मधले पान

कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.

सप्टेंबर महिना गणरायाच्या आगमनाने सुरु झाला. महाराष्ट्रात गेल्या महिन्यात पावसाने थैमान घातले होते. पण त्यानेही गणरायासाठी थोडी विश्रांती घेतली आणि सांगलीकर कोल्हापूरकरांचा जीव भांड्यात पडला. अर्थात ह्या पुरामुळे अनेकांचे प्रचंड नुकसान झाले ह्यात वाद नाही. ३०० वर्षांपूर्वी असाच पूर ह्याच भागात आला होता आणि त्यामुळे मुगलांच्या सैन्याचे प्रचंड नुकसान झाले अशा ही काही बातम्या आल्या  होत्या.

गणेश आणि गौरीच्या आगमनाची तयारी करताना सर्व भारतीयांचे लक्ष चान्द्रयानाकडे लागून राहिले होते. देशासाठी अभिमानाच्या असणाऱ्या ह्या घटनांतही अनेकांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला. ममता दीदींना चांद्रयान मिशन यशस्वी झाले तर ह्याचा लाभ मोदींना मिळेल ह्याचेच दुखः वाटत होते. अशा मनोवृतीच्या माणसांपुढे काय बोलावे हे समजत नाही. चांद्रयानाच्या शेवटच्या टप्प्यात मात्र विक्रम लँडर सोबत आपला संपर्क होऊ शकला नाही ह्याचे दु:ख आहे. अर्थात अजूनही वैज्ञानिकांचे अथक प्रयत्न चालूच आहेत.

प्रख्यात साहित्यिक किरण नगरकर यांचे निधन ह्या महिन्यात झाले. त्यांची 'सात सक्कं त्रेचाळीस' ही पहिली कादंबरी. मात्र मराठी वाचकांना त्यांचे लेखन अगम्य वाटत असे हे ही तितकेच खरे. त्यांनी नंतर इंग्रजीतून पुस्तके लिहिली आणि मग त्यांचे मराठीत भाषांतर झाले. हा देखील एक वेगळा योग. रावण आणि एडी, cuckold ही मीराबाईच्या जीवनावरील कादंबरी - ही त्यांची पुस्तके विशेष गाजली. साहित्य अकादमीच्या पुरस्काराप्रमाणेच त्यांना Order of Merit हा जर्मन पुरस्कारही मिळाला होता.


१४ सप्टेंबर हा आपण हिंदी दिवस म्हणून साजरा करतो. त्यावेळी बोलताना अमित शहांनी हिंदी भाषा ही देशाला जोडून ठेवणारी भाषा आहे. अशा अर्थाचे विधान केले. तामिळनाडू, कर्नाटकातून ह्याला विरोध झालाच. पण हा मुद्दा काही खूप जणांनी उचलून धरला नाही. थोडक्यात अनेक वर्षांपूर्वी हिंदी विरोध हा दक्षिणी राज्यातील प्रखर मुद्दा होता. ती धार आता कमी झाली आहे हे जाणवले. अण्णा दुराई, करुणानिधी ह्या लोकांनी ह्याच मुद्द्यावर राजकारण करून सत्ता बळकावली. आता सगळे चित्र बदलले आहे.

महाराष्ट्रात आणि हरयाणात पुढील महिन्यात निवडणुका होणार आहेत. निवडणूक आयोगाने नुकतेच ह्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. महाराष्ट्रात तरी भाजप आणि शिवसेना यांची युती झाली तर ते सत्तेत येतील असे चित्र आहे. मात्र युती होणार की नाही हे काही दिवसांत कळेल.


मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून फादर फ्रान्सीस दिब्रिटो यांची एकमुखाने निवड करण्यात आली. फादर दिब्रिटो यांच्या निवडीकडे, साहित्याकडे पाहतो तसे अनेक अंगांनी पाहता येईल. कारण साहित्यात मांडली गेलेली मूल्ये त्या साहित्यिकाच्या जगण्यातही दिसत असतील, तर अशा व्यक्तीचे साहित्य आणि जगणे यास एक तेज प्राप्त होते. फादर दिब्रिटो यांच्याबाबत असे मानता येईल. ह्या निवडीसाठी साहित्य महामंडळाचे अभिनंदन करायला हवे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्यांनी केलेल्या घोषणांमुळे अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होईल अशी अशा करूया. सर्व विरोधक भारतातील मंदीमुळे चिंतीत आहेत. अशावेळी अनेकजण 'अरे ही वाढीतील मंदी आहे' असे सांगण्याचा प्रयत्न ही करत आहेत.


अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला ही बातमी ऐकून अनेकांना आनंद झाला असेल. ह्यावर अनेक पानेही लिहिता येतील, आणि तशी ती अनेक पेपरातून लिहून ही आली आहे. पण मला मात्र अमिताभचा हा सन्मान हा त्याच्या अभिनय गुणांसोबत त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा ही वाटतो.त्याने आपले काम अतिशय निष्ठेने केले. बॉलीवूड मध्ये खऱ्या अर्थाने त्याने व्यावसायिकता आणली. वेळ पाळणे, प्रत्येक गोष्ट व काम जणू काही प्रथमच करतोय तितक्या मेहनतीने करणे ह्याचे हे फळ आहे. 
अमिताभ प्रमाणे अनेक अभिनेते गुणवान आहेत. उदा: गोविंदा. त्याच्यासारखी कॉमेडी कोणालाही जमणार नाही हे अमिताभ ही बोलून गेला आहे. पण त्याच्या अव्यावसायिक वागण्याने आज तो इंडस्ट्री बाहेर फेकला गेला आहे. गुण आणि संस्कार यांचा योग्य समन्वय अमिताभमध्ये दिसून येतो. त्याचे मनापासून अभिनंदन.

अरेच्चा! आपले HOWDY MODI बद्दल बोलायचे राहिलेच की!!!!! 

समस्त भारतीय जनतेला आनंद देणारा हा कार्यक्रम होता. पंतप्रधानांनी स्वतःचा आब राखत आणि ट्रम्प यांचा मान राखत ही सभा अक्षरशः जिंकून घेतली. भारतात निवडणुकीत कसे बोलायचे ह्याचा पाठ जणू मोदींनी ट्रम्प यांना दिला.

सध्या संयुक्त राष्ट्रसंघाचे अधिवेशन चालू आहे. पंतप्रधान ह्या अधिवेशनात सर्वांना संबोधित करणार आहेत. भारताचे परराष्ट्र खाते सध्या तडफेने काम करत आहे. ह्या अधिवेशनात जर भारताची बाजू समर्थपणे मांडली गेली, तर हे सगळ्या परराष्ट्र खात्याचे सांघिक यश असेल.


विजया ताहिलरामानी या अत्यंत कार्यक्षम म्हणून गणल्या गेलेल्या न्यायाधीशास पदोन्नती नाकारली गेली, हा मुद्दा नक्कीच काळजीचा आहे. हा आदेश आल्यावर त्याचा फेरविचार करण्याची विनंती न्या. ताहिलरामानी यांनी केली. दुसऱ्याच दिवशी ती फेटाळली गेली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर एका शब्दाचेही भाष्य न करता न्या. ताहिलरामानी यांनी अत्यंत सभ्यपणे, आपल्या पदाचा आब राखत पदत्याग केला. 
त्यानंतरही या विषयावर त्यांनी काहीही भाष्य केले नाही. मद्रास उच्च न्यायालयातील अनेक वकिलांनी मात्र ते केले आणि ते योग्यच आहे. ह्याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे असे नमूद करावेसे वाटते.

स्नेहा केतकर

No comments:

Post a Comment