गेल्या महिन्यात सुरु झालेले युक्रेन आणि रशिया यातील युद्ध अजूनही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय समुदायात रशिया विरोधी वातावरण आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत रशिया विरोधी ठरावही मांडले गेले. भारताने ह्या मतदानात भाग घेतला नाही. कोण जिंकणार, कोण हरणार....रशियाला वाटत होते तितक्या सहज त्याला युक्रेन ताब्यात घेता येत नाही....इ.इ. मते आपण रोज पेपर मधून, टीव्ही वरून पाहत आहोत. यात तथ्य असले तरीही युक्रेनची झालेली धूळधाण पाहवत नाही.
बॉम्बवर्षावात
होणारे सामान्य लोकांचे हाल पाहून जगभर युक्रेनविषयी सहानुभूतीची लाट निर्माण झाली
आहे. मात्र युक्रेनने नाटो प्रवेशाचा आग्रह सोडून रशियाच्या हमीने तटस्थ राहण्याची
तयारी दर्शविली असती तर हे युद्ध टळले असते.
सोविएत रशियाने
अशी हमी दुसऱ्या महायुद्धानंतर फिनलंड, स्वीडन व ऑस्ट्रियाला
दिली होती व ती शेवटपर्यंत पाळली होती. अमेरिकेच्या कच्छपी लागून युक्रेनच्या
नेत्यांनी नाटो प्रवेशाचा किवा युरोपीय युनियनशी संलग्न होण्याचा हट्ट धरला. पाश्चात्य
देश आपल्या सीमेवर शस्त्रास्त्र आणून उभी करतील ही भीती रशियाला वाटत होती. त्यामुळे
रशियाला आक्रमणाशिवाय दुसरा पर्याय शिल्लक राहिला नाही. रशियात मोठ्या प्रमाणात निर्माण
होणारा नैसर्गिक वायू व पेट्रोलचे ग्राहक प्रामुख्याने युरोपीय देश आहेत. यामुळे
साहजिकच रशियाने युरोपात आपले व्यापारी वर्चस्व निर्माण केले होते. त्यामुळे
युरोपातील अमेरिकन वर्चस्वाला शह मिळत होता.
रशियाच्या
नैसर्गिक वायूच्या बहुसंख्य पाइपलाइन युक्रेनमधून पश्चिम युरोपात जातात, त्यामुळे युक्रेन रशियासाठी महत्त्वाचा देश आहे. रशियाच्या या
पाइपलाइनमुळे युक्रेनलाही मोठा महसूल मिळतो व त्यामुळे युक्रेनची अर्थव्यवस्थाही सुधारलेली
आहे. त्यामुळेच युक्रेनने नाटो प्रवेशाचा आग्रह सोडून तटस्थ रहावे असे प्रयत्न रशिया
करीत होता. या युद्धाला असे अनेक कंगोरे आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात
कोणाचीही बाजू घेणे इतके सोपे नसते. मात्र पुढील महायुद्ध आता युरोपात न होता आशियात
होईल असे सांगणारे तमाम राजकीय ज्योतिषी संभ्रमात पडले आहेत. त्याचप्रमाणे कोणतेही
युद्ध सुरु करणे हे जितके सोपे असते तितके ते संपवणे सोपे नसते. किंवा ते एकाच
राष्ट्राच्या हातातही नसते. या युद्धाबाबतीत ही असेच म्हणता येईल. मानवतेच्या
दृष्टीकोनातून हे युद्ध लवकर थांबावे हीच इच्छा.....
नुकतेच देशांत
पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल लागले. गोवा, उत्तराखंड आणि पंजाब मध्ये
सत्तांतर होईल असे वाटत असताना फक्त पंजाबमध्ये सत्तांतर झाले. ह्या सत्तांतराचे
खूप मोठे महत्व आहे. प्रथमच या राज्यांत घराणेशाहीचा मोठा पराभव झालेला पाहायला
मिळाला. आतापर्यंत काँग्रेस असो वा अकाली दल या दोन्ही पक्षांवर काही घराणीच राज्य
करीत होती. उदा: अकाली दलावर बादल कुटुंबियांचे वर्चस्व होते. या राज्यांत बादल,
कैरों, पतियाळा, जाखर, ब्रार, मजिठिया ही कुटुंबे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे
नेतृत्व करीत होती आणि आलटून पालटून सत्तेत येत होती. मात्र ह्यावेळी पंजाबच्या
जनतेने या सर्व घराण्यांना नाकारून आम आदमी पक्षाला मोठे बहुमत दिले आहे. 'Drugs, dynasty आणि Dera यांच्या विळख्यात
सापडलेल्या पंजाबने Dynasty ला नाकारून मोठे पाऊल उचलले आहे. आम आदमी पक्ष या
संधीचा फायदा घेऊन लोक कल्याणाच्या योजना राबवेल ही आशा आहे.
गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे भाजपने सत्ता राखली. तेथे
आधीच्याच मुख्यमंत्र्यांना पुनः शपथ देण्यात आली. भाजपने सत्ता राखता येऊ शकते,
चांगला कारभार करून, लोकहिताची कामे करून परत निवडणुकीत जिंकता येते हे आता
सप्रमाण सिद्ध केले आहे. हा नवा पायंडा सर्व पक्षांनी विचारात घ्यायला हवा.
पंजाबमध्ये 'आप' पक्षाला हे करून दाखवायला हवे. नुसते मतांचे राजकारण करून भागणार
नाही, जनतेला आपण उत्तर द्यायला हवे हा मोठा धडा सर्वांसाठी आहे. लोकशाहीत ये
जो पब्लिक है वो सब जानती है, आणि अब्राहम लिंकनने म्हटल्याप्रमाणे you cannot
fool all the people, all the time हेच खरे.
या सर्व राज्यांत निवडणुका शांतपणे पार पडल्या असतानाच तिकडे बंगालमध्ये राजकीय हिंसाचारात राजकारणाशी संबंधित नसलेल्या काही महिला आणि लहान मुलांचीही हत्या झाली ही खेदाची बाब आहे. बोगतुई खेडय़ातील सुमारे डझनभर घरे पहाटे पेट्रोल बॉम्ब फेकून पेटवून देण्यात आल्यानंतर त्या आगीत २ मुलांसह आठजण जळून मरण पावले होते.
या
घटनेच्या तपासाकरता पश्चिम बंगाल सरकारने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले
आहे. मात्र यातून
काही निष्पन्न होईल ही आशा धूसर आहे. आधीचे कम्युनिस्ट सरकार आणि आताचे तृणमूल
सरकार या दोन्ही राजवटीत राजकीय हिंसाचार चालूच आहे. भद्र लोकांचे हे अभद्र वर्तन
बंगालच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारे आहे.
शेजारच्या पाकिस्तानात इमरान खानवर अविश्वासाचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. इमरान खान यांना पायउतार व्हावे लागेल अशी चिन्हे आहेत. अविश्वास ठरावावर ३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
शेजारच्या श्रीलंकेत प्रचंड प्रमाणात औषधे, गॅस यांची टंचाई जाणवत आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम साऱ्या जगभर हळूहळू जाणवायला सुरवात झाली आहे.
या महिन्यात दोन आणखी महत्वाच्या घडामोडी घडल्या.
शेन वॅार्न या क्रिकेटपटूचे ५२ व्या वर्षी Heart Attack येऊन अकाली निधन झाले. सर्व क्रिकेटप्रेमी या बातमीमुळे हळहळले. दुसरी बातमी म्हणजे जगातील अव्वल क्रमांकाची महिला टेनिसपटू अॅशले बार्टी (Ashleigh Barty) हिने वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कारकिर्दीच्या शिखरावर असताना अॅशले बार्टीने ही घोषणा केली आहे. तिने या वर्षी जानेवारीत ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकून इतिहास रचला होता.
गेल्या तीन वर्षांत तिने आपल्या कारकिर्दीतील तीन ऐतिहासिक ग्रँडस्लॅम
जिंकले आहेत. सर्वप्रथम तिने २०१९ मध्ये फ्रेंच ओपन, त्यानंतर २०२१ मध्ये विम्बल्डन
आणि २०२२ ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले होते.
तिच्या पुढील संकल्पांसाठी शुभेच्छा!
सध्या
सगळीकडे The Kashmir Files या सिनेमाची चर्चा चालू आहे. यावर अनेक मतमतांतरे असली,
तरी देखील ही घटना जी दडपण्यात आली होती, ती घटना उजेडात आली हे महत्वाचे. त्या
दृष्टीने या सिनेमाकडे पाहायला हवे.
साहित्य
जगात अजून एक दखल घेण्यासारखी घटना म्हणजे गीतांजली श्री या लेखिकेची रेत
समाधी ही कादंबरी बुकर पारितोषिकासाठी विचारात घेतली जात आहे. या कादंबरीचा Tomb
of Sand या नावाने Daisy Rockwell
या अमेरिकन लेखिकेने अनुवाद केला आहे. बुकर पारितोषिकासाठी विचारात घेतली गेलेली हिंदी
भाषेतील ही पहिली कादंबरी आहे. साहित्यप्रेमींनी जरूर ही कादंबरी नजरेखालून
घालावी.
गेल्या
महिन्यात मधले पान दिले नाही. लता मंगेशकर यांच्या जाण्याने आपल्या घरातील हा दैवी
सूर हरपल्याची भावना सगळ्यांचीच झाली होती. लताचे जाणे ही बातमी नसून जवळची
व्यक्ती गेल्याची दुःखद घटना होती.
असो.
आज इथेच थांबते.
स्नेहा
केतकर
No comments:
Post a Comment