मधले पान

खरे तर ह्या महिन्यातील 'मधले पान' या सदराची सुरुवात मला अनेक चांगल्या बातम्यांनी करायची होती. फेब्रुवारीत आपल्या सर्वांचे आवडते लेखक, कवी कुसुमाग्रज यांचा वाढदिवस असतो. तो दिवस, २७ फेब्रुवारी आपण 'मराठी दिन' म्हणूनही साजरा करत असतो. कविश्रेष्ठ श्री. वि.वा. शिरवाडकरांनी साहित्यिकांना मराठी साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल 'जनस्थान पुरस्कार' ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यास सुरूवात केली. हा मराठी साहित्यातील मानाचा पुरस्कार या वर्षी ज्येष्ठ कवी, कादंबरीकार व समीक्षक श्री वसंत आबाजी डहाके यांना देण्यात येणार असल्याचे जाहीर झाले. एका सुयोग्य व्यक्तीला हा सन्मान मिळाला ह्याचा साहित्य रसिकांना खचितच आनंद झाला असणार. 
vasant Dahake
संसदेत सादर झालेला अर्थसंकल्प, यावरील उलट-सुलट चर्चा, सुप्रसिद्ध अभिनेते रमेश भाटकर यांचे कर्करोगाने झालेले निधन, ते ही जागतिक कर्करोग दिनीच !!! असे अनेक विषय ' मधले पान' लिहिण्यासाठी मनात नोंदले जात होते. NGMA मध्ये झालेले किंवा ' न झालेले' अमोल पालेकरांचे भाषण, त्यावरच्या प्रतिक्रिया, प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात होत असलेले नाट्य संमेलन,
Premanand Gajvi

"प्रेम कुणावरही करावे" ह्या कुसुमाग्रजांच्या कवितेचे स्मरण करत आलेला 'व्हॅलेंटाईन डे' अशा अनेक विषयांवर काहीतरी लिहू असे मनात ठरवत असतानाच, पुलवामाची घटना घडली.
एखादे चित्र किंवा रांगोळी काढत असतानाच एकदम त्यावर गडद निळा किंवा काळा रंग पसरावा तसे झाले. पुलवामा येथील दहशतवादी कृत्यात चाळीसहून अधिक जवान शहीद झाले. सारा देश काही काळापुरता मुकाच झाला जणू!!! या घटनेवर आधी विश्वासच बसेना. आणि मग मात्र देशांत दु:खाची, संतापाची लाटच उसळली.
या अशा दहशतवादी कृत्याचा सर्वांनीच तीव्र शब्दांत निषेध केला. पण एक प्रकारचा हताश भाव ही सगळ्यांच्या मनात होता. हे असे किती दिवस चालणार हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात होता. मग ह्या वांझोट्या संतापातून प्रक्षोभक प्रतिक्रियांची राळच उठली. सगळ्यांच्याच हातात फोन असल्याने अशा बेभान संदेशांची देवाणघेवाण सुरु झाली. मात्र काही सुजाण, सजग नागरिकांनी याही वेळी समाजमनाला थाऱ्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले हे विशेष. प्रक्षोभक प्रतिक्रिया दिल्यानेच आपले देशावरचे, आपल्या जवानांवरचे प्रेम सिद्ध होते असे नाही. अक्षयकुमार सारख्या अभिनेत्याने शहिदांच्या कुटुंबासाठी निधी जमवला.
पुलवामा नंतरही दुर्दैवाने विमान दुर्घटनेत दोन वैमानिक शहीद झाले.बंगलोर येथे सुरु असलेल्या AERO SHOW मध्ये ही अशा दुर्दैवी घटना घडत आहेत.

P V Sindhu first woman to fly a sortie in LCA Tejas
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा  निषेध करून मी हा लेख संपवणार होते पण आजच भारताच्या वैमानिकांनी  जैश-ए-महम्मदच्या बालाकोट येथील दहशतवादी ठाण्यावर हल्ला करून तेथे असलेले सर्व दहशतवादी ठार मारले अशी बातमी आली.

सगळया भारतीयांचा स्वतःच्या कानांवर प्रथम विश्वासच बसला नाही. मग मात्र सगळ्यांनाच अभिमान वाटत राहिला दिवसभर!!!!
३००/४०० दहशतवादी ठार मारल्याने हा प्रश्न सुटणार नाही. पण ह्या घातपाती कृत्यांना आळा बसेल अशी आशा करूया. ह्या कृत्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय जगतातही उठतीलच. पण भारताच्या ह्या भूमिकेमुळे इतर देशांचेही ह्या दहशतवादाच्या विरोधात लढण्याचे बळ वाढेल अशी आशा आहे. भारतीय वैमानिकाची बिनशर्त सुटकाही पाकिस्तानला करावी लागली.   
अशा दहशतवादी घटना जगात कुठेच घडू नयेत हीच खरेतर प्रार्थना!!! शहीदांना कट्टा टीमतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आणि आपल्या शूर सैनिकांना मानाचा मुजरा!!!!!!!

स्नेहा केतकर

No comments:

Post a Comment