येणारे वर्ष मागील वर्षापेक्षा अधिक सुख समाधानाचे असो अशा शुभेच्छा आपण नववर्षदिनी साऱ्यांना देत असतो. मी देखील अशाच शुभेच्छा कट्टा वाचकांना गेल्या महिन्यातील मधले पान लिहिताना दिल्या होत्या. पण आज 'मधले पान' लिहिताना मी कोणत्या चांगल्या गोष्टींवर लिहू असा प्रश्न पडला आहे.
कोरोना-ओमायक्रोनची लाट थोडी ओसरताना दिसत असली तरी पूर्ण भीती गेलेली नाही. टांगती तलवार डोक्यावर आहेच. आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन आपण नुकताच साजरा केला. पण त्यावेळीही कोणत्याही देशाचे राष्ट्रप्रमुख उपस्थित राहू शकले नाहीत.
सध्या देशांत निवडणुकांचे वारे वाहत असले तरीही प्रचारावर काही निर्बंध घालण्यात
आले आहेत. लोकांनी एकत्र येऊन कोरोना प्रसार होऊ नये ह्यासाठीच हे निर्बंध आहेत हे
स्पष्ट आहे. १ फेब्रुवारीला आपला अर्थसंकल्प सादर होईल. देशातील/जगातील आर्थिक
स्थिती पूर्ववत होण्यासाठी अजून किती काळ लागेल हा कळीचा मुद्दा आहे.
युरोपात अनेक ठिकाणी लॉकडाऊन लावावा लागत आहे. पण त्याहूनही ह्या खंडावर
युद्धाचे ढग जमले आहेत ही अधिक चिंतेची बाब आहे. युक्रेन (म्हणजे युरोपातील देश
आणि अमेरिका) आणि रशिया ह्या देशातील संबंध ताणले गेले आहेत. सध्या युरोपात थंडीचा
कडाका असतो. आता या दरम्यान युद्ध सुरु होणार का ह्याची काळजी साऱ्या जगालाच लागून
राहिली आहे. त्यात नेहमीप्रमाणेच आता 'कोणीही माघार घेणे' हा प्रतिष्ठेचा प्रश्न
बनणार आहे.
सध्या ऑस्ट्रेलियन ओपन ही टेनिस स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली आहे. नदाल २१ वे Grand Slam Title जिंकतो का ह्याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. पण ही स्पर्धा गाजली ती जोकोविचमुळे. त्याच्या लस विरोधामुळे शेवटी त्याला ह्या स्पर्धेतून बाहेर जावे लागले. जनमताच्या प्रभावामुळे ऑस्ट्रेलियन सरकारलाही माघार घेऊन जोकोविचला परत पाठवावे लागले. कोणीही व्यक्ती आपल्या क्षेत्रात कितीही मोठी असली तरीही संस्थेपेक्षा ती मोठी नसते.
सांघिक खेळात तर एका खेळाडूपेक्षा सर्व संघाचे योगदान महत्वाचे असते. एकमेकांच्या
साथीनेच ह्या खेळात अत्युच्च शिखरे गाठता येतात. आता राहुल द्रविड सारखा संयमी आणि
विचारी प्रशिक्षक असल्याने भारतीय संघातील साऱ्या खेळाडूंचा फायदाच होईल यात शंका
नाही.
ह्या महिन्यात अनेक महत्वाच्या व्यक्तींचे निधन झाले. बिरजू महाराज, सिंधुताई
सपकाळ, अनिल अवचट ही काही प्रमुख नावे. ह्यांच्या पैकी प्रत्येकाचे त्यांच्या
क्षेत्रातले कर्तृत्व अफाट आहे. या सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
बिरजू महाराज |
अनिल अवचट |
सिंधुताई सपकाळ |
असो. आज इतकेच.
स्नेहा केतकर
No comments:
Post a Comment