कट्ट्यात 'मधले पान ' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक
असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.
एप्रिल संपता
संपता, देशातील सर्वच नागरिकांची स्थिती एकूण कोरोना महामारीमुळे बिकट झालेली
दिसतेय. महाराष्ट्रातील गंभीर असलेली स्थिती सावरण्याची चिन्हे दिसत आहेत. पण
दिल्ली, बंगलोर, गोवा येथे पुन्हा लॉकडाऊन लावण्यात येतो आहे. नुकत्याच पार
पडलेल्या कुंभमेळ्यामुळे, पाच राज्यांतील निवडणुकांमुळे कोरोना वाढायला मदतच झाली
असा ओरडा सुरु आहे. त्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीर यांचा तुटवडा आहे. मागील वेळेपेक्षा
कोरोनाची ही दुसरी लाट अधिक जोरात पसरत आहे. लसीकरण सुरु झाले आहे. पण एकूणच ह्या
गोंधळात चूक कोणाची ह्यावर तावातावाने वाद सुरु आहे. ज्या राज्यांत भाजप सरकारे
नाहीत, तिथे केंद्र सरकारवर जहरी टीका होत आहे. ह्या सगळया गोंधळात दिलासा देणारी
गोष्ट म्हणजे अनेक देशांकडून भारताकडे मदतीचा ओघ चालू झाला आहे. आज ना उद्या आपण
ही स्थिती सावरून घेऊ अशी आता आशा वाटत आहे.
यातील प्रत्येक
राज्यावर विश्लेषण करता येण्यासारखे काही मुद्दे असले तरीही सगळ्यांचे लक्ष प.बंगालच्या निकालाकडे लागले आहे. ममता दीदींचा आक्रस्ताळेपणा,
तेथील निवडणुकांचा आजपर्यंतचा हिंसक इतिहास आणि भाजपने लावलेला जोर - ह्या मुळे ही
निवडणूक गाजत आहे. १९६० पासून प.बंगालमधल्या निवडणुकांत राजकीय हत्या होत आल्या
आहेत. १९७१च्या निवडणुकीत तर मतदान करायला नुसते मतदारच घाबरत होते असे नाही, तर
बूथ व्यवस्थापकही भीत होते. ह्या सरकारी नोकरांना अनेक आमिषे दाखवावी लागली. १९७७
मध्ये तिथे कम्युनिस्ट निवडून आले. तेव्हापासून २०११ पर्यंत तिथे कम्युनिस्टच
सत्तेत होते. कम्युनिस्टांना हरवून दीदी सत्तेत आल्या. पण तिथल्या ह्या हिंसेचे
कारण काय?
बंगालमध्ये आधी जमीनदार वर्गाकडे सत्ता, जमिनी होत्या. हे चित्र बदलून तिथे
जमीन सुधारणा कायदे करण्यात आले. पंचायती राज्य संस्था उभी करण्यात यश आले. पण
ह्या सुधारणा आपल्या पक्षाने केल्या असे सत्तेत असलेला पक्ष सतत सांगत असे.
दुसऱ्या पार्टीला support करणे हा गुन्हा मानला जाऊ लागला. सरकारचा पैसा
पार्टीच्या समर्थकांना दिला जाऊ लागला. जमिनदारी नष्ट झाली पण पार्टीचे पदाधिकारी
नवे जमिनदार वा सरंजामदार बनले. त्यामुळे मग निवडणुकीत दोन राजकीय पक्षांत
हाणामाऱ्या होऊ लागल्या. सत्तेत असेपर्यंत कम्युनिस्टांची पैशाची बाजू मजबूत होती.
प्रशासन, पोलीस त्यांच्या हातात होते. बंगाली मतदारांचे दुर्दैव म्हणजे दीदी
सत्तेत आली आणि तिनेही मागचे पाढेच गिरवले.
त्यामुळेच कोरोनाची भीती असूनही मोठ्या संख्येने मतदार मतदान करत आहेत. भाजपने
तृणमूल काँग्रेस समोर मोठे आव्हान उभे केले आहे. निवडणूक कोण जिंकेल ह्यावर
छातीठोकपणे कोणीच काही सांगू शकत नाही. पण ह्या सगळया दहशतीच्या पार्श्वभूमीमुळे
बंगालमधील निवडणूक ८ फेऱ्यांत घ्यावी लागली. निवडणूक आयोगालाही नावे ठेवणे
सुरु आहे. पण शेषन यांनी घालून दिलेल्या पायंड्यामुळे निदान बऱ्याच प्रमाणात
शिस्तीत निवडणुका होत आहेत.
देशांतील वातावरण असे निवडणूक आणि कोरोना ह्याभोवती फिरते आहे. IPL सामने सुरु
झाले आहेत. पण काही खेळाडू त्यातून आपला सहभाग काढून घेत आहेत. IPL ही तर फार छोटी
स्पर्धा आहे. पण जपान मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांवर अजूनही सावट आहे. गेल्या
वर्षी २०२०मध्ये होणाऱ्या ह्या स्पर्धा रद्द करून पुढील वर्षी म्हणजे २०२१ मध्ये
घ्यायच्या असे ठरवले गेले. पण अजूनही ह्या स्पर्धा होतील की नाही ह्यावर स्पष्टता
नाही. यजमान जपान मधील अनेक शहरांत ह्याविषयी दुमत आहे. जपानने ह्या स्पर्धांच्या
आयोजनावर आतापर्यंत ६ बिलियन डॉलर्स खर्च केले आहेत. हल्ली खेळांच्या स्पर्धांत
मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहारही असतो. एकूणच ह्या सर्व गणिताचे उत्तर देणे
सध्या कठीण दिसते आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणातही अनेक घडामोडी घडत आहेत. तुरुंगात राहूनही अलेक्सी
नावाल्नी यांचा पुतीनविरुद्ध लढा सुरु आहे. त्याला आणि त्याच्या ह्या लढ्याला चिरडून
टाकण्याचे शर्थीचे प्रयत्न रशियन सरकार करत आहे.
मिग्युएल दियाझ कानेल |
अफगाणिस्तानातून अमेरिका आपले सैन्य काढून घेणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे. ह्या घटनेचा परिणाम आजूबाजूच्या देशांवर होणार हे स्पष्ट आहे. चाबहार बंदरातून अफगाणिस्तानमार्गे मध्य आशियाला जोडले जाण्याच्या भारताच्या भूराजकीय-व्यापारी आकांक्षांना त्यामुळे खीळ बसेल यात शंका नाही. अनेक प्रश्न उपस्थित करून अमेरिका ह्या भागातून निरोप घेत आहे. भारताला ह्या जटील प्रश्नांची उत्तरे सोडविण्यावाचून गत्यंतर नाही हेच खरे.
युएसएस जॉन पॉल जोन्स |
लक्षद्वीप
बेटांजवळ भारताच्या सागरी अनन्य आर्थिक क्षेत्रात (एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन) ‘यूएसएस जॉन पॉल जोन्स’ या क्षेपणास्त्र-विनाशिकेने
भारताच्या संमतीविना कवायती करणे, ही बाब तशी गंभीरच.
त्याहूनही गंभीर बाब म्हणजे- आपण कोणताही नियमभंग केलेला नाही, हा भारताचा
आक्षेपच मुळात अमेरिकेला मान्य नाही.
एकूणच भारताच्या मुत्सद्देगिरीला आवाहन देणाऱ्या ह्या घटना आहेत.
सुमित्रा भावे |
ह्या महिन्यात अनेक नामवंत लोकांचे निधन झाले. चित्रपट सृष्टीतील शशिकला आणि प्रसिद्ध
चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे वृद्धापकाळामुळे दुःखद निधन झाले. त्यांचा चित्रपट
कधी माणूसपणाचा अर्थ शिकवणारा, कधी सामाजिक भान व्यक्त करणारा, तर कधी आजारांवर बोलणारा. कधी माहितीपट, कधी लघुपट,
तर कधी थेट पूर्ण लांबीचा चित्रपट. या साऱ्यातून व्यक्त होत राहाते
ती समाजाचे खोल भान असणारी आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडणारी विलक्षण
संवेदनशील मनाची स्त्री!
राजन मिश्रा |
शास्त्रीय संगीताचे उपासक गायक राजन मिश्रा यांचे कोरोनाने निधन झाले. राजन – साजन
मिश्रा यांनी गेल्या काही दशकांत केलेल्या सहगानाने
देशभरातीलच नव्हे, तर जगभरातील असंख्य रसिकांना संगीताचा अपूर्व
आनंद दिला. राजन मिश्रा यांच्याकडे सरकारने पद्मभूषण
पुरस्कारासाठी विचारणा केली, तेव्हा त्यांनी आपण एकटे हा पुरस्कार घेणार
नाही. सरकारला द्यायचा असेल, तर हा मानाचा किताब दोघांनाही
द्यायला हवा, अशी अट घातली. ती सरकारनेही मान्य केली.
राइस महादेवप्पा |
राइस महादेवप्पा यांचे खरे नाव मदाप्पा महादेवप्पा. तांदळावर केलेल्या संशोधनामुळे
त्यांना याच नावाने लोक ओळखत! कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारे तांदळाचे संकरित
वाण त्यांनी तयार केले होते. तांदळाचे एकरी
उत्पादन कमी पाणी वापरून वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, हे त्यांनी दाखवून दिले. संकरित वाणांमुळे बरीच जमीन व अतिरिक्त पाणी
इतर पिकांसाठी वापरता येईल हे त्यांनी दाखवून दिले.
भारतीय नेमबाजांची पहिली पिढी घडवणारे संजय चक्रवर्ती आणि मराठवाड्यासारख्या
भागात गरीब, शोषित वर्गासाठी उच्च शिक्षणाच्या संधी तुलनेने उपलब्ध करून देणाऱ्या, शिक्षण आणि पत्रकारिता ह्या दोन्ही क्षेत्रांत आपला ठसा
उमटवणाऱ्या फातिमा झकेरिया. ह्या सर्व वंदनीय व्यक्तींना आदरपूर्वक श्रद्धांजली.
आज इथेच थांबते.
स्नेहा केतकर
No comments:
Post a Comment