मधले पान


कट्ट्यात 'मधले पान' हे द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.

आज २०१९ च्या वर्षाच्या अखेरीस लिहिताना देशांत प्रचंड अशांत वातावरण दिसत आहे. मोदी सरकारने आणलेला 'सुधारित नागरिकत्व कायदा' हा देशांत इतकी अशांती माजवेल याची अनेकांना कल्पनाच नव्हती. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीबाबत आसाममध्ये प्रथम निदर्शने झाली आणि हे लोण देशभर पसरत गेले. खरे पाहता ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पण ह्या दोन गोष्टी जोडून, त्यात धार्मिकता हा मुद्दा घालून एक प्रचंड गोंधळ, किंवा अनेकांचा बुद्धीभेद करण्यात आला.

या निदर्शनांच्या वेळी पोलिसांवर झालेली दगडफेक ही मात्र दुर्दैवी म्हणाली लागेल. काहीही झाले तरीही सरकारी कर्मचाऱ्यांवर असे हे हल्ले समर्थनीय नाहीत. ह्यात अनेक विद्यापीठांनीही भाग घेतला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील फी वाढीचा प्रश्न तसाच असताना आता त्यात ह्या मुद्द्याचीही भर पडली आहे. जामिया मिलीया इस्लामियामधील अनेकांनी निदर्शने केली. तरुणांनी हा मुद्दा घेत निदर्शने करणे ह्यात गैर काही नाही. पण ह्या तरुणाईचा, त्यांच्या ह्या उर्जेचा गैरवापर तर केला जात नाहीये ना हे पाहणे गरजेचे आहे. आणि त्यातही तरुणांनी प्रथम आपण कोणत्या मुद्द्यासाठी निदर्शने करीत आहोत ह्याचा ही अभ्यास करणे अपेक्षित आहे. आसाम, उत्तर भारत, ईशान्य भारत इथे सध्या चालू असलेला विरोध काही दिवसांत कमी होण्याची शक्यता आहे.

मात्र ह्या मुद्द्यावर रान पेटवण्याचा प्रयत्न अनेकांचा आहे. ममता बॅनर्जी ह्या त्यात आघाडीवर आहेत. मात्र संतापाच्या भरात त्या अनेक बेजबाबदार विधाने करतात आणि तोंडघशीही पडतात. महाराष्ट्रातही सध्या अशाच प्रकारचे हास्यास्पद विधाने करणे चालू आहे. पत्रकारांनी अशा प्रकारच्या विधानांना किती महत्व द्यावे ह्याचे तारतम्य बाळगण्याची गरज आहे.

आज एकूण जगभरातच अशांती दिसत आहे. अमेरिकेत ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याची चिन्हे आहेत. फ्रान्समध्ये निवृत्ती वेतन कायद्यात सुधारणा करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात देशव्यापी आंदोलने चालू आहेत. ब्रिटनमध्ये नुकतेच नवे सरकार निवडून आले आहे आणि आता ब्रेक्झिटच्या कार्यवाहीला सुरवात होईल. हॉन्गकॉन्गमधील निदर्शने ही नेटाने चालूच आहेत. सगळीकडे एक संक्रमणाचा काळ असल्याचे भासत आहे. अशातच आपण २०१९ ला निरोप देत आहोत. येणारे नवे वर्ष ह्या सर्व समस्यांवर उत्तरे घेऊन येईल ही आशा!!!!

नुकतेच मराठी नाट्यसृष्टीतील महत्वाचे कलाकार डॉ.लागू यांचे निधन झाले. एक विचारवंत अभिनेता स्वतःच्या योगदानाने संपूर्ण नाट्यसृष्टीतच कसे परिशीलन घडवतो हे डॉ.लागू यांच्या कारकीर्दीतून पाहता येते.

पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ ह्यांना तेथील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ह्या संदर्भात महत्वाचा मुद्दा हा की पाकिस्तानात प्रथमच न्यायासनाने एका लष्करशहाच्या बाबतीत असा दंड सुनावला आहे. नाहीतर तिथे नेहमीच लष्कराच्या अंगठ्याखाली सर्व सरकारातील व्यवस्थापने असायची.हा एक नवा पायंडा असेल का ह्याचे उत्तर काळच देईल.

बलात्कार आणि त्यावरची कार्यवाही, त्यातील अक्षम्य दिरंगाई ह्यावर न लिहिलेलेच बरे. पण हैद्राबाद  येथील बलात्कार आणि त्यातील संशयितांची झालेली हत्या ह्याने सर्व देशाला खडबडून जागे केले. अनेकांनी ह्या घटनेचे स्वागत केले. बलात्काराच्या घटनात आता जंगलचा कायदाच असावा असा टोकाचा विचार जनता करते आहे, ही चिंतेची बाब आहे. निर्भया प्रकरणातील दोषींची फाशीची शिक्षा सुप्रीम कोर्टाने कायम ठेवली ह्याचे स्वागत. पण ही शिक्षा आता लवकरात लवकर अमलात आणली जावी ही अपेक्षा.

ह्याच संदर्भात एक मेसेज whats app वर फिरत होता. त्यात आता मुलींसाठी काही करण्याची गरज नाही तर मुलांना स्त्रियांशी कसे वागावे ह्याचे शिक्षण देण्याची गरज आहे असे लिहिले होते. अर्थात हा प्रश्न भारतापुरता आहे असे कोणाला वाटत असेल तर त्याने चिले मधील महिलांनी लिहिलेल्या 'feminist anthem' बद्दल जरूर वाचावे. महिला-पुरुष यांच्यातील असमानता ही जगभर आहे हेच या गाण्यातून दिसते. हा anthem जगभरातील महिला आपापल्या शहरात गात आहेत.

येणारे नवे वर्षं आपल्या विचारात प्रगल्भता आणेल, आपली क्षितिजे रुंदावेल ह्या शुभेछांसह निरोप घेते.



स्नेहा केतकर


No comments:

Post a Comment