Effective
Communication म्हणजेच आपले विचार, भावना यांचा शब्द किंवा देहबोलीच्या माध्यमातून साधलेला प्रभावी किंवा परिणामकारक संवाद.
हा संवादाचा प्रवास बहुतेक वेळा इतरांशी पण काही वेळा तो स्वतःशी
सुद्धा असू शकतो. जर तो अपेक्षित परिणाम साधणारा आणि प्रभावी असेल तर दुधात
साखर!!! एक महत्वाचे म्हणजे ऐकणे हे ही यात सुप्त/लपलेले
आहे.
तुम्ही तुमच्या वागण्या/बोलण्यातुन
व्यक्त होता. प्रत्येक वेळी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख पटवणारे हे महत्वाचे जीवन कौशल्य. 'संवाद' हा वेगवेगळ्या
स्तरांवर वेगवेगळा असतो. आपले, तसेच दुसऱ्याचे वय, भाषा, एकमेकांशी नाते आणि परिस्थिती याचे भान असणे ही कानाला खडा
लावण्याइतकी महत्वाची गोष्ट. मनात उमटलेली भावना, आणि
व्यक्त केलेला विचार यात पारदर्शकता असली तर आपोआप एकमेकांमधील विश्वास वाढतो. जर तुमचे बोलणे आणि वागणे यात तफावत असेल तर
किंवा ताळमेळ नसेल तर इतरांचा मिळवलेला विश्वास गमवायला वेळ लागत नाही. प्रामुख्याने
मुलांशी बोलताना ह्याची काळजी फार काटेकोरपणे घेतली पाहिजे. कारण मुले तुमचे बोलणे ऐकत असतात. तुमचे वागणे बघत असतात. या सगळ्यातून त्यांचे व्यक्तिमत्व घडत असते.
भांडण हा सुद्धा एक संवाद असतो. 'कोण बरोबर/कोण चूक' ह्यावर वाद
घालण्याऐवजी 'काय बरोबर आहे' त्यावर
चर्चा होणे महत्वाचे
असते. मूळ मुद्दा विचारात घेऊन ही चर्चा व्हायला हवी. मात्र अन्याय, खोटा आरोप, abuse निमूटपणे सहन न करता, अगदी प्रसंगी आरडा ओरडा
करुनसुद्धा त्वरित निकालात काढायला हवा. वादावादीत वेगवेगळी मते ही समोर येतील. कधीकधी आपल्या क्षमता व मर्यादा ओळखून नम्रतापूर्वक नकार ही देण्याचे कौशल्य वेळ
पडली तर वापरावे लागते.
एखादा मितभाषी असेल, आपली चूक नसताना बोलणे सहन करत असला, तर लोक तुम्हाला
सहनशील न मानता गृहीत धरतील. याला काहीही बोला चालते असा ग्रह निर्माण होईल. अशा वेळी मनाचा हिय्या
/धाडस करून मुद्दा/ प्रश्न सोडवता आला पाहिजे. मनात सकारात्मक किंवा नकारात्मक गोष्टी साठल्या तर
कालांतराने त्याचे ओझे तयार होते. ते व्यक्त करून उतरवायला हवे. कौतुक करताना
कुठेही शब्दांची/भावनांची काटकसर करू नये. समजा आपल्या हातून कळत नकळत चूक झाली असली तर तितक्याच
प्रांजळपणे ती कबुल करता आली पाहिजे. एवढे धाडसही दाखवता आले पाहिजे. एखादा सल असेल तरी तो ही योग्य पद्धतीने सांगता आला पाहिजे. म्हणजे
तुम्हाला guilt free किंवा 'तणावमुक्त' आणि 'आज आणि आत्ता'मध्ये म्हणजेच Here and Now असे जगता येते.
ही कला अवगत करण्याचे तंत्र आणि मंत्र
पूर्वतयारी :-- आपल्याला नेमके काय म्हणायचे आहे याची आधी स्वतःशी खात्री करून घ्यायची. मग मोजक्या पण योग्य शब्दाची निवड करुन, त्याला साजेसा/अनुरूप असा स्वर, बोलण्याची लय, आणि मुद्दा स्पष्टपणे मांडण्याची पद्धत यांचा ताळमेळ जमवायचा. समोरच्या व्यक्तीची जी ओळख असेल त्याने हाक मारून लक्ष वेधायचे. आपले म्हणणे थोडक्यात आणि मोजक्या शब्दात मुद्देसूद मांडायचे. नंतर एक क्षण pause घ्यायचा आणि जो अर्थ अपेक्षित आहे तोच पोचला आहे ना? याची खात्री करायची. नाहीतर मग 'मला असे म्हणायचे नव्हते' 'मला असं वाटलं' यामुळे नकळत होणारे गैरसमज/गल्लत, गोंधळ टळतात.
ज्याच्याशी आपण संवाद साधत आहोत त्याची आकलनशक्ती
कितपत आहे याचा अंदाज घेतला पाहिजे. मगच त्या अनुषंगाने सूचना करायला हव्यात. एकाच वेळी अनेक कामे सांगितली तर
ती सफाईने पार पाडणे, (Multi-tasking) सगळ्यांना शक्य असते
असे नाही. काम नीट आणि वेळेवर न झाल्यामुळे त्रास होऊ शकतो.
समोरचा बोलत असताना मध्ये मध्ये बोलणे ,पूर्ण बोलणे लक्षपूर्वक न ऐकणे, वा अर्धवट ऐकणे, समजले नसताना 'हो हो करणे' ह्यामुळे कामात चुका होण्याची शक्यता
वाढते. ऐकणे ही जबाबदारी डोळसपणे पाळणे गरजेचे आहे. आपल्याला विचारले नसेल तर बोलण्याचा मोह
टाळावा. अगदी तशीच आवश्यकता वाटल्यास, आधी 'मी काही सांगू का?' अशी अनौपचारिक अनुमती मागावी.
'शब्द हे शस्त्र आहे. जपून वापरा.' असे उगीच म्हटलेले नाही.
बोलण्या/वागण्या मागचा विचार, हेतू/उद्देश काय आहे हे
प्रयत्नपूर्वक, जाणीवपूर्वक अभ्यासावे लागते. मुलांना 'तू
मूर्ख आहेस', 'तुला काही जमत/समजत नाही', 'वेंधळा आहेस. नेहमी चुका करतोस' अशी
वाक्ये वारंवार ऐकवल्याने ती कुठेतरी त्यांच्या व्यक्तिमत्वावर खोलवर
परिणाम/आघात करतात. या ऐवजी त्यांचे काय चुकले आणि त्याचे परिणाम काय होण्याची शक्यता आहे हे समजावले पाहिजे. त्यावर उपाय
कसा शोधायचा या बाबत मार्गदर्शन केले पाहिजे. लहान मुलांचा आयुष्याचा अनुभव कमी
असतो त्यामुळे त्यांना अशा
मार्गदर्शनाची गरज असते.
'बोलणे' आणि 'ऐकणे' या दोन्ही शक्तींना कमी लेखू नका. हे तंत्र आत्मसात करायचे असेल तर पूर्वग्रहदूषित
दृष्टिकोन बाजूला सारा. दुसऱ्याच्या वतीने तुम्ही विचार करू नका. मग परस्पर संबंध नुसते
सलोख्याचे न राहता दृढ होतील. तुम्ही फक्त व्यक्त व्हा. आणि तसेही लोकशाहीत
प्रत्येकाला आपले मत / विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहेच की!!!!
असो या विषयाची व्याप्ती इतकी मोठी आहे की जमेल तितके सोपे करून थोडक्यात सांगण्याचा माझा हा अल्पसा प्रयत्न.समजून घ्याल अशी आशा आहे.
Interpersonal relations विषयी
जाणून घेऊ पुढील भागात ----
डॉ.पूर्वा रानडे
No comments:
Post a Comment