कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.
आज डिसेंबरच्या
शेवटच्या दिवशी मधले पान लिहिताना मनात संमिश्र भावना आहेत. गेले वर्षंभर आपण ह्या
सदरातून जगभर आणि प्रामुख्याने भारतात घडणाऱ्या घडामोडींचा आढावा घेतला. गेल्या
मार्चपासून कोरोना महामारी हाच मुख्यत्वे एक महत्वाचा बातम्यांचाही विषय ठरला. आता
ह्या वर्षअखेर कोरोनावर लस मिळणार अशी आशा वाटत असतानाच पुन्हा युरोप आणि अमेरिकेत
लॉकडाऊन करावा लागत आहे. कोरोनाच्याच नव्या विषाणुच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी
ही उपाययोजना करावी लागत आहे. आता लस मिळाली असली तरीही पुढच्या वर्षीही
सुरुवातीचे काही महिने कोरोना बातम्यात राहणार हे नक्की.
३१ डिसेंबर
२०२० पासून ब्रिटन हे युरोपीय समूहातून बाहेर पडणार आहे. स्वेच्छेने या समूहात
सामील झालेल्या ब्रिटनला ह्यातील काही अटी जाचक वाटत होत्या. ब्रेक्झिट वरील
बातम्या वाचत असताना अचानक मनात विचार आला, की इंग्लंडने शतकानुशतके वसाहती बनवून
तिथल्या लोकांवर राज्य केले. अर्थातच तेव्हा स्थानिक लोकांच्या अधिकारांची,
हक्कांची पायमल्ली करतच, संपत्तीची लूट करतच हे साम्राज्य उभे केले. आता मात्र
स्वतःच्या हक्कांसाठी युरोपीय समूह सोडण्याचा त्यांचा निर्णय योग्य आहे की अयोग्य
हे येणारा काळच ठरवेल. मुख्य म्हणजे त्यांनी स्वतःच्या हातांनीच बंद केलेली
युरोपची दारे परत उघडायची म्हटली तरीही उघडणार नाहीत हे ही तितकेच खरे आहे.
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच रणजितसिंह डिसले ह्यांना युनेस्को आणि लंडनमधील ‘वार्की फाऊंडेशन’
यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा पुरस्कार जाहीर झाला. सोलापूर येथील परितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत काम करणाऱ्या ह्या शिक्षकाने अभिनव पद्धतीने, नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत जे काम केले त्याला तोड नाही. ह्या ग्रामीण भागातही पालकांना मुलांच्या अभ्यासात सहभागी करण्याची त्यांची कामगिरी मोलाची आहे. मुले, पालक आणि शाळा ह्यांना जोडून घेत त्यांनी आपले काम केले. त्यांचे मनापासून अभिनंदन. आपल्या बक्षिसाच्या रकमेचा निम्मा भाग त्यांनी शेवटच्या फेरीत पोचलेल्या इतर शिक्षकांतही वाटून दिला. हा त्यांचा विचार खरोखरच प्रेरणा देणारा आहे.काँग्रेस, शिवसेना, मुंबईतील मेट्रो, शेतकरी आंदोलन हे मुद्दे ही सध्या देशांत गाजत आहेत. पण गेल्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी बातमी आली की डॉ.शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली. बाबा आमटे हे मोठे नाव. त्यांच्या नातीने असे करावे ही बातमी धक्कादायकच होती. आमटे परिवारात काही कुरबुरी होत्या असे वृत्तपत्रातून वाचले होते. पण त्यामुळे एखादी व्यक्ती स्वतःचा जीव घेईल असे वाटले नव्हते. एक अतिशय हुशार व्यक्ती, कर्तृत्वाचा आलेख चढता असताना असे काही करेल हे पटणे कठीण आहे. सत्ता, महत्वाकांक्षा ही जिवापेक्षा मोलाची आहे का असा प्रश्न यामुळे पडतो. आमटे कुटुंबियांनी अतिशय संयतपणे हा धक्का हाताळला असे म्हणावे लागेल. कोणत्याही तऱ्हेने माध्यमांना जवळ न करता, काहीही वक्तव्ये न देता 'धक्का बसला' अशीच सच्ची प्रतिक्रिया देऊन त्यांनी माध्यमांशी अंतर राखले.
सुशांत सिंह
राजपूत आणि डॉ.शीतल यांच्या आत्महत्यांनी एकूण मानसिक स्वास्थ्याबद्दल व्यापक
प्रश्न निर्माण झाले आहेत. ह्या दोन्ही व्यक्ती, हुशार, कर्तबगार आणि आपल्या
क्षेत्रांत यशस्वी होत्या. तरीही त्यांना जीवन संपवावेसे का वाटले असेल? हा खरा
प्रश्न आहे.
२०२० वर्ष संपताना २०११ ते २०२० हे दशकही संपत आहे. गेल्या दशकातील जागतिक जमाखर्चाचा आढावा अनेक विद्वान घेतीलच. पण तूर्तास कोरोना महामारीत भारतात तरी मृत्यूदर कमी आहेत ही चांगली गोष्ट आहे. ह्या यशाचे मानकरी व्हायला अनेकांना आवडेल आणि अनेक जण पुढेही येतील. पण ह्याचे श्रेय हे निर्विवादपणे भारतीय नागरिकांचे आहे असेच म्हणावे लागेल. अर्थात ह्याच वेळी कोरोनामुळे आपण अनेकांना गमावलेही आहे हे ही लक्षात ठेवणे महत्वाचे आहे.
२०२१ मध्ये कोरोनावर लस मिळून तिचे सर्व समाज थरांत वितरण होऊ दे हीच इच्छा.
कट्टा वाचकांना येत्या वर्षासाठी खूप खूप शुभेच्छा!!!!!!!!
स्नेहा केतकर
No comments:
Post a Comment