मधले पान

कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.

मे महिन्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. 'मधले पान' मध्ये त्यातील जास्तीत जास्त घटनांवर नजर टाकण्याचा प्रयत्न करूया.

२ मे ला निवडणुकांचे निकाल लागले. साधारणपणे अंदाजाप्रमाणेच हे निकाल लागले. प.बंगालमध्ये भाजपने मोठी मजल मारली. पण सत्ता मिळवण्यासाठी लागणारी हनुमान उडी मात्र मारता आली नाही. इतर सर्व ठिकाणी नेहमीप्रमाणे सत्तांतर झाले आणि शपथविधी झाले. ममता दिदीचा पायही बरा झालेला दिसला. पण बंगालमध्ये निकालानंतर प्रचंड हिंसाचार झाला. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झाली. त्यांची घरे उद्ध्वस्त झाली. काही जण तर आसाममध्ये पळून गेले. जनतेने दिलेल्या जनादेशाने ममता दीदी आणि तृणमूल काँग्रेस यांना सत्ता दिली पण वैरभाव मिटवण्याची बुद्धी दिली नाही. त्यांचे ताठपण, केंद्र सरकारशी तेढीने वागणे सुरूच आहे. हाच अहंकार दीदींना एक दिवस गोत्यात आणणार हे नक्की.

कोरोना संबंधित बातम्यांवर फारशी चर्चा येथे करण्याची गरज नाही, कारण आजकाल टीव्ही वर सतत त्याच बातम्यांचा रतीब चालू असतो. पण त्यानिमित्ताने घडलेल्या घटनांवर मात्र बोलायला हवे. IPL ही क्रिकेट स्पर्धा ह्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आली आहे. अनेक देशांनी घातलेले प्रवास संदर्भातील निर्बंध आणि परदेशी खेळाडू उपलब्ध नसल्याने फक्त भारतीय खेळाडूच या सामन्यात खेळवले जातील असे वाटत आहे.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धाही त्याच दिशेने जाणार की काय अशी भीती वाटू लागली आहे. अर्थात ह्या स्पर्धा आयोजनासाठी प्रचंड खर्च जपानने केला असल्याने ती ही स्थगित होईल पण रद्द होणार नाही अशी आशा करूया. ऑलिम्पिक स्पर्धांसाठी जगभरातील अनेक खेळाडूही जीवाची बाजी लावून सराव करीत असतात. त्यांच्यासाठी तरी ही स्पर्धा व्हावी असे वाटते.

महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन ह्या वर्षी ६१ वर्षे झाली. बुद्धीवादी असणाऱ्या ह्या राज्यात कोरोना नियमांचे पालन नागरिक कसोशीने करीत नाहीत हे वाचून-पाहून आश्चर्य वाटते. सुधारककार आगरकरांपासून ते अंधश्रद्धा निर्मूलनाचे ध्येय उराशी बाळगलेल्या नरेंद्र दाभोकरांपर्यंत या बुद्धिप्रामाण्यास विवेकाची ही जोड मिळाली आहे. म्हणूनच ऐन करोनाकाळात आलेल्या दोन वाऱ्या फारशी खळखळ न करता इथल्या वारकरी संप्रदायाने रद्द केल्या. कुंभमेळ्यासारखा प्रकार इथे घडला नाही. मात्र समाजसुधारणेच्या चळवळींची परंपरा असूनदेखील महाराष्ट्रातून हुंड्याची प्रथा आजही बंद झालेली नाही. देशात हुंडाबंदी कायदा होऊन ६० वर्षे झाली, तरी या राज्यात हुंड्यापायी मुलींचा छळ होतो. महाराष्ट्राचा क्रमांक देशांत नववा, हे आपल्या राज्याच्या सुधारकी परंपरेस लाजिरवाणे आहे. 

महाराष्ट्रात सध्या परीक्षा घ्यायच्या की नाहीत यावर ही गदारोळ चालू आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्याने आरक्षणाचे समर्थक बिथरले आहेत. सत्ताधारी आपली जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत. निदान ह्या क्षणी हे एका समर्थ राज्याचे चित्र आहे असे वाटत नाही.

 

माध्यमांवर मध्यंतरी गंगेतून वाहणाऱ्या प्रेतांवर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या. त्याचप्रमाणे कुंभमेळ्याचे परिणाम म्हणून कोविड वाढला हे ही अनेकांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील योगींचा मनमानी कारभार ह्यावरही बातम्या येऊ लागल्या आहेत. उत्तर प्रदेशातील निवडणूक २०२२ च्या अखेरीस होणार आहे. त्याच्या निमित्ताने ह्या बातम्यांना सुरवात झाली असावी असाही एक मतप्रवाह आहे. लोकांनी ह्या गोष्टींकडे कसे बघावे याचे एक प्रकारे मार्गदर्शन ही वृत्तमाध्यमे करत आहेत असे वाटते. थोडक्यात आतापासून हे 'narrative setting' करायला सुरवात झाली आहे की काय अशी शंका मनात येते आहे.

 

नुकत्याच आलेल्या तौक्ते आणि यास या वादळांनी देशाच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीला झोडपून काढले. तौक्ते वादळात महाराष्ट्रातील किनारपट्टीचे बरेच नुकसान झाले. दीव ह्या गुजरात मधील ठिकाणीही प्रचंड नुकसान झाले. कारण इथे हे वादळ जमिनीवर धडकले. त्याचप्रमाणे यास चक्रीवादळाने ओरिसा आणि बंगाल येथे तडाखा दिला आहे. ह्यावेळी सरकारांपुढे हॉस्पिटलातील कोरोना रुग्णांनाही सुरक्षित ठेवण्याचे मोठेच आव्हान होते. हल्ली वादळाच्या पूर्वसूचनेमुळे लोकांना सुरक्षित जागी हलवता येते. त्यामुळे मनुष्य हानी टाळता येते. मात्र मालमत्तेचे नुकसान होतेच.



सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर धक्कादायक घटना घडत आहेत. अचानक गाझापट्टीत हमास ह्या आतंकवादी संघटनेने इस्राएलवर अग्निबाण डागले. इस्राएलने त्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या बॉम्ब वर्षावात अनेक पॅलेस्टीनी लोकांचे मृत्यू झाले. त्यांचे मालमत्तेचे नुकसान झाले. इस्राएलमध्ये पॅलेस्टीनी लोकांना दुय्यम दर्जा दिल्याने ते नाखूष होतेच. इस्राएल-पॅलेस्टाइन वादाला हमास या दहशतवादी संघटनेचा तिसरा कोन मिळाल्यामुळे हा संघर्ष अधिकच गुंतागुंतीचा झालेला आहे. हमास ह्या संघटनेला  इराण व कतार ह्या देशांकडून अर्थसहाय्य मिळते. गाझा पट्टीत पॅलेस्टाइनच्या प्रशासनाला हमास जुमानत नाही. अमेरिकी परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी इस्राएल-पॅलेस्टाइन दौऱ्यात काही वाटाघाटी केल्या. ही शिष्टाई अल्पावधीत यशस्वी होण्याची कोणतीही शक्यता वा अपेक्षा नाही. यासाठी हमासपासून पूर्ण व जाहीर फारकत घेण्याची जबाबदारी पॅलेस्टिनी प्रशासन आणि नागरिकांची आहे. असे झाले तरच इस्राएलवर जागतिक दबाव टाकता येईल. दोन हट्टी, त्यातील एक बेरका आणि कांगावखोर आणि दुसरा अडाणी आणि मुत्सद्देगिरीशून्य, समोरासमोर आले की जे होईल तेच सध्या इस्रा-पॅलेस्टाइन भूमीत होत आहे.

 

अलेक्झांडर लुकाशेन्को-स्वेतलाना त्सिखानुस्काया 

बेलारूस
चे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को गेली अनेक वर्षे सत्ते आहे. गेल्या वर्षी ते पुन्हा, म्हणजे सहाव्यांदा निवडून आले असे त्यांचे म्हणणे. पण खरे तर या निवडणुकीत त्यांची प्रतिस्पर्धी स्वेतलाना त्सिखानुस्काया यांना ७० ते ८० टक्के मते मिळाली होती. तरीही लुकाशेन्को यांनी या निवडणुकांचा निकाल फिरवून स्वतः निवडणूक जिंकल्याचा दावा केला. अखेर स्वेतलाना यांना शेजारील लिथुआनिया देशात परागंदा व्हावे लागले. ते पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, नुकतीच एका तरुण टीकाकाराच्या अटकेसाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीत बाधा आणली. रायन इंटर नॅशनल ह्या कंपनीचे एक विमान आपल्या हद्दीत उतरवून त्या पत्रकाराला अटक केली. लुकाशेन्को यांची ही कृती सर्व शासकीय, आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग करणारी आहे. त्यांना पुतीन यांचा पाठींबा आहे हे उघड आहेच. अशा या दांडगट अध्यक्षाचे आता काय करायचे असा प्रश्न लोकशाहीवादी जग आणि युरोपीय संघटना यांना पडला आहे.

 

या महिन्यात काही प्रभावी व्यक्तिमत्वांनी जगाचा निरोप घेतला. त्यांपैकी एक सुंदरलाल बहुगुणा. बहुगुणा  केवळ ज्येष्ठ कार्यकर्ते किंवा चळवळीचे अग्रणी नव्हते, तर ते पर्यावरणाचे तत्त्वचिंतकही होते. चिपको या कृतीमधली वैश्विकता त्यांनी ओळखली होती. अनेक चळवळींना त्यांनी दिलेल्या पाठिंब्यातून भान सातत्याने दिसत राहिले. दास डोंगरी राहतो, चिंता विश्वाची वाहतोहे वर्णन त्यांना लागू पडते.

वनराज भाटीया हे संगीतकार आपल्या समोर आले ते प्रामुख्याने शाम बेनेगल यांच्या चित्रपटातील संगीतातून. त्यांच्याएवढे शैलीवैविध्य फारच थोडय़ा संगीतकारांकडे होते. कदाचित त्यांनी जाहिरातींच्या सुमारे सात हजार जिंगल्स केल्या होत्या त्यामुळे असेल. त्या जिंगल्समुळेच श्याम बेनेगल यांनी त्यांना अंकुरया चित्रपटासाठी पाचारण केले. तेव्हा भाटियांचे वय होते ४५ वर्षे. परंतु त्यानंतरही सातत्याने हवे ते आणि तसेच संगीत त्यांनी केले. भारतीय चित्रपटांच्या मुख्य प्रवाहाने त्यांना कधी आपलेसे मानले नाही. भाटिया यांना त्याबद्दल आयुष्यात कधी खंतही वाटली नाही. केवळ पाचच वादकांमध्ये प्रचंड मोठा ऑर्केस्ट्राचा भास निर्माण करण्यासाठी जी प्रज्ञा लागते, ती त्यांच्यापाशी होती. अतिशय दर्जेदार संगीतकार अशी स्वतंत्र ओळख त्यांच्या संगीतानेच त्यांना मिळवून दिली. इथे ऑपेरा निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न होते. ते मात्र अपुरे राहिले.


रस्ते वाहतूक तज्ज्ञ दिनेश मोहन यांचे निधन २१ मे रोजी झाले. जगातील सर्वाधिक रस्ते अपघात यादीत भारताचे नाव पहिल्या पाचात आहे. तसे ते असू नये आणि हा बट्टा पुसला जावा यासाठी तळमळीने झटणाऱ्यांमध्ये रस्ते वाहतूक तज्ज्ञ दिनेश मोहन यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. कोविड-१९ महासाथीने आपल्यातून हिरावून नेलेल्या हजारोंपैकी ते एक. काहीसा ऊग्र चेहरा आणि कठोर वैज्ञानिक दृष्टिकोनाशी आजीवन एकनिष्ठता या गुणांमुळे बहुधा त्यांनी मित्र फार जोडले नाहीत. तरीही दिल्लीतील, मुंबईतील विज्ञानवर्तुळात व जगभरातील वाहतूक तज्ज्ञांमध्ये त्यांचा दरारा होता. मेट्रो किंवा लाइट-मेट्रोऐवजी सार्वजनिक वाहतुकीच्या बसगाडय़ा, सायकली, पादचारी यांच्यासाठी स्वतंत्र मार्गिकांचे ते खंदे पुरस्कर्ते होते. पादचारी, दुचाकीस्वार अशांसाठी रस्ते अधिक सुरक्षित कसे होतील, दुचाकीस्वारांसाठी शिरस्त्राणे (हेल्मेट) कशा प्रकारच्या हव्यात, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणते उपाय योजावे, अशा अनेक संशोधनप्रकल्पांसाठी दिनेश मोहन यांचे मार्गदर्शन घेतले जात होते. सीएनजीवर चालणारी सार्वजनिक वाहतूक वाहने बनवण्याचा खर्च व त्यांपायी मिळणारे लाभ यांचा मेळ जुळत नाही हेही त्यांनी दाखवून दिले होते. संशोधनाधारित मुद्दे मांडण्याचा त्यांचा आग्रहीपणा अखेपर्यंत कायम होता.

 


काँग्रेस चे युवा नेते राजीव सातव यांचेही नुकतेच कोविड-१९ मुळे निधन झाले. कायदा शाखेतील पदवीधर असणाऱ्या सातव यांनी कारकीर्दीची सुरुवात पंचायत समितीपासून केली. समाजकल्याण विभागाकडून मिळणाऱ्या विहिरीवरच्या मोटारीच्या लाभापासून ते देशपातळीवरच्या सर्व प्रश्नांवरची माहिती असणारा नेता अशी सातव यांची प्रतिमा होती. निवडणुकीच्या राजकारणात यश मिळत असूनही त्यांनी संघटनाबांधणीसाठी २०१९ ची निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला. गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्रभारी म्हणून काम पाहिले व भाजपला १००च्या आत रोखले. कार्यकर्ते जोडणारा, बडय़ा नेत्यांना न दुखावताही पुढे जाणारा असा एक नेमस्त नेता ही राजीव सातव यांची ओळख होती. काँग्रेस पक्षाला त्यांची उणीव नक्कीच भासेल.

शेवट करता करता वाचकांचे New York Times मधील बातमीकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. भारतातील कोरोना मृत्यू, कोरोना रुग्ण यांचा आकडा भारत सरकार चुकीचा देत आहे असा यात आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या मते भारतात आतापर्यंत अनेक पटीने लोक मेले असण्याची शक्यता आहे. ह्या वृत्तपत्रातील बातमीचे आपल्या सरकारने खंडन केले आहे. मात्र एका लोकशाही देशाने दुसऱ्या लोकशाही असलेल्या देशासंबंधी काही विवादित मुद्दा असेल तर अधिकृतपणे भारत शासनाशी संपर्क साधायला हवा असे वाटते. एकीकडे पुतीन, क्षी जिनपिंग, लुकाशेन्को यासारख्या हुकुमशहा नेत्यांच्या नावाने बोटे मोडायची आणि दुसरीकडे भारतासारख्या लोकशाही देशांत अशा बातम्या देऊन घबराट वाढवायची ही वृत्ती योग्य नव्हे. New York Times हे वृत्तपत्र उघड उघड पणे मोदी सरकारविरोधी आहे. पण टीका करताना ती तारतम्याने करावी याचे संपादक मंडळाचे भान सुटलेले दिसते.

असो. आता इथेच थांबते.

स्नेहा केतकर




No comments:

Post a Comment