procrastination ची सवय नको. प्रश्न समोर असेल तर त्याचे निराकरण वेळ न दवडता करणे जास्त श्रेयस्कर. नाहीतर प्रश्न चिघळत जाऊन गंभीर होऊ लागतो.

- काही प्रश्न असे असतात, ज्यांची उत्तरं शोधायची नसतात. परिस्थिती आहे तशी स्वीकारायची एवढेच आपल्या हातात असते. तेच शहाणपणाचे ठरते. हेच पर्यायाने अशा प्रश्नाचे उत्तर असते.

 आपण उत्तर शोधू शकतो. प्रश्नांवर मात करू शकतो, याचे समाधान मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. दुसऱ्यांकडून चार गोष्टी जाणून घ्यायला कधी कधी हरकत नसते. त्यामुळे चार नव्या गोष्टींचे आकलन (New Learning) होते. नवीन, वेगवेगळे सुचणारे (Creative Solutions) पर्याय. प्रश्नाचे उत्तर सापडल्यामुळे चिंता/काळजीमुक्त होता येते. मानसिक आणि शरीरिक ताण तणाव कमी होतात. नवनवीन आव्हानं स्वीकारण्याची उमेद येते. संपूर्ण व्यक्तिमत्व विकसित व्हायला मदत होते. पुष्कळ प्रश्न एकदम उपस्थित झाले तर परिस्थितीला प्राधान्य देऊन ते सोडविता येतात.

त्यामुळे आनंदी जगण्याचा महत्वाचा मंत्र Living for today, here and now (आज मध्ये जगायचे) आणि आपल्या शक्ती, बुद्धीला योग्य वाटेल/पटेल ते करायचे. समस्या समोर आली तर पळ न काढता धीराने सामोरे जायचे….

 

पुढील टप्पा Effective Communication -- बोलणे की ऐकणे........


डॉ.पूर्वा रानडे 




No comments:

Post a Comment